एलाॅन मस्क नमला, ‘टेस्ला’ची निर्मिती भारतातच होणार

    17-May-2023
Total Views |
tesla

नवी दिल्ली
: अवघ्या जगाला आकर्षण असलेल्या टेस्ला या इलेक्ट्रिक कारची निर्मिती भारतात होण्याची शक्यता वाढली असून, ‘टेस्ला’चे सीईओ एलाॅन मस्क यांनी अखेर नमते घेत भारताच्या धोरणांना अनुकूलता दाखवली आहे. त्यातुनच कंपनीचे वरिष्ठ अधिकारी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, टेस्ला कंपनी चीनला सोडून भारतासोबत आपला व्यवसाय वाढवण्यावर भर देत आहे. टेस्लाचे सीईओ एलाॅन मस्क यांनी भारताच्या उच्च आयात करांवर आणि इलेक्ट्रिक-वाहन धोरणांवर टीका केली होती. मात्र त्यांनी आता आपली भूमिका बदलली असून टेस्लाच्या कारची निर्मिती भारतातच होणार आहे. त्यावर येत्या काही दिवसात शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

टेस्लाचे शिष्टमंडळ भारत भेटीवर येत आहे. यात एक्झिक्युटिव्ह्जमध्ये सी-सूट एक्झिक्युटिव्ह आणि मॅनेजर यांचा समावेश असेल जे कंपनीच्या पुरवठा विभागाची देखरेख करतात. या अधिकार्‍यांच्या भारत भेटीचा उद्देश टेस्ला कारची देशात विक्री आणि वितरण संबंधित चर्चा करणे हा आहे. टेस्ला कंपनीला भारतात इलेक्ट्रिक वाहनांसाठी निर्माण झालेल्या सकारात्मक वातावरणाचा फायदा घ्यायचा आहे. कारण भारत इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला सतत प्रोत्साहन देत आहे, ज्यामुळे जीवाश्म इंधनामुळे होणारे प्रदूषण कमी होत आहे.

भारतात इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ सातत्याने वाढत आहे. भारतीयांची निवड पाहून अनेक परदेशी कंपन्यांनी इलेक्ट्रिक मार्केटमध्ये व्यवसायामध्ये उतरत आहेत. मर्सडीज, ह्युदई, वाल्वो, बीएमडब्ल्यू कीया अशा अनेक कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी भारतात एकापेक्षा जास्त इलेक्ट्रिक वाहने ऑफरमध्ये ठेवली आहेत.

नितीन गडकरी यांची भूमिका फलदायी

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या वर्षी, या संदर्भात टेस्लाच्या प्रस्तावाला उत्तर देताना म्हटले होते की, “जर टेस्ला भारतात आपली इलेक्ट्रिक वाहने तयार करण्यास तयार असेल तर काही अडचण नाही परंतु कंपनीने चीनमधून कार आयात करू नये. भारतात विक्रेते उपलब्ध आहेत. आमच्याकडे सर्व प्रकारचे तंत्रज्ञान आहे, आमच्याकडे सर्व सुटे भाग आहेत. सरकारने कंपन्यांना इलेक्ट्रिक वाहनांवरील कस्टम ड्यूटी आणि करात मोठी सवलत दिली आहे.” गडकरी यांची ही ठाम भूमिका फायदेशीर ठरली आहे. त्यातुनच एलाॅन मस्क यांनी नमते घेत चीनऐवजी भारतातच टेस्लाची कार निर्माण करण्यास अनुकूलता दर्शविली आहे.