प्राध्यापकांची पिढी घडविणारे प्रा. देविदास गिरी

    01-May-2023
Total Views |
pro giri

ज्यांच्या ४० वर्षांच्या मार्गदर्शनाखाली ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी ‘सेट’, ‘नेट’, ‘जेआरएफ’ उत्तीर्ण झाले, असे राज्यभरात एक प्राध्यापकांची पिढीच घडविणारे प्रा. देविदास गिरी यांच्याविषयी...

‘अप्राप्यं नाम नेहस्ति धीरस्य विज्ञानः’ असे संस्कृतमध्ये म्हटले जाते. या सुवचनाचा अर्थ असा की, ज्यांच्याकडे धैर्य आणि मेहनत करण्याची तयारी आहे, त्यांच्यासाठी अप्राप्य असे काहीही नाही. आपल्या अध्यापनातून आणि आचरणातून विद्यार्थ्यांना अखंड मेहनत आणि अभ्यासाची शिकवण देणारे, सर्वसामान्य विद्यार्थ्यांना असामान्य करिअर संधी उपलब्धकरून देणारे प्रा. देविदास गिरी यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण आहे. ‘नेट’, ‘सेट’ आणि स्पर्धापरीक्षा तयारीत विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन करणार्‍या प्रा. गिरी यांनी चार दशकांमध्ये प्राध्यापकांची पिढी घडविली. ५०० पेक्षा अधिक विद्यार्थीसरांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात प्राध्यापक पदावर काम करत आहेत. विविध विषयांचा समावेश असलेल्या ग्रंथांनी समृद्ध ग्रंथालय, नेटके अभ्यास साहित्य, आश्वासक वाणी, आपुलकी यामुळे त्यांचे घर हे विद्यार्थ्यांसाठी नेहमी गुरूकुलच! प्रत्येक विद्यार्थ्यांची आकलनक्षमता विचारात घेऊन त्यानुसार मार्गदर्शन करणार्‍या प्राचार्य गिरी यांचे धीरोदात्त व्यक्तिमत्त्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरक आहे.

खरा तळमळीचा शिक्षक कसा असावा, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रा. गिरी सर होय. त्यांनी आपल्या संपूर्ण सेवेत शिक्षक धर्माचे प्रामाणिकपणे पालन केले. एक सौजन्यशील, मितभाषी, सृजनशील, दीर्घोद्योगी, उपक्रमशील, प्रेमळ व संवेदनशील शिक्षक म्हणून त्यांची आज शिक्षणक्षेत्रात ओळख आहे. मराठी हा त्यांचा अध्यापनाचा विषय. या विषयातील भाषाज्ञान, साहित्य विचार, साहित्याचा इतिहास, साहित्य प्रकारांचा अभ्यास, दलित-ग्रामीण व लोकसाहित्य या विषयांचे ४० वर्षे त्यांनी अध्यापन केले. हे करतानाच त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या व अध्ययनातील अडचणी यांचा अभ्यास करून त्यावर मार्गदर्शन व उपाय सुचवले. एक उपक्रमशील प्राध्यापक म्हणून नावलौकिक मिळवला. ओझर, नाशिक, पिंपळगाव बसवंत, निफाड, कळवण, कोपरगाव, वज्रेश्वरी, इगतपुरी अशा विविध ठिकाणी आश्रमशाळा, माध्यमिक विद्यालय आणि महाविद्यालय येथे ज्ञानदानाचे कार्य करणार्‍या प्रा. गिरी यांचे संपूर्ण आयुष्य एखाद्या कादंबरीप्रमाणे आहे. ‘आपण विवेकाने वागले पाहिजे. काळानुरूप स्वतःलाबदलले पाहिजे. परिस्थितीला सामोरे जाण्याची आपली तयारी ठेवली पाहिजे. योग्य संधीचा फायदा घेतला पाहिजे आणि आपल्या कर्तृत्वाची चुणूक दाखवून यशाचे शिखर गाठले पाहिजे,’ असे त्यांचे जीवनविषयक तत्त्व.

