सडेतोड जयशंकर...

    14-May-2023   
Total Views |
s jaishankar

बांगलादेशची राजधानी ढाका येथे नुकतीच सहावी इंडियन ओशियन कॉन्फरन्स अर्थात हिंद महासागर परिषद संपन्न झाली. यावेळी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हेदेखील उपस्थित होते. त्यांनी या संमेलनाला संबोधित केले. यावेळी जयशंकर यांनी चीनसह पाकिस्तानला चांगलेच धारेवर धरले. चीनवर अप्रत्यक्ष हल्ला चढवत एस. जयशंकर यांनी सांगितले की, जेव्हा एखादे राष्ट्र कायदेशीर दायित्वांकडे दुर्लक्ष करते किंवा दीर्घकालीन सहकार्य करारांचे उल्लंघन करते, तेव्हा विश्वास कमी होत जातो. त्याचप्रमाणे दोन्ही राष्ट्रांना मोठ्या प्रमाणावर गंभीर नुकसान सहन करावे लागते.

हिंद महासागर क्षेत्रातील महत्त्वाची सामायिक चिंता म्हणजे गैर-व्यवहार्य प्रकल्पांमुळे निर्माण होणारे कर्ज. त्यामुळे स्थिर आंतरराष्ट्रीय सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी कायदा आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आणि नियमांचा आदर करणे ही एक महत्त्वाची बाब आहे. त्यांनी चीनला धारेवर धरत सीमा कराराचे उल्लंघन केल्याचे म्हटले. कराराचे उल्लंघन केल्याने दोन्ही देशांतील तणाव वाढत असल्याचे सांगत जयशंकर यांनी सीमा कराराचे उल्लंघन करणार्‍या पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) चीनकडून मोठ्या संख्येने सैन्य तैनात करण्याबरोबरच चीनच्या आक्रमक वर्तनावरही टीका केली.

गेल्या दोन दशकांतील काही धडे आहेत, ज्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. जर आपण अशा अपारदर्शक कर्ज आणि महागड्या प्रकल्पांना प्रोत्साहन दिले, तर भविष्यात याचे परिणाम भोगावे लागतील. सुरळीत आणि प्रभावी कनेक्टिव्हिटीचे महत्त्वदेखील जयशंकर यांनी अधोरेखित केले. सर्वांनी प्रत्येक देशाचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे, पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील ग्वादर बंदरातून चीनला अरबी समुद्रात प्रवेश देऊन पाकव्याप्त काश्मीरमधून जात असलेल्या ६० अब्ज डॉलरच्या ’चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर’ला भारताचा तीव्र विरोध असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले. दरम्यान, एस. जयशंकर बांगलादेश, स्वीडन आणि नंतर बेल्जियमच्या सहा दिवसीय दौर्‍यावर गेले आहेत. या दौर्‍याच्या माध्यमातून जयशंकर तीन्ही देशांतील मैत्रीपूर्ण संबंधांना आणखी मजबूत करण्यावर भर देतील. दि. ११ ते दि. १२ मे दरम्यान बांगलादेशची राजधानी ढाका, दि. १३ मे ते दि. १५ मे दरम्यान स्वीडन आणि शेवटच्या दिवशी ते बेल्जियम दौर्‍यावर जातील. या दौर्‍यातील पहिला टप्पा असलेल्या बांगलादेशमध्ये त्यांनी हिंद महासागर परिषदेत सहभाग घेतला.

या परिषदेत मॉरिशसचे राष्ट्रपती पृथ्वीराजसिंह रूपन, मालदीवचे उपराष्ट्रपती फैसल नसीम यांसह जगभरातील अनेक देशांच्या मंत्र्यांनी सहभाग घेतला. या परिषदेत जयशंकर यांनी चीनसह पाकिस्तानचेसुद्धा वाभाडे काढले. तत्पूर्वी बांगलादेश दौर्‍यादरम्यान त्यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी सविस्तर चर्चा केली. दोन्ही देशांतील सहकार्य, एकमेकांचे हित या मुद्द्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. यानंतर नेपाळचे परराष्ट्रमंत्री एन. पी. सऊद यांच्यासोबतही जयशंकर यांची बैठक पार पडली. यावेळी ऊर्जा आणि दोन्ही देशांतील दळणवळण आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान, परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या चांगलाच दबदबा पाहायला मिळत आहे. त्यांच्या सडेतोड बोलण्यामुळे ते आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्येही चर्चेत असतात.

सुषमा स्वराज यांच्यानंतर जयशंकर यांनी परराष्ट्रमंत्री म्हणून जागतिक पटलावर आपली छाप सोडली आहे. नुकतीच गोवा येथे शांघाय सहकार्य परिषद पार पडली. बर्‍याच वर्षांनंतर पाकिस्तानचा बडा नेता यानिमित्ताने भारतात आला होता. परिषदेत पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी सहभाग घेतला. याचदरम्यान काश्मीरच्या पुंछमध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्यामुळे एकीकडे चर्चा करायची आणि पाठीमागे दहशतवाद वाढविण्यासाठी प्रयत्न करायचा, ही पाकची नीती लपून राहिलेली नाही. जयशंकर यांनीही भुट्टो यांच्याशी द्विपक्षीय चर्चेस नकार दिला. तसेच, वरवर स्वागत स्विकारून माघारी फिरा अशीच नीती भुट्टो यांच्यासोबत वापरली. त्यामुळे जो भारताकडे वाकड्या नजरेने पाहिल त्याला त्याच्याच भाषेत उत्तर मिळेल, असा स्पष्ट संदेश यावेळी जयशंकर यांनी दिला. त्यानंतर आता हिंद महासागर परिषेदतही जयशंकर यांनी पाक आणि चीनला खडेबोल सुनावत भारताची बाजू भक्कमपणे मांडली आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.