सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार

    02-May-2023
Total Views |
ind uae

भारत आणि संयुक्त अरब अमिराती या दोन देशांत दरम्यान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार गेल्यावर्षी करण्यात आला. त्याचा वर्धापन दिन नुकताच साजरा झाला. हा आर्थिक भागीदारी करार द्विपक्षीय व्यापार वाढीसाठी प्रोत्साहन देणारा ठरला आहे. त्याचा घेतलेला हा आढावा

भारत आणि संयुक्त अरब अमिराती या दोन देशांत सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार झाला, त्याच्या अंमलबजावणीचा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. हा आर्थिक भागीदारी करार द्विपक्षीय व्यापारासाठी वाढीचे इंजिन ठरला आहे. विशेषतः भारताची निर्यात लक्षणीय अशी वाढली आहे. भारतीय वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी उभय देशांमध्ये या कराराने बजावलेल्या भूमिकेचे कौतुक केले आहे. निर्यातीचे विकास इंजिन असे याला संबोधित केले, तर काहीही चुकीचे ठरणार नाही. दि. १८ फेब्रुवारी, २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रपती तसेच अबू धाबीचे शासक शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांनी एका परिषदेत या करारावर स्वाक्षरी केली. त्याची अंमलबजावणी दि. १ मे, २०२२ पासून सुरू झाली.

दोन्ही देशांमधील व्यापार सुलभ होण्यासाठी दोन्ही बाजू एकत्रितपणे काम करत आहेत. त्याचबरोबर उद्योग प्रतिनिधींनी आपापल्या क्षेत्रात लक्षणीय वाढ नोंदवण्यासाठी या कराराचा लाभ घेतला.सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारअंतर्गत भारताच्या संयुक्त अरब अमिराती सोबतच्या द्विपक्षीय व्यापार संबंधांवर विशेषतः भारताच्या निर्यात क्षेत्रावर प्रभावी परिणाम झाला आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ या दरम्यान द्विपक्षीय व्यापाराने ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. दोन्ही देशांमधील व्यापार ७२.९ बिलियन डॉलर वरून ८४.५ बिलियन डॉलर इतका वाढला आहे. यात १६ टक्के वाढ नोंद झाली. या करारा अंतर्गत मे २०२२ ते मार्च २०२३ द्विपक्षीय व्यापार ६७.५ अब्ज डॉलरवरून ७६.९ अब्ज डॉलर इतका वाढला. यात १४ टक्के वार्षिक वाढ नोंदवली गेली. भारतातून संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या निर्यातीनेही अनेक वर्षांचा उच्चांक नोंदवला आहे.

भारताची निर्यात २८ अब्ज डॉलरवरून ३१.३ अब्ज डॉलर इतकी वाढली आहे. याच कालावधीत भारताची जागतिक निर्यात केवळ ५.३ टक्के इतकी वाढली, हे स्पष्ट होत आहे. आयातीचा विचार केला, तर गेल्या एक वर्षांत भारताने ५३.२ अब्ज डॉलर इतकी आयात केली. यात वार्षिक १८.८ टक्के इतकी वाढ झाली. या दरम्यान बिगर तेल आयात ४.१ टक्के वाढली. या कराराअंतर्गत निर्यातीत लक्षणीय वाढ झालेल्या कामगार केंद्रित क्षेत्रांसह खनिज इंधन, इलेक्ट्रिकल मशिनरी, रत्ने व दागिने, ऑटोमोबाईल्स, सौंदर्य उत्पादने, अन्य यंत्रसामग्री तृणधान्ये, चहा कॉफी मसाले व इतर कृषी उत्पादने यांचा समावेश आहे. प्रत्येक महिन्यात उभय देशांत या कराराअंतर्गत सातत्याने व्यापार वृद्धी होताना दिसून येते आहे.

या कराराअंतर्गत २०२२ मध्ये ४१५ व्यवहार नोंद झाले होते, ते आता ८ हजार, ४४० इतके झाले आहेत. गेल्या ११ महिन्यांत सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारअंतर्गत ५४ हजारांहून अधिक व्यवहार नोंद झाले. संयुक्त अरब अमिरातीने भारतातून आयात केलेल्या जवळपास सर्वच वस्तूंवरील आयात शुल्क हटवले आहे. भारतानेही ८० टक्क्यांपेक्षा जास्त आयातीवरील शुल्क माफ केले आहे. यात तेल बिया आणि तेल, शीतपेये, कापूस, मत्स्य व मत्स्य उत्पादने, कापड, रत्ने, दागिने आणि औषधे यासारख्या श्रमकेंद्रित उद्योग क्षेत्राशी संबंधित उत्पादनांचा संबंध आहे. सेवा क्षेत्राशी संबंधित सर्वच क्षेत्रांमध्ये आणि पुरवठ्याच्या पद्धतीमध्ये व्यापक आणि सखोल वचनबद्धता स्वीकारण्यात आली आहे. १६० सेवा उपक्षेत्रांपैकी भारताने संयुक्त अरब अमिरातील १०० उपक्षेत्रे देऊ केली आहेत, तर भारताला १११ उपक्षेत्रे मिळालेली आहेत.

द्विपक्षीय व्यापारात झालेली वाढ विचारात घेता, विशेषतः भारतीय बनावटीच्या वस्तू आणि सेवांच्या निर्यातीत या कराराचा ‘जीडीपी’ तसेच रोजगार यासारख्या प्रमुख आर्थिक घटकांवर सकारात्मक परिणाम झालेला दिसून येतो. या कराराने भारताने केलेल्या अन्य सर्व मुक्त व्यापार करारांना मागे टाकले आहे. हा करार ऐतिहासिक करार म्हणून ओळखला जाणारा आहे. द्विपक्षीय व्यापार वृद्धिंगत होण्यासाठी भारताने केलेला हा पहिला करार आहे. तो अधिक विस्तृत असून, भारताच्या आर्थिक सहभागाच्या सर्व पैलूंचा यात समावेश आहे. व्यापार, गुंतवणूक, आरोग्य सेवा, डिजिटल व्यापार आदी अनेक क्षेत्रांचा सहभाग यात केला गेला आहे.

तसेच, या कराराने द्विपक्षीय व्यापारात नवीन संधी उपलब्ध करून दिल्या असून, येत्या पाच वर्षांत हा व्यापार १०० अब्ज डॉलर इतका वाढेल, तर सेवा क्षेत्रांमधील व्यापार १५ अब्ज डॉलरपर्यंत वाढणे अपेक्षित आहे. या कराराअंतर्गत व्यापारात झालेली एकूण वाढ, ही उभय देशांसाठी किती नव्या संधी निर्माण करणारी आहे, हेच दाखवून देते. ऊर्जा, अन्नसुरक्षा, शिक्षण आणि आरोग्य सेवेशी संबंधित इतर अनेक महत्त्वपूर्ण भागीदारी सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्याचा उभय देशांना किती फायदा होतो, हे लवकरच समजून येईल. भारताने सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार प्रत्यक्षात आणून भारतातील उत्पादनांसाठी, तसेच सेवा क्षेत्रासाठी एका नव्या देशाची द्वारे उघडली आहेत आणि त्याचा फायदा उद्योजकांना होताना दिसून येतो आहे. खर्‍या अर्थाने हा सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार ठरला आहे, हे नक्कीच!