खालापूरमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन

    15-May-2023
Total Views |
prashant thakur

खोपोली
: खालापूर तालुक्यातील अष्टविनायक क्षेत्र असलेल्या महड येथे अलीकडेच गोवंश हत्या प्रकरण झाले होते. या घटनेने संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली होती. सर्व हिंदू संघटना, वारकरी संप्रदाय व जैन संघटनांच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजाच्या वतीने सोमवारी खालापूर तहसील कार्यालयावर भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाचे नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.

खालापूर फाटा येथून निघालेल्या या निषेध मोर्चात भाजपचे जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे, दीपक बेहेरे, उपाध्यक्ष वसंत भोईर, निवृत्ती पिंगळे, मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, किसान मोर्चाचे सुनील गोगटे, जिल्हा कोषाध्यक्ष सनी यादव, तालुकाध्यक्ष रामदास ठोंबरे, शशिकांत मोरे, किरण ठाकरे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री रमेश मोगरे, साईनाथ श्रीखंडे, रूपेश मिस्त्री, रवींद्र जैन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अविनाश मोरे, राकेश पाठक, वारकरी संप्रदायाचे प्रवीण महाराज फराट, दिलीप महाराज राणे, भाजप खोपोली अध्यक्ष रमेश रेटरेकर, महिला मोर्चा अध्यक्ष शोभा काटे, सरचिटणीस अश्विनी अत्रे, स्नेहल सावंत, भाजप सरचिटणीस हेमंत नांदे, युवा मोर्चा अध्यक्ष अजय इंगुलकर, सोशल मीडिया सेलचे राहुल जाधव, राष्ट्रसेविका समिती जिल्हा सहकार्यवाह माधवी कुवळेकर यांच्यासह विविध संघटनांचे व राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, हजारो कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.

तहसील कार्यालयात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदार आयुब तांबोळी यांना निवेदन दिले. गोमाता आमची माता आहे आणि गोवंश हत्या प्रकरणे या भागात वारंवार घडत असतील तर यांचा आम्हाला विचार करावा लागेल. गोवंश हत्या हा हिंदू धर्माच्या अस्मितेचा प्रश्न झाला आहे. त्यामुळे यापुढे असा प्रकार घडू नये याची प्रशासनाने काळजी घ्यावी तसेच आरोपींना कडक शासन व्हावे, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी केली.