हेलमंद नदी आणि...

    19-May-2023   
Total Views |
iran

आमचे सरकार इराणी जनतेच्या मागणीनुसार जलआपूर्ती करण्यासाठी कटिबद्ध आहे. हेलमंद नदी करारानुसार अफगाणिस्तानने इराणमधील सिस्तान आणि बलुचिस्तान प्रांताला पाणीपुरवठा करावी. अफगाणिस्तानच्या तालिबानी सरकारने हे गांभीर्याने घ्यावे. म्हणजे नंतर त्यांना कोणतीच तक्रार करण्याची परिस्थिती येणार नाही,” असे इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रायसिन म्हणाले.

राष्ट्रपतींच्या म्हणण्याचा अर्थच असा होतो की, जर हेलमंद नदी करारानुसार इराणच्या सिस्तान आणि बलुचिस्तान प्रांताला पाणी मिळाले नाही, तर इराण अफगाणिस्तानवर हल्ला करेल.त्यानंतर अफगाणिस्तानचे तालिबानी सरकार तक्रारीशिवाय काहीच करू शकणार नाही. इब्राहिम रायसिन यांच्या एक प्रकारच्या धमकीला तालिबानी प्रशासनाने काय उत्तर दिले? तर तालिबानी प्रभावाच्या जनरल मोबिनने अफगाणिस्तानातून वाहत असणार्‍या हेलमंद नदीच्या प्रवाहातून एका पिवळ्या बॅरलमधून पाणी भरले. ते पाण्याने भरलेले बॅरेल घेऊन मोबिन म्हणाला, “मिस्टर रायसिन, हे पाण्याने भरलेले बॅरल घ्या. पण,आमच्यावर हल्ला नका करू.

मोबिन यांची कृती पाहून अनेक जण अनेक मत मांडतील.” सत्याग्रह वगैरेची पार्श्वभूमी असलेल्या आपल्या भारतीयांना तर नक्कीच वाटेल की, मोबिनने हेलमंद नदीतून बॅरलभर पाणी भरले म्हणजे, तो एक प्रकारचा सत्याग्रह असू शकतो. पण, जागतिक अभ्यासकांचे म्हणणे आहे की, जनरल मोबिनने आपल्या कृत्यातून ‘युद्घ नको, हल्ला नको’ वगैरेचा निरोप दिला नाही, तर उलट जनरल मोबिनने पिवळ्या बॅरलमधून हेलमंद नदीचे पाणी भरून इराणच्या राष्ट्रपतीला द्यायची जी कृती केली आणि वर या कृतीचा व्हिडिओ बनवनू तो जगजाहीर केला, या सगळ्याचा अर्थ वेगळाच आणि तालिबानी मनोवृत्तीला साजेसा आहे. तालिबानी दहशतवादी आणि पिवळ्या रंगाचा बॅरल यांचा एक प्रतिकात्मक संबंध आहे. तालिबानी आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवणार्‍यांच्या हातात किंवा आजूबाजूला पिवळ्या रंगाचा बॅरल असतोच असतो. ती त्यांची प्रतिकात्मक ओळखच म्हणा. याचाच अर्थ जनरल मोबिनने इराणच्या राष्ट्रपतीलाच एकप्रकारे धमकी दिली आहे की, हा पिवळा बॅरल लक्षात घ्या आणि आमच्यावर म्हणजे तालिबान्यांवर हल्ला करू नका!

हेलमंद नदी ही अफगाणिस्तानमधील सर्वांत लांब नंदी आहे. तिची लांबी १,१५० किमी आहे. अफगाणिस्तानच्या हेलमंद कंधार निर्मुज प्रांत तर दुसर्‍या बाजूला इराणच्या सिस्तान बलुचिस्तान प्रांताला या नदीच्या पाण्याचा फायदा होतो. अफगाणिस्तान आणि इराणच्या सीमाभागातले जनजीवन या नदीमुळे तग धरून आहे. त्यामुळेच दोन्ही देशांनी १९७३ साली करार केला, त्यानुसार अफगाणिस्तानने इराणला हेलमंद नदीचे ८२० दशलक्ष क्युबिक मीटर पाणी द्यायचे. त्यानुसार इतके पाणी इराणला मिळेल याची शाश्वती राखत या नदीवर अफगाणिस्तानमध्ये धरण वगैरे बांधले जाणार नाही, पाणी अडवले जाणार नाही. इराणचे म्हणणे की, अफगाणिस्तान ठरवल्याप्रमाणे इराणला पाणी मिळवू देत नाही. १९९८ साली तालिबान्यांनी अफगाणी, शिया आणि इराणी राजनयिकांना मारण्याचे फर्मान काढले. क्रूर हिंसा आरंभली. मात्र, त्यावर इराणने लगेचच २७ हजार सैनिक अफगाण सीमेवर तैनात केले. तत्कालीन अफगाण सरकारने हेलमंद नदीचा प्रवाहच रोखला. त्यामुळे हेलमंद नदीचा इराणला होणारा पाणीपुरवठा थांबला. १९९८ साली अफगाणी सरकारने हेलमंद नदीचे पाणी अडवल्यामुळे इराणची परिस्थिती गंभीर झाली. पुढे २००२ साली अफगाण सरकारने हेलमंदचे कराराचे निर्बंध पाळायला थोडेपार सुरू केले.

इराणमध्ये तसेही पाऊस जास्त पडत नाही. इराणमध्ये प्रत्येक वर्षी सरासरी २४० से २८० मिलीमीटरच पाऊस पडतो. हे वैश्विक किमान सरासरीच्या ९९० मिलीलीटरपेक्षाही कमी आहे. त्यामुळे इराणला अवर्षणाचा फटका बसत असतो. त्यामुळे इराण सरकार अफगाणिस्तान सरकारला हेलमंद नदीचा करार पाळा असे सांगत असते. हेलमंद नदीच्या विवादामुळे एकमेकांचे पुन्हा शत्रू झाले. हेलमंद नदीच्या पाण्याने दोन मुस्लीम राष्ट्रांना आपसात शत्रू केले. दोन देशातले ‘मुस्लीम बद्ररहूड’ कुठे बरे गेले? इराण आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशात महिलांची स्थिती जवळजवळ सारखीच आहे. म्हणजेच इराण आणि अफगाणिस्तान यांचे ‘मुस्लीम बद्ररहूड’ केवळ ‘हिजाब’ आणि ‘शरिया’ कायद्यापुरताच आहे की काय?
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.