नव्या भारताची नवी संसद ही देशाची विकसित देश अशी ओळख प्रस्थापित करण्यात मोलाची भूमिका बजावणार आहे. १४० कोटी लोकसंख्येचा हा देश जेव्हा विकास करतो, तेव्हा संपूर्ण जग विकास करते, हे नाकारून चालणार नाही. येणार्या काळात भारत महासत्ता म्हणून ओळखला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर नव्या संसद भवनाची गरज तीव्र झाली होती. पंतप्रधान मोदी यांनी त्यासाठी संकल्प सोडून तो प्रत्यक्षातही आणला.
संपूर्ण जगाच्या लोकशाहीचे प्रतिनिधित्व करणार्या, नव्या भारताच्या संसद भवनाच्या झालेल्या उद्घाटन सोहळ्यात भारतीय संस्कृतीचे अपूर्व दर्शन घडले. सकाळी ७.१५ च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या संसद भवनात दाखल झाले आणि त्यानंतर संपूर्ण वैदिक पद्धतीने पूजापाठ, हवन यांनी कार्यक्रमाला सुरुवात झाली. पुरोहितांनी वैदिक मंत्रोच्चारांमध्ये पंतप्रधान मोदी यांना सेंगोल म्हणजेच राजदंड सुपुर्द केला. तो हातात घेण्यापूर्वी मोदी यांनी राजदंडाला दंडवत घातला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत मोदी यांनी नवीन संसद भवनात राजदंडाची स्थापना केली. पंतप्रधान मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला पूजेला बसले होते.
तामिळनाडूमधील शैवांच्या मठातील धर्म गुरूंनी १९४७ मध्ये भारत सरकारला भेट दिलेला हा राजदंड नव्या संसद भवनात संपूर्ण सन्मानाने विराजमान झाला आहे. माऊंटबॅटनकडून सत्तेचे हस्तांतरण करताना ते प्रतिकात्मक रुपात कसे करावे, यानुसार चोल संस्कृतीतील सेंगोल प्रतीक म्हणून स्वीकारला गेला. चोल संस्कृतीत हा दंड धर्माचे तसेच नीतीपरायण राजसत्तेचे प्रतीक मानला गेला. त्यानंतर तो अडगळीत पडून राहिला होता. मात्र, मोदी यांनी हा राजदंड नव्या संसदेत विधिवत प्रतिष्ठापित केला. थिरुवावदुराई अधिनम मठाच्या मागणीवरून वुम्मिदी एथिराजुलू यांनी दि. १५ ऑगस्ट, १९४७ साली सेंगोल बनवला होता. आज ते स्वतः संसद भवनात उपस्थित होते. त्यामुळे या वृद्ध डोळ्यांचे पारणे फिटले. मोदी यांच्या मागे साधूसंतांची मांदियाळी पाहायला मिळाली. त्याचवेळी सुरू असलेल्या पवित्र मंत्रोच्चारांनी वातावरण मंगलमय झाले होते.
चोल साम्राज्यात सेंगोल हे कर्तव्यपथ, सेवापथ आणि राष्ट्रपथ यांचे प्रतीक मानले जायचे. नव्या भारताच्या नव्या संसदेत या पवित्र सेंगोलची स्थापना झाली आहे. मोगलांचे गोडवे गाण्याची गुलामी मानसिकता झुगारून देत भारतातील हिंदू राजवटींचा उज्वल इतिहासाला पुन्हा उजाळा मिळाला आहे. राजे आणि अधिनाम यांच्या संगमातून सेंगोल हे सत्तेचे प्रतीक बनले होते. अधिनामाचे संतांचे आशीर्वाद देण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित होते. देशाला गतवैभव प्राप्त करून देताना, महान चोल साम्राज्यातील सत्तेचे प्रतीक मोदी यांनी वापरत दक्षिण भारतातील संस्कृतीला देशाच्या मुख्य प्रवाहाला जोडले आहे. नव्या संसदेच्या इमारतीचे बांधकाम तब्बल ६० हजार श्रमिक बांधवांनी पूर्णत्वास नेले. त्यांचाही सत्कार याप्रसंगी करण्यात आला.
