जातीपलीकडे धर्मासाठी!

    29-May-2023   
Total Views |
Article on Vijay Kamble

हिंदू धर्म-संस्कृती संवर्धनासाठी कार्यरत असलेले पुण्यातील विजय कांबळे. आद्यक्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांचा वारसा जगणार्‍या विजय यांच्या आयुष्याचा मागोवा घेणारा हा लेख...

साल २००० असावे. दिल्लीमध्ये कुठे तरी कोणी तरी कुराणचा अपमान केला वगैरे म्हणत पुण्यात त्याच्या निषेधार्थ मोर्चा निघाला. या मोर्चातून गंजपेठमध्ये मातंग समाजाच्या वस्तीवर अंदाधुंद दगडफेक झाली. त्यानंतर दुनियेत कुठेही काहीही घडले, तरी मोर्चा काढत तो जमाव या मातंग समाजाच्या वस्तीवर येनकेनप्रकारे दहशत करू लागला. या सगळ्या प्रकाराने या वस्तीतला साधारण २० वर्षांचा एक नवयुवक विजय कांबळे याचे रक्त संतापाने उसळू लागले. समोरच्याने विनाकारण वस्तीला वेठीस धरण्याआधी हजारवेळा विचार करायला हवा, असे वस्तीचे बळ निर्माण व्हावे, असे विजय यांना वाटू लागले.

त्यांना तसे वाटले, याचेही कारण आहेच. ते ज्या गंजपेठ पुण्यात राहायचे तिथून काहीच अंतरावर आद्यक्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या तालमीची जागा होती. १९९२ साली दंगल झाली होती. त्यावेळी शाहीर योगेश यांनी लहुजी वस्तादांवर व्याख्यान या वस्तीत दिले होते. आपले पूर्वज लहुजी साळवे आहेत आणि स्वातंत्र्यलढ्यात अन्यायाविरोधी लढण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे, या सत्य इतिहासाने विजय यांच्यामध्ये देश आणि धर्माभिमानाची ज्योत तेवली होती. त्यामुळेच २००० साली आणि त्यानंतरही वस्तीवर होणार्‍या नियोजनबद्ध अन्यायाविरोधात विजय कांबळे नावाचा तरुण पेटून उठला. विजय यांनी वस्तीतील तरुणांना एकत्र करून तालिमीत जायला सुरुवात केली. तिथे अप्पा कांबळे, दुर्योधन पवार या समाजातील ज्येष्ठ व्यक्तींनी या मुलांना लाठीकाठी, दांडपट्टा, छडीपट्टा, तलवारबाजी शिकवायची तालीम सुरू केली. त्यानंतर विजय यांनी वस्तीतील युवकांना तालीम घेण्यासाठी प्रोत्साहित केले आणि करत राहिले. त्यामुळे वस्तीत तालीम घेतलेलीसशक्त युवापिढी तयार झाली.

त्याचवेळी शहराच्या कानाकोपर्‍यात बायबल घेऊन काही लोक ख्रिस्ती धर्माचा प्रचार करत होते. ते जे काही प्रश्न वस्तीतल्या साध्याभोळ्या लोकांना विचारत. पण, लोकांना धर्माचे तात्विक ज्ञान नसल्याने अनेकांचा त्या ख्रिस्ती धर्मप्रचारकांवर विश्वास बसे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण होऊ लागले. मातंग समाजातही याचे पडसाद उमटतच होते. त्यावेळी विजय यांना वाटू लागले की, आपल्या धर्माचा तसाच कुराण आणि बायबलच्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. विजय यांनी हे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच वस्तीवर धर्मांतरण करण्यासाठी येणार्‍यांना ते चर्चात्मक पातळीवरच हुसकावून लावू लागले. तेव्हा एक घटना घडली. मातंग समाजाचे अत्यंत साधेभोळे कुटुंब. कुटुंबात येडेश्वरी मातेचे पूजाअर्चन व्हायचे. पण, त्या घरातल्या कर्त्या पुरुषाने ख्रिस्ती धर्म स्वीकारला. ज्या ज्यावेळी कुटुंबात येडेश्वरी मातेची पूजा व्हायची, सणसूद असायचे त्या-त्यावेळी म्हणे या माणसाच्या अंगात येशू यायचा. हा माणूस घरातल्यांना प्रचंड मानसिक त्रास देत सांगायचा, ‘तुम्ही सैतान आहात. पापी आहात. ते सैतान (म्हणजे घरातली देवाच्या तसबिरी, पूजेचे साहित्य) फेकून द्या...’ वगैरे म्हणायचा.

