‘क्वाड’चा ड्रॅगनला दणका!

    02-May-2023   
Total Views |
quad 2

'चतुर्भुज सुरक्षा संवाद’ म्हणजेच ’क्वाड’ हा ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि युनायटेड स्टेट्स या चार राष्ट्रांतील धोरणात्मक सुरक्षा संवाद आहे, जो सदस्य देशांतील चर्चेद्वारे राखला जातो. या क्वाडची स्थापना २००७ मध्ये करण्यात आली. व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी करीन जीन-पियरे यांनी आपल्या एका दैनंदिन पत्रकार परिषदेत क्वाडमध्ये नवीन सदस्य जोडण्याची कोणतीही योजना झाली नसल्याचे सांगितले.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन हे बुधवार, दि. २४ मे रोजी तिसर्‍या वैयक्तिक शिखर परिषदेसाठी ऑस्ट्रेलियात भेटणार आहेत. चीन आजवर घेत आलेल्या आक्रमक वृत्तीच्या पार्श्वभूमीवर या शिखर परिषदेत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावरून एकंदरीतच जीन-पियरे यांच्या विधानामुळे चीनचा तणाव आणखी वाढल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे.

क्वाड अजूनही तुलनेने तरुण भागीदारी आहे, त्यामुळे नवीन सदस्य जोडण्याची सध्यातरी कोणतीही योजना नसून क्वाड सदस्यांनी मान्य केले आहे की सध्या ते केवळ क्वाडच्या अनेक सामर्थ्याला बळकट करण्याकडेच लक्षकेंद्रित करतील. बुधवार, दि. २४ मे रोजी सिडनी येथे होणारी शिखर परिषद क्वाडसाठी हवामान, जागतिक आरोग्य, पायाभूत सुविधा आणि आसपासच्या प्रदेशात भागीदारी करण्याच्या इतर संधी दर्शवेल. क्वाडचे सर्वोच्च प्राधान्य हे सुनिश्चित करणे असेल. त्यामुळे सध्या क्वाडच्या एकूण विस्ताराबाबत कोणतीही चर्चा अद्याप झालेली नाही.

चीन हा इंडो-पॅसिफिक सागरी क्षेत्रावर वर्चस्व गाजवण्याच्या सतत प्रयत्नात असतो. त्यामुळे क्वाड सदस्य देशांचा मुख्य शत्रू म्हणून चीनकडे पाहिले जाते. चीनचे नापाक इरादे, चीनकडून होणार्‍या कुरघोड्या रोखण्यासाठी क्वाड ग्रुपचे लोक नेहमीच कार्यरत असतात. गेल्या वर्षी क्वाडची शिखर परिषद जपान येथे झाली होती. इंडो-पॅसिफिक प्रदेशात चीनच्या वाढत्या आक्रमक वृत्तीला आव्हान देणारे अनेक निर्णय एकाच वेळी या परिषदेदरम्यान घेण्यात आल्याने ही सर्वात महत्त्वाची बैठक म्हणून ओळखली जाते.

’पूर्व आणि दक्षिण चीन समुद्रातील सागरी सीमेशी संबंधित संयुक्त राष्ट्रांच्या कायद्यांचे योग्य प्रकारे पालन करण्यासाठी सर्व सदस्य देश सर्वसमावेशक सहकार्य करतील हा त्या निर्णयातील एक बिंदू. याबरोबरच सागरी क्षेत्रात कोणी बळाचा वापर केल्यास त्याला विरोध केला जाईल. असाही निर्णय त्यावेळी घेण्यात आला होता. गेल्या वर्षीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी आणि इतर काही निर्णयांवर राष्ट्राध्यक्ष जो बायडन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान फुमियो किशिदा आणि पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यात यावर्षीच्या बैठकीत विचारमंथन होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

२०२१ मध्ये जेव्हा या देशांची बैठक झाली होती. तेव्हा, क्वाड सेमीकंडक्टरसाठी त्याची ताकद वापरेल याबाबतीत चर्चा झाली होती. परंतु, २०२२ दरम्यान झालेल्या बैठकीनंतर जारी केलेल्या संयुक्त निवेदनात सेमीकंडक्टरच्या वैविध्यपूर्ण आणि स्पर्धात्मक बाजारपेठेसाठी ही ताकद वापरण्याचा निर्णय घेतला असल्याचे क्वाडने सांगितले. यासोबतच क्वाड देशांनी चीनच्या कर्जाखाली असलेल्या देशांना बाहेर काढण्यासाठी सामूहिक धोरण तयार करण्याचा मानसही दाखवला होता. यंदा बुधवार, दि. २४ मे रोजी सिडनी येथे भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या क्वाड अंतर्गत राष्ट्रांची पुढील शिखर बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील यात सहभागी होणार असून, चीन संदर्भात त्यांची यावेळची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज बुधवार, दि. २४ मे रोजी पुढील बैठकीचा घोषणा करत म्हणाले की, “सर्वांसाठी सार्वभौमत्व, सुरक्षा आणि विकास सुनिश्चित करण्यासाठी क्वाड एक मुक्त, स्थिर आणि समृद्ध इंडो-पॅसिफिक प्रदेश तयार करण्यासाठी वचनबद्ध आहे. या बैठकीत एशियन, पैसिफिक आईलैंड फोरम, ‘इंडियन ओशन रिम असोसिएशन’यांसारख्या क्षेत्रातील महत्त्वाच्या संस्थांना सहकार्य कसे करता येईल यावर चर्चा होईल. क्वाड नेत्यांची ही तिसरी बैठक असून विशेषतः चीनला अधोरेखित करणारे कोणत्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा होणार आहे; याकडे सार्‍या जगाचे लक्ष लागून आहे. ऑस्ट्रेलियात ही बैठक पहिल्यांदाच होणार आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक