अनिवासी भारतीयांनी मायदेशात विक्रमी रक्कम गेल्यावर्षी पाठवली. ती सुमारे १०८ अब्ज डॉलर इतकी असून, ‘जीडीपी’त त्याचा वाटा तीन टक्के इतका आहे. अर्थव्यवस्थेसाठी हे गतिमान आणि उद्योगशील अनिवासी भारतीय सर्वात मोठे योगदान देणारे ठरले आहेत. विक्रमी संख्येने असलेले हे अनिवासी भारतीय म्हणूनच भारताचे शक्तिस्थान ठरले आहेत.
अनिवासी भारतीयांनी जागतिक पातळीवर विविध क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानामुळे भारताच्या धारणा ‘ब्रेन ड्रेन’वरून ‘ब्रेन गेन’मध्ये बदलल्या आहेत. मायदेशात विक्रमी रक्कम अनिवासी भारतीयांनी पाठवलेली आहे. ती सुमारे १०८ अब्ज डॉलर इतकी आहे. तसेच त्यांच्या एकत्रित ठेवी फेब्रुवारी २०२३ पर्यंत १३६ अब्ज डॉलर इतक्या आहेत. भारताच्या ‘जीडीपी’त त्याचा वाटा तीन टक्के इतका आहे. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी हे गतिमान आणि उद्योगी अनिवासी भारतीय सर्वात मोठे योगदान देणारे ठरले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत २४.६ टक्के इतकी वाढ झाल्याची माहिती ‘रिझर्व्ह बँके’चे डेप्युटी गव्हर्नर मायकेल पात्रा यांनी एका कार्यक्रमात बोलताना दिली आहे.
जगातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय नागरिकांमध्ये अनिवासी भारतीयांचा समावेश होते. अनिवासी भारतीय हे जगभरात सर्वाधिक संख्येने असून, अनिवासी भारतीय हे सर्वाधिक पैसे भारतात पाठवतात. अर्थशास्त्रज्ञ नियाल फर्ग्युसन म्हणतो की, “मानवी इतिहासात ७० साम्राज्ये झाली आहेत. ६९ वे आणि ७० वे साम्राज्य अनुक्रमे चीन आणि युरोपिय महासंघ ही आहेत. ६८व्या साम्राज्यामध्ये साम्राज्याची सर्व वैशिष्ट्ये आहेत, ज्यात त्याच्या सीमेपलीकडे युद्ध करणे समाविष्ट आहे. तरीही ते मूलभूत मार्गाने सर्वस्वी वेगळे आहेत. ते परदेशी भूमीला जोडत नाहीत.” फर्ग्युसन याला ‘अनिच्छुक साम्राज्य’ म्हणतो-ते अमेरिका आहे. अमेरिकेशी साधर्म्य म्हणून पाहिल्यास भारत एक ‘अनिच्छुक आंतरराष्ट्रीयकर्ता’ म्हणून ओळखला जाऊ शकतो. जर रुपयातील उलाढाल जागतिक परकीय चलन उलाढालीत डॉलर, युरो चलनांच्या बरोबरीने वाढली, तर रुपया हे आंतरराष्ट्रीय चलन म्हणून उदयास आलेले असेल. जे जागतिक अर्थव्यवस्थेतील भारताचे स्थान प्रतिबिंबित करेल,” असे त्याने म्हटलेले आहे.
अनिवासी भारतीय जगभरात सर्वत्र मोठ्या संख्येने आहेत. २०२२च्या जागतिक स्थलांतर अहवालानुसार, जगातील सर्वाधिक स्थलांतरित लोकसंख्या ही भारतीयांची आहे. त्यामुळे तो जागतिक पातळीवर सर्वोच्चमूळ देश म्हणून उदयास आला आहे. मेक्सिको, रशिया आणि चीन हे भारताच्या खालोखाल आहेत. अनिवासी भारतीयांचा झालेला भौगोलिक प्रसार हा अफाट असाच आहे. दहा लाखांहून अधिक अनिवासी भारतीय असलेल्या देशांमध्ये अमेरिका, इंग्लंड, संयुक्त अरब अमिराती, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, म्यानमार, मलेशिया, कुवेत आणि कॅनडा यांचा समावेश आहे. भारत हा १०० अब्ज डॉलरपेक्षा जास्त निधी प्राप्त करणारा पहिलाच देश आहे. भारताच्या खालोखाल चीन, मेक्सिको, फिलीपिन्स आणि इजिप्त यांचा क्रमांक लागतो.
