नवीन पर्व के लिए, नवीन प्राण चाहीए ! : पंतप्रधान नरेंद्र मोदी
28-May-2023
Total Views |
नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतकाळात राष्ट्रार्पित होणारी नव्या संसदेची वास्तू आत्मनिर्भर भारताच्या सूर्योदयाची साक्षीदार आहे. ही वास्तू १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब असून विकसित भारताचे स्वप्न साध्य करण्याची प्रेरणा आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भारतीय संसदेच्या नव्या वास्तूच्या राष्ट्रार्पणप्रसंगी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांच्यासह माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ आणि खासदारांच्या उपस्थितीत नव्या संसदेतील लोकसभेच्या सभागृहात शानदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांनी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींचा संदेश वाचून दाखविली तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी विशेष टपाल तिकीट आणि ७५ रुपयांचे विशेष नाणेही जारी केले.
भारताच्या इतिहासात २८ मे, २०२३ हा दिवस सुवर्णाक्षरात कोरला जाणार आहे. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना १४० कोटी भारतीयांच्या आकाक्षांचे प्रतिक असलेली संसदेची नवी वास्तू राष्ट्रार्पित झाली आहे. ही वास्तू आत्मनिर्भर भारताच्या सूर्योदयाचे प्रतिक असून नुतन आणि पुरातन याचे सुरेख संगम आहे. याद्वारे भारताच्या दृढनिश्चयाचा संदेश जगभरात केला आहे. भारतीय लोकशाहीच्या या सर्वोच्च वास्तूमध्ये महान चोल साम्राज्याचा वारसा असलेला आणि कर्तव्यपथ, सेवापथ आणि राष्ट्रपथाचा निदर्शक असलेला पवित्र सेंगोल लोकसभेमध्ये स्थापित करण्यात आला आहे. या सेंगोलचे प्रतिष्ठा ठेवता आल्याचा सार्थ अभिमान असून याद्वारे कर्तव्याची प्रेरण सतत मिळत राहिल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
नव्या मार्गावरून मार्गक्रमण करूनच नवे प्रतिमान स्थापित करता येतात, असे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, गुलामीच्या कालखंडातून निघून भारत आज नवनिर्मिती करत आहे. त्यामुळे भारतासह जगाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी नव्या आणि आधुनिक कार्यस्थळाची गरज होती. जुन्या इमारतीत काम करणे खूप अवघड होते. आसनव्यवस्था कमी असून तांत्रिक अडचणीही होत्या. त्यामुळेच संसदेच्या नवीन इमारतीच्या उभारणीची चर्चा दोन दशकांहून अधिक काळ सुरू होती. नव्या वास्तूमध्ये कणाकणात ‘एक भारत - श्रेष्ठ’ची भावना आहे. संसदेची नवी वास्तू भारतीयांमध्ये नवचेतना जागृत करणारी ठरणार आहे. या चेतनेद्वारे पुढील २५ वर्षांत म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवापर्यंत विकसित भारताचे स्वप्न साध्य करण्याची प्रेरणा मिळेल, असेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले आहे.
पंचायत ते संसद एकच ध्येय : गरिब कल्याण
गेल्या ९ वर्षांमध्ये केंद्र सरकारने गरिब कल्याण हेच ध्येय ठेवून कार्य केले आहे. या काळातमध्ये गरिबांसाठी ४ कोटी घरे, ११ कोटी शौचालये, गावांना जोडण्यासाठी ४ लाख किमीचे रस्ते, ५० हजारांहून अधिक अमृत सरोवरे आणि ३० हजारांहून अधिक नवी पंचायत भवन बांधण्यात आले. त्यामुशे पंचायत ते संसद गरिब कल्याण हेच ध्येय घेऊन सरकार काम करत आहे.
भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरात कोरला जाणारा क्षण : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
संसदेच्या राष्ट्रार्पणप्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा संदेश राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांनी वाचून दाखविला. यावेळी राष्ट्रपती म्हणाल्या, नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाचा हा प्रसंग भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल. नवीन संसद भवनाचे उद्घाटन हा भारताच्या भूमीच्या उत्तरेकडील बिंदूपासून दक्षिणेकडील बिंदूपर्यंत, पूर्व सीमेपासून पश्चिम किनारपट्टीपर्यंत विविधतेत राहणाऱ्या सर्व देशवासियांसाठी अभिमानाचा आणि अतुलनीय आनंदाचा प्रसंग आहे. भारतीय संसदेला आपल्या सामूहिक जाणीवेत विशेष स्थान आहे. संसद ही आपल्या समृद्ध लोकशाही परंपरांचा दीपस्तंभ आहे.
मार्गदर्शक ठरणार नवे संसद भवन : उपराष्ट्रपती जगदीप धनखड
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याही संदेशाचे वाचन राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांनी केले. उपराष्ट्रपती म्हणाले की, भारतीय लोकशाहीच्या अभूतपूर्व विकास प्रवासाच्या या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षणाबद्दल संपूर्ण देशाचे मनःपूर्वक अभिनंदन करताना मला खूप आनंद होत आहे. आपले सध्याचे संसद भवन हे आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आज जगातील एक मोठी शक्ती म्हणून भारताची ओळख होण्यापर्यंतच्या ऐतिहासिक प्रवासाचे साक्षीदार आहे. आत्मनिर्भर भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी नवे संसद भवन हे मार्गदर्शक ठरेल.
भारताच्या मजबूत भविष्याचा पाया लोकशाही : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला
स्वातंत्र्याच्या सुवर्णकाळात आज संपूर्ण देश या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार आहे. पंतप्रधान मोदींच्या दृढनिश्चयाने आणि प्रेरणादायी मार्गदर्शनाने संसदेची ही नवीन इमारत अडीच वर्षांपेक्षा वर्षांपेक्षा कमी कालावधीत बांधून पूर्ण झाली आहे. भारतीय संसदेमध्ये देशांपुढील आणि जगापुढील समस्यांवर तोडगा काढण्याची क्षमता असून भारताच्या मजबूत भविष्याचा पाया लोकशाही असल्याचे बिर्ला म्हणाले. त्यांच्यापूर्वी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनीदेखील संबोधित केले.
पंतप्रधानांच्या भाषणात रा. स्व. संघाच्या पद्याचा उल्लेख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणामध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये नेहेमी म्हटल्या जाणाऱ्या “मुक्त मातृभूमी को नवीन प्राण चाहिए, नवीन पर्व के लिए नवीन प्राण चाहिए मुक्त गीत हो रहा नवीन राग चाहिए” या पद्याचा विशेष उल्लेख केला.