कर्करोगग्रस्तांना सकारात्मकतेचा दिलासा

    15-May-2023
Total Views |
cancer

सकारात्मक विचार केल्याने कर्करोगावर मात करण्याचा, भावनिक अडचणीचा प्रवास खरोखरच सोपा होऊ शकतो. त्या व्यक्तीला कोणतेही दु:ख, राग किंवा त्रास व्यक्त करण्यात सहज वाटते. अशा भावनांकडे दुर्लक्ष केल्याने किंवा दडपून टाकल्याने व्यक्ती अत्यंत निराश होतात. त्यांना एकटे वाटू शकते. एक सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक असतानादेखील, व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना इतर कमी सकारात्मक भावना व्यक्त करण्यासाठीदेखील संधी मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे कर्करोगाविरूद्धच्या लढाईत नेहमी आनंदी चेहरा ठेवण्याच्या अपेक्षांनी भारावून जाऊ नये, हेदेखील लक्षात ठेवा.

कर्करोग या शब्दाचा संदिग्ध स्वरूपात उल्लेख केल्यानेसुद्धा अनेकदा तणाव, चिंता आणि नकारात्मक भावनेची भर पडते. परंतु, हे नेहमीच शक्य नसते. कर्करोगासह जगणे आणि त्याचे उपचारभयावह असू शकतात. कर्करोगाने ग्रस्त लोकांना सातत्याने सकारात्मक होण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. तुम्हाला तुमच्या भविष्याबद्दल अनिश्चितता आणि काळजी वाटू लागते. सकारात्मक दृष्टिकोन कर्करोगाच्या रुग्णाला दिलासा देण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे, हे प्रत्येकाला मान्य आहे. जेव्हा आपल्या जीवनात सर्वकाही आलबेल चाललेले असते, तेव्हा आपला दृष्टिकोन सकारात्मकतेकडे बदलणे, ही एक गोष्ट आहे आणि जेव्हा आपल्या जीवनावर कर्करोगासारख्या विनाशकारी आजाराचा परिणाम होतो, तेव्हा सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करणे, ही दुसरी गोष्ट आहे. कर्करोग आपल्याबरोबर आपल्या भोवतालचे सर्व वातावरणात भयग्रस्त करून, कुटुंबात आणि मित्रमंडळींमध्ये निराशा आणू शकतो. आजाराचे निदान झालेल्या व्यक्तीसाठीच नव्हे, तर त्याच्या हितचिंतकांसाठीही हा बिकट काळ असू शकतो.

कर्करोग उपचाराच्या काही पर्यायी पद्धतीदेखील सकारात्मक विचार आणि मनाच्या सामर्थ्याने कर्करोग बरा करणे शक्य असल्याचा दावा करतात. तथापि, हे सामान्यतः न तपासलेले आणि कुचकामी उपचारांचे प्रकार आहेत, जे केवळ शेवटचा उपाय शोधत असलेल्या असुरक्षित लोकांचा बळी घेण्याचा प्रयत्न करतात. कर्करोगाची दीर्घकालीन प्रगती आणि परिणाम हे व्यक्तीची लढाऊ वृत्ती, भावनांची सकारात्मक अभिव्यक्ती, आशावादआणि सामाजिक आधार यावर बर्‍याच अंशी अवलंबून असतात. दुर्दैवाने कर्करोगाच्या जगण्याशी सकारात्मक दृष्टिकोन थेट जोडणारा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही, हे तथ्य आहे. कारण, हा एक असा दुवा आहे, ज्यावर भूतकाळात क्वचितच अभ्यास किंवा संशोधन केले गेले आहे. तथापि, आजच्या आधुनिक युगात असे काही अभ्यास आहेत, ज्यांनी सकारात्मक विचारसरणीतगुंतलेल्या कर्करोगाच्या रुग्णांना पुन्हा रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता इतरांपेक्षा कमी आहे, हे सिद्ध केले आहे. सकारात्मक विचार आणि कर्करोग यांच्यातील थेट संबंध जाणून घेण्यासाठी काही क्लिनिकल चाचण्यादेखील सध्या अभ्यासल्या जात आहेत.

सकारात्मक राहण्याची संपूर्ण कल्पना ही खरोखर एक दुधारी तलवार असल्यासारखे वाटते. कारण, ती काही लोकांना स्पष्टपणे मदत करू शकते. परंतु, त्याचवेळी कर्करोगाच्या निदानानंतर जेव्हा नकारात्मक भावना (उदा. उदास, राग, काळजी) नैसर्गिकपणे येतात, तेव्हा कोणी किती सकारात्मक राहू शकेल, याची कल्पना करणे कठीण आहे. जर आशादायक विचारसरणी आणि कर्करोगामधून वाचणे यांच्यात कोणताही वैज्ञानिक संबंध सिद्ध झाला नसेल, तर कर्करोगाशी लढा देत असताना सकारात्मक राहण्यावर लक्ष केंद्रित करण्यात काय अर्थ आहे? हा एक वैध प्रश्न पडतो. तथापि, कर्करोगाच्या उपचारादरम्यान सकारात्मक विचारांना प्रोत्साहन देण्याचे अनेक मानसिक फायदे आहेत. कर्करोगासारखा विध्वंसक रोग एखाद्या व्यक्तीच्या शरीरावरच परिणाम करत नाही, तर त्याच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावरही विघातक परिणाम करतो. कर्करोगाच्या रुग्णावर रोगाच्या शारीरिक परिणामांवर उपचार करण्यासाठी नियमितपणे उपचार सुरू असताना, ते कदाचित त्यांच्या मनावर होणार्‍या भावनिक उद्वेगाकडे दुर्लक्ष करत असतील. तसेच कर्करोगाचा आजार झाल्याचे निदान झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील इतर सदस्यही कदाचित भीती, खेद, निराशा किंवा असाहाय्यतेच्या भावनांशी झुंजत असतील.

