जलजीवन मिशनने ओलांडला १२ कोटी नळजोडणीचा टप्पा

देशभरातील ९ लाख शाळांमध्ये शुद्ध पाण्याचा पुरवठा

    17-May-2023
Total Views |
Jal Jeevan Mission: 12 crore rural households provided tap water connections so far

नवी दिल्ली
: केंद्र सरकारच्या जलजीवन मिशनने १२ कोटी नळजोडणाचा टप्पा ओलांडून मोठे यश साध्य केले आहे. त्याचप्रमाणे ९.०६ लाख शाळा आणि ९.३९ लाख अंगणवाड्यांमध्येही नळावाटे शुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे.

जलजीवन मिशन अंतर्गत आतापर्यंत गोवा, तेलंगणा, हरियाणा, गुजरात आणि पंजाब ही पाच राज्ये आणि पुदूच्चेरी, दीव – दमण आणि दादरा – नगरहवेली, अंदमान निकोबारमया तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये नळजोडणीने १०० टक्क्यांचा टप्पा गाठला आहे. हे प्रदेश हे 'हर घर जल प्रमाणित’ राज्ये/केंद्रशासित प्रदेश आहेत. म्हणजे या राज्ये /केंद्रशासित प्रदेशांमध्ये गावकऱ्यांनी ग्रामसभांद्वारे गावातील 'सर्व घरे आणि सार्वजनिक संस्थाना पुरेसा, सुरक्षित आणि नियमित पाणी पुरवठा मिळेल’ हे सुनिश्चित केले आहे. त्याचप्रमाणे हिमाचल प्रदेशात ९८.३ तर बिहारमध्ये ९६.५ टक्के यश योजनेस प्राप्त झाले असून येथेही लवकरच १०० टक्क्यांचा टप्पा गाठला जाणार आहे.

केंद्र आणि राज्य सरकारांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे देशातील 9.06 लाख (88.55%) शाळा आणि 9.39 लाख (84%) अंगणवाडी केंद्रांमध्ये नळाद्वारे पाण्याची व्यवस्था झाली आहे. योजनेच्या प्रारंभी केवळ 21.64 लाख (7.84%) कुटुंबांना नळाद्वारे पाण्याची सुविधा उपलब्ध होती जी आता 1.67 कोटी (60.51%) वर गेली आहे. त्याचप्रमाणे जलजीवन मिशनच्या प्रारंभाच्या वेळी, 1.79 कोटी लोकसंख्या असलेल्या 22,016 वस्त्या (आर्सेनिक- 14,020, फ्लोराईड- 7,996), पिण्याच्या पाण्यातील आर्सेनिक - फ्लोराइड दूषित पाण्यामुळे 1.79 कोटी लोकसंख्या (आर्सेनिक-1.19 कोटी, फ्लोराईड-0.59 कोटी) बाधित झाल्या होत्या. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या अहवालानुसार, आता सर्व आर्सेनिक - फ्लोराइड-प्रभावित वस्त्यांमध्ये पिण्याचे सुरक्षित पाणी उपलब्ध आहे.
 
अशी आहे महाराष्ट्राची प्रगती


महाराष्ट्रात आतापर्यंत (१७ मे २०२३ पर्यंत) जलजीवन मिशन अंतर्गत एकूण १९ कोटी ४४ लाख ७८ हजार ८९१ घरांपैकी १२ कोटी १ लाख ४ हजार २९३ म्हणजे ६१.७६ टक्के घरांमध्ये नळावाटे शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्याचप्रमाणे राज्यातील ७८ हजार १०२ शाळांपैकी ७६ हजार ३०८ शाळांमध्ये म्हणजे ९७ टक्के शाळांमध्ये नळावाटे पाणीपुरवठा केला जात आहे.