प्रा. गिरी यांनी विद्यार्थ्यांमध्ये साहित्य प्रतिभा निर्माण करण्यासाठी स्वतः विशेष प्रयत्न व मार्गदर्शन तर केले. परंतु, विशेष तज्ज्ञ साहित्यिकांच्या साहित्यिक कार्यशाळा आयोजित करून विद्यार्थ्यांमध्ये साहित्य प्रतिभेचे गुण संक्रमित केले. त्यांनी मार्गदर्शन केलेले अनेक विद्यार्थी आता लिहू लागलेआहेत. तसेच, महाविद्यालयामध्ये कवी संमेलने आयोजित करून नवसाहित्य लिहू इच्छिणार्‍या नवसाहित्यिक तरुणांना अनेक साहित्यिकांचा सहवास व मार्गदर्शन मिळून दिलेे. विद्यार्थ्यांना लेखनास प्रवृत्त करणार्‍या सरांनी स्वत:चे निर्मित व संपादित साहित्यही निर्माण केले. ‘काव्यगुंफा’या महाराष्ट्रातील १०० प्रातिनिधिक नवसाहित्यिकांच्या कवितांचा कवितासंग्रह त्यांनी संपादित केला. तसेच, नवोदित कवी व नव लेखकांच्या लेखनाला हक्काचे व्यासपीठ मिळून दिले. त्या साहित्यास प्रसिद्धी मिळावी, यासाठी ‘उमलत्या भावनांचा शोध’ या लघुनियतकालिकेचे संपादनही प्रा. गिरी यांनी केले.

बाबा आमटे यांच्या ‘भारत जोडो’ अभ्यास स्मरणिका, कलावंत सूची पुस्तिकेचे संपादन त्यांनी केले. महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ‘एमपीएससी’, ‘बी.एड सीईटी’, ‘नेट’, ‘सेट’ व ‘जेआरएफ’पात्रता परीक्षांसाठी मराठी, इतिहास, राज्यशास्त्र, शिक्षणशास्त्र या विषयांची १४ मार्गदर्शक पुस्तके व विविध दैनिके, मासिकांतून लेख व लेखमाला लिहिल्या आहे. प्राध्यापकांची एक संपूर्ण पिढी घडवत असताना सरांनी आपली साहित्य सेवा आणि सामाजिक उपक्रमातील सहभागही कायम ठेवला. अनेकविध समाजोपयोगी कार्यक्रमांमध्ये ते सहर्ष सहभागी झाले. २४ तास सातही दिवस विद्यार्थ्यांसाठी तत्पर असणार्‍या सरांना त्यांच्या सहधर्मचारिणी प्रा. छाया गिरी यांची समर्थ साथ लाभली.

आपल्या शैक्षणिक जीवनात कार्य करताना उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना अनेक सन्मान व पुरस्कारही मिळाले आहेत. ज्ञानदीप मंडळाचा ‘विद्यार्थीप्रिय प्राध्यापक पुरस्कार’, ‘सर्वतीर्थ पुरस्कार’, ‘ज्ञानदीप पुरस्कार’, ‘भक्ते-विमुक्त भूषण पुरस्कार’, ‘दशनम गोसावी समाज पुरस्कार’, ‘राष्ट्रीय समाज प्रबोधन पुरस्कार’, ‘युवा चतुर्थ मंच काव्य पुरस्कार’, ‘अनुराधा साहित्य मंडळ काव्य पुरस्कार’, ‘यशवंत युवा गौरव पुरस्कार’ हे त्यापैकी काही पुरस्कार सांगता येतील. वनवासी, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ममत्वाने शिकविणारे आणि त्यांच्यातून प्राध्यापक घडविणारे प्रा. गिरी सर्वांसाठीच आदर्श आहेत.

त्यांच्या चेहर्‍यावर झळकणारे समाधान हाच सरांचा सर्वोच्च पुरस्कार आहे. प्रा. देविदास गिरी यांच्या प्रयत्नांना दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवारातर्फे शुभेच्छा!

अमित यादव