दर गुरुवारी राहणार पाणी पुरवठा बंद ; अल निनोच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेतल्याचे प्रशासनाकडून स्पष्टीकरण
10-May-2023
Total Views |
पुणे : महानगरपालिकेने पुणे शहरामध्ये आठवड्यामधून एक दिवस पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. दर गुरुवारी शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार असून अल निनोच्या पार्श्वभुमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. येत्या १८ मे पासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे पुणेकरांना आता पाणी जपून वापरावे लागणार आहे.
पाणी कपात करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. यंदा पाऊस चांगला आणि वेळेत पडला तर ही समस्या राहणार नाही. मात्र, भविष्यात पाणी पुरवठ्याबाबत अडचण निर्माण होऊ नये याकरिता हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यासंदर्भात पालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच, पाण्याच्या वापराबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती देखील देण्यात आलेली आहे.
आयुक्त विक्रम कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळशी धरणामधून पाच टीएमसी पाणी पुणे शहराला मिळावे अशी मागणी केली आहे. त्यासाठी शासनाकडून एकसदस्यीय समिती नेमण्यात आलेली आहे. त्या विषयाचा पाठपुरावा सुरु आहे. आसपासच्या गावांमधून देखील टँकर आणण्याचा आणि जलतरण तलाव बंद ठेवण्याचा विचार सुरु असल्याचे ते म्हणाले.
दि. १८ मे पासून आठवडयातून दर गुरूवारी पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. प्रशासनाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना माहिती दिली आहे. प्रशासनाने पाण्याची गळती रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना सुरु केल्या आहेत. तसेच, २० ठिकाणी एअर व्हॉल्व बसविण्यात आलेले आहेत. त्यामुळे दुसर्या दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची समस्या काही प्रमाणात कमी होणार असल्याचा दावा विक्रम कुमार यांनी केला आहे.