अनिवासी भारतीय अनेक विकसित देशांमधील सर्वात श्रीमंत अल्पसंख्याकांपैकी एक आहेत. त्यांचा फायदा आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीतही भारताला होतो. भारत आणि संबंधित देशांमधील दुवा म्हणून ते मोलाची भूमिका बजावतात. ही भारताची ‘सॉफ्ट पॉवर’ आहे. तसेच ती एकगठ्ठा मतपेटी म्हणूनही काम करते. त्यामुळेच भारतीय वंशाच्या अनेक व्यक्ती बहुतांश देशांमध्ये उच्च राजकीय पदांवर कार्यरत असलेल्या दिसून येतात. ज्यामुळे संयुक्त राष्ट्रासारख्या संस्थांमध्ये भारताचा राजकीय प्रभाव वाढवण्याचे काम त्या करतात. हे अनिवासी भारतीय मायदेशात जे पैसे पाठवतात, त्यामुळे व्यापक वाणिज्य तूट भरून काढण्यास मोलाची मदत होते. इसवी सन पूर्व ३००० पासून भारत ही नेहमीच खुली अर्थव्यवस्था म्हणून ओळखली गेली. तेव्हाही भारताचे उर्वरित जगाशी आर्थिक, सामाजिक आणि राजकीय संबंध परिभाषित करणारी आंतरराष्ट्रीय स्थलांतरित ही एक प्रमुख शक्ती होती. आजही ती कार्यरत आहे.
भारतीय अर्थव्यवस्था तिच्या सर्व क्षेत्रांना सामावून घेत मूलभूत परिवर्तनातून जात आहे. यातील सर्वात उल्लेखनीय परिवर्तन हे सेवा निर्यात क्षेत्रात घडून येत आहे. नवनव्या तंत्रज्ञानाचा समावेश करून घेत, सेवा निर्यात क्षेत्र प्रभावीपणे कामगिरी करत असून, दरवर्षी त्यात २५ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली जात आहे. निर्यातीमुळे बाजारपेठ आणि उत्पादन क्षमता रुंदावण्याचा मार्ग प्रशस्त होतो. भारताची वस्तू आणि सेवांची निर्यात सुमारे ८०० अब्ज डॉलर इतकी आहे आणि ती जगातील एकूण निर्यातीच्या २.७ टक्के इतकी आहे. केंद्र सरकारने २०३० पर्यंत एक ट्रिलियन डॉलरचे उद्दिष्ट ठेवले आहे. १९६०च्या दशकाच्या सुरुवातीला आशियातील विकसनशील देशांनी दोन शतकांच्या पाश्चात्यांच्या वर्चस्वानंतर आपली प्रगती साधण्यास सुरुवात केली, यात जपान आणि चीनचा समावेश होता. त्यांचे उदय आणि पतन पाहिले, तर जपानचा उदय १९६० मध्ये झाला, तर पतन १९८० मध्ये. १९९०च्या दशकात चीनचा उदय झाला.
भारताचा उदय हा २०१५ मध्ये खर्या अर्थाने झाला. आज बाजार विनिमय दरांच्या बाबतीत भारत ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरली आहे. जागतिक स्तरावर ‘रिअल-टाईम पेमेंट’ व्यवहारांमध्ये सर्वात मोठा देश म्हणून भारताची ओळख प्रस्थापित झालेली आहे. यात भारताचा हिस्सा ५० टक्क्यांच्या आसपास आहे. जगातील काम करणार्या दर सहा व्यक्तींपैकी एक भारतीय असल्याने, बचत आणि गुंतवणुकीला चालना देण्याची क्षमता असलेला देश म्हणून भारत ओळखला जातो. ही क्षमताच जागतिक पातळीवरचे नवे आर्थिक शक्तिस्थान म्हणून भारताला लौकिक मिळवून देत आहे. जगभरात कार्यरत असलेले अनिवासी भारतीय ही भारताची शक्ती आहे. दरवर्षी यात होणारी वाढ, देशाचे सामर्थ्यच आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढवत आहे, हे नक्की!