श्रमशक्तीचा सन्मान करण्याची परंपरा पंतप्रधान मोदी यांनी कायम राखली आहे. तसेच त्यांच्या कार्याची दखल संसदेत ‘डिजिटल’ गॅलरीच्या स्वरुपात कायमस्वरुपी घेण्यात आली आहे. प्रत्येक देशाच्या विकासयात्रेत काही क्षण असे येतात, जे कायमचे अमर होतात, काही दिवस इतिहासात अजरामर ठरतात. रविवार, दि. २८ मे हा असाच काळाच्या ललाटरेषेवर कायमचा कोरला गेलेला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचीही आज जयंती. या दिवशी भारताला नव्या संसदेची भेट मिळाली. लोकशाहीचे हे पवित्र मंदिर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात साकार झाले. पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेले आहे. अर्थात मोदी यांनी संकल्प करावा आणि तो पूर्णही करावा, अशी नवी प्रथाच गेल्या नऊ वर्षांत रूढ झाली आहे. पायाभरणी आणि उद्घाटन दोन्ही करण्याचा मान त्यांनी अनेक देशहिताच्या प्रकल्पांच्या बाबतीत केले आहे.
१४० कोटी भारतीयांच्या आकांक्षा तसेच स्वप्नांचे प्रतिबिंब नवीन संसद आहे. लोकशाहीचे ते मंदिर आहे. नवीन संसद भवन नूतन आणि पुरातन यांच्याबद्दल आदर राखणारे आहे. नवीन संसद भवन हे वास्तुकलेचा आदर्श नमुना असून, त्याचा आतील भाग देशाचा समृद्ध, सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित करतो. ही इमारत अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. त्याद्वारे संसद सदस्यांना अखंड ‘कनेक्टिव्हिटी’ प्रदान करण्यात येणार आहे. लोकसभेच्या आतील भागाची रचना राष्ट्रीय पक्षी मोरापासून, तर राज्यसभेची रचना राष्ट्रीय फूल कमळापासून प्रेरित आहे. समिती कक्षात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. संसद सदस्यांव्यतिरिक्त संशोधकांनाही नवीन संसद भवनाच्या ग्रंथालयाचा वापर करता येणार आहे. ही इमारत पर्यावरणपूरक असून, त्याला प्लॅटिनम दर्जा देण्यात आला आहे. धर्म, संस्कृती, परंपरा, संविधान, आधुनिकता यांचा उत्तम संगम येथे झालेला दिसून येतो. नवा भारत जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
तसेच, तो विकसित देश म्हणूनही स्वतःचीओळख प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने आर्थिक प्रगती करत आहे. २०३० पर्यंत विकसनशील देश ते विकसित देश असा नव्या भारताचा प्रवास पूर्ण झालेला असेल. त्यामुळेच या नव्या भारताची आकांक्षापूर्ती करणारे संसद भवन उभे करणे नितांत गरजेचे झाले होते. ती गरज पूर्ण केली गेली. लोकशाही ही व्यवस्था नाही, तर ती एक संस्कृती आहे, परंपरा आहे. लोकशाहीमध्ये घराणेशाही अर्थातच अपेक्षित नाही. तथापि, नेहरू-गांधी परिवाराने लोकशाहीची सर्व मूल्ये सेंगोलसारखीच बासनात गुंडाळून ठेवली होती. त्या घराणेशाहीवरच मोदी यांनी प्रहार केला आहे. लोकशाही हीच आपली प्रेरणा आहे. आपले संविधान, आपला संकल्प आहे, असे ठणकावून सांगत त्यांनी अमृतकाळाचे महत्त्वही अधोरेखित केले आहे.
शेकडो वर्षांच्या गुलामगिरीनंतर स्वतंत्र भारताने आपला प्रवास सुरू केला. अनेक चढउतार, आव्हाने यांच्यावर मात करून तो आता अमृत महोत्सव साजरा करत आहे. नव्या भारताला नवी दिशा देणारा हा काळ, सामान्यांनी स्वप्ने पूर्ण करणारा असाच असणार आहे. नवा भारत महासत्ता होण्याकडे वाटचाल करत आहे. येथील १४० कोटी भारतीय जेव्हा प्रगती करतात, तेव्हा जगही प्रगती करते. नव्या संसदेत घेतलेला प्रत्येक निर्णय येणार्या पिढ्यांना सक्षम करणारा असेल, भारताच्या उज्ज्वल भविष्याचा आधार असेल. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत, विकसित भारत’ करण्यात या नवीन संसदेचा मोठा आधार असेल. ‘आत्मनिर्भर भारता’च्या वाटचालीत नव्या संसदेचे मोलाचे योगदान राहील. सर्वसामान्यांच्या इच्छा-आकांक्षा याची पूर्तीही याच नवीन संसद भवनातून होणार आहे. आत्मनिर्भरतेचे प्रतीक ठरणारी ही नवीन संसद ‘वसुधैव कुटुंबकम’ मंत्रासह संपूर्ण जगाचे कल्याण करणार आहे. तसा संकल्पच पंतप्रधान मोदी यांनी सोडला आहे.