घरातले सगळे त्रासले. साधीभोळी माणसं त्यांना वाटायचं की, खरंच येशू आलाय त्याच्या अंगात. विजय यांनी ते पाहिले आणि त्यांनी सरळ त्या व्यक्तीला विचारले की, ‘देव फेकून देऊ, पण येशूदेवा त्याआधी आम्हाला क्रुसावर लटकून दाखवा. लाल रक्त दाखवा.’ विजय यांचे म्हणणे ऐकून परिसरातले सगळेच त्या व्यक्तीला असे म्हणू लागले. आपले नाटक आपल्यावरच उलटले, हे पाहून त्या माणसाने मग ‘येशू अंगात येतो’ हे नाटक करणे सोडले. त्यानंतर विजय यांनी त्या माणसाशी स्नेह-संपर्क कायम राखत त्याला पुन्हा स्वधर्मी आणले. त्यानंतर जवळ जवळ १२० व्यक्तींचे त्यांनी अशाच प्रकारे स्वधर्मात पुन्हा स्वागत केले. व्यसनमुक्ती असू दे, धर्मांतर असू दे की, ‘लव्ह जिहाद’ या सगळ्या समस्यांच्या विरोधात विजय कांबळे हिरीरीने अग्रक्रमी असतात. मागासवर्गीय समाजाचा असून हिंदू म्हणून अभिमान आहे, हिंदू संघटित करण्यासाठी काम करतो म्हणून विजय यांच्यावर अनेकदा हल्ले झाले, तर कधी खोट्या पोलीस तक्रारीही करण्यात आल्या. दलित स्वयंसेवक संघ, परिसरातील कम्युनिस्ट विचारसरणीच्या लोकांनी विजय यांना त्यांच्या कामापासून रोखण्याचे प्रयत्न केले. पण, विजय थांबले नाहीत. ते सर्वांना पुरून उरले!

पुणे महानगरपालिकेमध्ये सफाई खात्यात कामाला असलेले विजय कांबळे. मूळचे पुण्याच्याच गंजपेठेतले यलप्पा आणि निलाबाई कांबळे यांचे विजय हे सुपुत्र. यलप्पा हे पुणे महानगरपालिकेत सपाई कामगार होते, तर निलाबाई मंगलकार्यालयात भांडी घासण्याचे काम करत. लहानपणी विजयही आईसोबत हे काम करत. पुढे स्वकष्टावर शिकत विजय यांनी कसेबसे बारावीपर्यंत शिक्षण घेतले. आज विजय स्वराज्य महासभेचे संस्थापक, क्रांती मंडळ माजी खजिनदार, म्हसोबा मित्रमंडळाचे सल्लागार आहेत. आपण आद्यक्रांतिवीर लहुजी साळवे आपले पूर्वज आहेत. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य आणि धर्माचा आपल्याला वारसा आहे, हे विचार कायमच विजय यांना प्रेरणा देत राहिले. ते म्हणतात, ”समाजकंटक आज समाजात द्वेषाचे वातावरणपसरवतात. हिंदूंना शिव्या देतात. पण, अन्याय करणारे जर इतर धर्मीय असतील, तर गप्प बसतात. असे लोक समाजात फूट पाडत आहेत. अशा लोकांपासून समाजातल्या तरुणांना वाचवायचे काम आयुष्याच्या शेवटपर्यंत करत राहणाार! धर्मासाठी श्वास घेतो आणि घेत राहणार!!” खरंच, विजय यांच्यासारखे धर्मसंस्कृतीप्रेमी धर्म आणि समाजाची प्रेरणाच असतात.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.