एक आशाजनक मानसिकता कर्करोगाचे निदान झालेल्या लोकांना त्यांच्या जीवनातील अधिक विधायक पैलूंवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करू शकते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, कर्करोगासारख्या गंभीर आजाराशीकाही प्रमाणात विश्वास, आशावाद आणि विनोद रुग्णाच्या जीवनाची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात सुधारू शकतात. म्हणूनच, एखाद्याचा मूड हलकाफुलका करण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न करणे किंवा केवळ सकारात्मक घडामोडींवर लक्ष केंद्रित करणे, कर्करोगावर मात करण्याच्या प्रवासात रुग्णाला खूप पुढे नेऊ शकते. सकारात्मक विचारांमुळे भीती आणि रागाच्या नकारात्मक भावनांनाही आळा बसू शकतो आणि चिंता आणि नैराश्यासारख्या मानसिक आरोग्याच्या परिस्थितीला बळी पडणे रुग्णांना टाळता येते. शिवाय, उपचारांच्या टप्प्यात त्यामुळे त्यांची वैद्यकीय आणि शारीरिक उपचार स्वीकारण्याची क्षमता, तसेच मानसिक लवचिकता सुधारू शकते.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, कर्करोगाच्या रुग्णांना, त्यांच्या उपचाराच्या विविध टप्प्यात त्यांच्या प्रियजनांकडून मिळालेल्या प्रेम, दया आणि समर्थनाबद्दल त्यांचे योगदान ओळखण्यास आणि कृतज्ञता वाटण्यास मदत करू शकते. नवीन संशोधनानुसार, सकारात्मक विचारांची शक्ती कर्करोगाच्या रुग्णांना त्यांची रोगप्रतिकारकशक्ती वाढवून दीर्घकाळ जगण्यास मदत करू शकते. ब्रिटिश सायकोलॉजिकल सोसायटीच्या परिषदेत सादर केलेल्या संशोधनात कर्करोगाचे निदान झालेल्या आणि ’विश्रांती’ (relaxation)तंत्रात प्रशिक्षित झालेल्या महिलांनी रोगाशी लढण्यासाठी सुसज्ज असलेल्या पेशी कशा विकसित केल्या याचे वर्णन केले आहे.

सकारात्मक विचार केल्याने कर्करोगावर मात करण्याचा, भावनिक अडचणीचा प्रवास खरोखरच सोपा होऊ शकतो. त्या व्यक्तीला कोणतेही दु:ख, राग किंवा त्रास व्यक्त करण्यात सहज वाटते. अशा भावनांकडे दुर्लक्ष केल्याने किंवा दडपून टाकल्याने व्यक्ती अत्यंत निराश होतात. त्यांना एकटे वाटू शकते. एक सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक असतानादेखील, व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना इतर कमी सकारात्मक भावना व्यक्त करण्यासाठीदेखील संधी मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे कर्करोगाविरूद्धच्या लढाईत नेहमी आनंदी चेहरा ठेवण्याच्या अपेक्षांनी भारावून जाऊ नये, हेदेखील लक्षात ठेवा. निराश असलेल्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीबद्दल दुःखी वाटणे पूर्णपणे सामान्य आहे. दुःखाचे कारण माहीत असताना दु:ख व्यक्त न केल्याने व नेहमी धाडसी चेहरा ठेवून, आपण कदाचित आपल्या सभोवतालच्या लोकांसमोर, दुःखी असलेल्या गोष्टींबद्दल बोलणे योग्य नाही, असे दर्शवित असू. रडण्यामुळे उचंबळून येणार्‍या आंतरिक भावनांची निरोगी मुक्तता होऊ शकते आणि त्या भावनांना मुक्त करण्यासाठी रुग्णांना सुरक्षित संधी प्रदान करणे केव्हाही उत्तम. उद्ध्वस्त वाटण्याच्या सुरुवातीच्या कालावधीनंतर अनेक सकारात्मक व्यक्तींनी अत्यंत जाणीवपूर्वक जगण्याचा निर्णय घेतला आणि प्रत्येक दिवसाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे ठरवले.

मी पाहिलेल्या अनेक रुग्णांची जगण्याची इच्छा म्हणजे, त्यांना मरण्याची भीती वाटत असो वा नसो, त्यांना खरोखर जगायचे होते. त्यांना जीवनाचा आनंद घ्यायचा होता, त्यांना जीवनातून आणखी काही मिळवता येते का, ते पाहायचे होते. मुख्य म्हणजे, त्यांना विश्वास आहे की, त्यांचे जीवन अजून संपले नाही आणि त्यातून अधिक मधू मिळवण्यासाठी ते जे काही करू शकतात, ते करण्यास ते सज्ज आहेत. मृत्यूच्या क्षितिजावर छोट्या-छोट्या सुखांची प्रखरताजाणवते आणि जीवनातील ढोंगीपणा दूर होतो. जेव्हा जीवनविषयक कटुता आणि राग नाहीसा होऊ लागतो, तेव्हा आनंदाचा दिवा प्रज्वलित होत असतो. जगण्याची इच्छाशक्ती बळकट करण्यासाठी रुग्ण सर्वांत चांगली गोष्ट करू शकतो ती म्हणजे, कर्करोगासारख्या मानवी ऊर्जा गोठवणार्‍या रोगाशी लढण्यासाठी सक्रिय योद्धा म्हणून सहभागी होणे. सकारात्मक राहण्याच्या अनेक अनपेक्षित परिणामांची ही काही उदाहरणे आहेत.

डॉ. शुभांगी पारकर