तलाक आणि मालदीव

    17-May-2023   
Total Views |
maldives

मोरोक्कोचा इब्न बतुता हा १३४३ साली मालदीवमध्ये आला होता. मोरोक्कोमधल्या त्याच्या प्रवासाबाबत तो लिहितो की, ”मोरोक्कोच्या निवासामध्ये मी फार थोड्या कालावधीमध्ये सहा वेळा लग्न केले आणि तितकेच वेळा घटस्फोट घेतले. इथले पुरूष मासेमारीसाठी समुद्रामध्ये जातात. हे लोक द्वीपावर मन रमेल तिथे राहतात. कोणतेही मागचे बंध नको, म्हणून ते घटस्फोट देतात. त्यामुळे इथे घटस्फोटित महिलांचे प्रमाण जास्त आहे.” १३४३ मध्ये इब्न बतुताने मालदीवमधील घटस्फोटाबद्दल केलेली ही वाच्यता. पण, मग आज या मालदीवची परिस्थिती नेमकी काय? तर नुकत्याच जाहीर झालेल्या ‘ग्लोबल डिव्होर्स स्टॅटिस्टिक्स’नुसार, मालदीवमध्ये सगळ्यात जास्त घटस्फोटाचा दर आहे. इथे घटस्फोटाचा दर १०.९७ टक्के आहे. म्हणूनच बहुसंख्य घटस्फोट घेणार्‍यांचा देश म्हणून ‘गिनीज बुक ऑफ रिकॉर्ड्स’मध्ये या देशाची नोंदही झाली आहे.

असो. तर मालदीव हे एक इस्लामिक राष्ट्र असून इथे ‘शरिया’ कायदा चालतो. ‘आज मला कंटाळा आला आहे,’ असे कुणी सहजगत्या म्हणेल, तितक्या सहजपणे इथले पुरूष ‘तलाक...तलाक...तलाक’ म्हणत त्यांच्या पत्नीला घटस्फोट देतात. एका सर्वेक्षणानुसार, वयाच्या ३०व्या वर्षापर्यंत येथील महिलांचा तीन वेळा तरी घटस्फोट झालेला असतो. काही वर्षांपूर्वी या देशात एका १५ वर्षीय मुलीला विवाहाआधी लैंगिक संबंंध ठेवले म्हणून १०० कोडे मारण्याची शिक्षा सुनवण्यात आली होती. मात्र, या कृत्यात सहर्ष सहभागी झालेल्या त्या पुरूषाला मात्र शिक्षा दिली गेली नाही. इथल्या महिलांसाठी ‘हिजाब’ घालणे सक्तीचे आहे, हे काय सांगायला हवे.

मालदीवमध्ये कट्टरपंथी चांगलेच सक्रिय. चार वर्षांपूर्वी मालदीव सरकारने एका बेटावर मोठी कारवाई केली. इथले काही मुस्लीम सीरियाला गेले होतो. तिथून परतल्यावर त्यांनी मालदीवच्या त्या बेटावर बस्तान बसवले. त्यांनी इथल्या शाळा बंद केल्या. मुलांना रोगप्रतिबंधक लस देणे सक्तीने थांबवले. तसेच, महिलांना घर सोडून बाहेर निघण्यास कडक प्रतिबंध लादले. नव्हे, महिलांचा घराबाहेरच्या जगाशी संपर्कच तोडायला लावला. मालदीव प्रशासनाला याचा सुगावा लागला आणि त्यांनी कडक कारवाई करून बेटावरील कुटुंबाची सुटका केली, गुन्हेगारांना अटक केली.

दुसरीकडे जसे पाकिस्तानमध्ये भारतविरोधी बोलले, तरच तिथल्या नेत्यांची चूल पेटते तसेच काहीसे चित्र मालदीवमध्येही. मालदीवमधील ‘प्रोगेसिव्ह पार्टी ऑफ मालदीव’ या पक्षाचा नेता अब्दुल्ला यामिन हा चीनचा समर्थक. तो मालदीवचा राष्ट्रपती असताना चीनने मालदीवमध्ये पाय रोवायलाही सुरुवात केली होती, तर याच्या पक्षाने मालदीव सरकारने आयोजित केलेल्या योग दिन कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या लोकांवर हल्ला केला. योग इस्लामच्या विरोधात आहे, असे त्यांचे म्हणणे. अब्दुल्ला यामिनने राष्ट्रपती असताना ‘इंडिया आऊट’ म्हणत मालदीवमध्ये एकही भारतीय नको, असे अभियानही चालवले. मात्र,सत्तेतून पायउतार झाल्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली त्याला ११ वर्षांची शिक्षा झाली, ही गोष्ट वेगळी. याच मालदीवमध्ये काही वर्षांपूर्वी तिथल्या राष्ट्रीय संग्रहालयातील बुद्धाच्या आणि हिंदू देवीदेवतांच्या ३५ प्राचीन मूर्ती इस्लामी कट्टरपंथीयांनी तोडल्या होत्या, तर असा हा कट्टरपंथी मालदीव!

या मालदीवमध्ये १३व्या शतकात कसे वातावरण होते, याबाबत पुन्हा इब्न बतुताने काय लिहिले ते पाहूया. तो मालदीवमधल्या महिलांबाबत रोष प्रगट करताना म्हणतो, ”मालदीवमधले लोक, महिला मुस्लीम आहेत. महिला सुंदर आहेत आणि मोकळ्या वृत्तीच्या आहेत. मात्र, या महिला मुस्लीम प्रथेप्रमाणे ‘हिजाब’ने डोके चेहरा किंवा शरीर झाकत नाहीत.” याचाच अर्थ १३व्या शतकात इथे मुस्लीम धर्म चांगलाच रूजला होता. पण, धर्मांतरितांनी मुस्लीम रिवाज आणि संस्कृती स्वीकारली नव्हती. तसे पाहायला गेले, तर इस्लामने १२व्या शतकामध्ये मालदीवमध्ये प्रवेश केला. मात्र, २०व्या शतकापर्यंतही इथे इस्लामिक कट्टरता नव्हती. पण, गेल्या काही दशकांतच इथे इस्लामिक कट्टरता वाढली. या पाश्वर्र्भूमीवर मालदीवमधले वाढते घटस्फोट म्हणजे इथल्या महिलांच्या अस्थिर जीवनाचे मानक आहे. एकदा का शोहरने ‘तलाक... तलाक...तलाक’ म्हटले की, मालदीवच्या त्या महिलेकडे घटस्फोट स्वीकारण्याशिवाय पर्यायच नसतो. या आयामात भारतीय मुस्लीम भगिनींचे सौभाग्यच म्हणायला हवे की त्या भारतात जन्मल्या!
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.