सातव्या वेतन आयोगामधील १०, २०, व ३० वर्षाच्या तीन लाभांची सुधारीत आश्वासित प्रगती योजना लागु
09-Apr-2023
Total Views |
ठाणे : महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातव्या आयोगामध्ये १०, २० व ३० वर्षाच्या तीन लाभांच्या सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागु करण्यात आली आहे. शासननिर्णयाला अनुसरून याबाबतचा अध्यादेश ठाणे महापालिकेने नुकताच जारी केल्याने ज्यांच्या सेवेची १० वर्षे पूर्ण झाली, त्यांना पुढील वेतनश्रेणीचा लाभ दिला जाणार असुन पालिकेच्या ६ हजार ७०६ कर्मचारी - अधिकार्यांना त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात एकुण तीन वेळा लाभ मिळणार आहे. याआधी सेवेत रुजू झाल्यानंतर बारा वर्षानंतर पहिला, २४ वर्षांनंतर दुसरा आणि ३६ वर्षांनंतर तिसरा लाभ दिला जात असे. दरम्यान, कंत्राटी व रोजंदारी कर्मचाऱ्यांना मात्र ही योजना अनुज्ञेय नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
फडणवीस - शिंदे सरकारने सातव्या वेतन आयोगानुसार तीन लाभांची आश्वासित प्रगती योजना लागु करण्याचा निर्णय घेतला. या धर्तीवर ठाणे महापालिकेतील कार्यरत असलेल्या अधिकारी - कर्मचारी तसेच सेवानिवृत्तांना ही तीन लाभांची योजना लागु करण्यात आली आहे.सध्या महापालिकेत वर्ग एकचे - १७६, वर्ग दोन - १५५, वर्ग तीन - २ हजार ३६५ आणि वर्ग चार चे ४ हजार १० असे एकुण ६ हजार ७०६ इतके मनुष्यबळ आहे. सातव्या वेतन आयोगाच्या कार्यकाळात १०, २० व ३० वर्षाच्या नियमित सेवेनंतरची तीन लाभांची सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना १ जाने.२०१६ पासुन अंमलात आणली आहे.या योजनेत लाभार्थीला पदोन्नतीसाठी असलेली विहीत अर्हता, ज्येष्ठता तसेच अन्य प्रलंबित न्यायिक व विभागीय चौकशीची प्रकरणे नसावीत, असे बंधनकारक केले आहे.
यापूर्वी पहिला व दुसरा लाभ घेतलेल्यांना प्रकरणपरत्वे या योजनेतील पहिला व दुसरा लाभ समजण्यात येणार आहे. पूर्वी १२ व २४ वर्षाच्या सेवेनंतर मिळणारे लाभ सातव्या वेतन आयोगात १०, २० व ३० वर्षाच्या सेवेनंतर पात्रतेनुसार दिले जाणार आहेत.यामुळे या सर्वांचा दोन वर्षांचा फायदा होणार आहे.
पदोन्नतीच्या साखळीतील लाभ
ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियमित सेवेची १० वर्षे दि. ३१ डिसें.२०१५ पूर्वी किंवा याच दिवशी पूर्ण होतील, त्यांना या योजनेअंतर्गत पहिला लाभ दि.०१ जाने.२०१६ रोजी होईल. तसेच ज्यांना यापूर्वीच्या योजनेनुसार पदोन्नतीच्या साखळीतील पदावर दि.०१ जाने.२०१६ पूर्वीच पहिला लाभ मंजूर केला आहे, अशांना त्यांची १२ + ८ अशी २० वर्षांची सेवा, ही दि.०१ जाने.२०१६ पूर्वी पूर्ण होत असल्यास, त्यांना दुसरा लाभ दि.०१ जाने. २०१६ पासून मिळणार आहे. यानुसार,ज्यांची २० वर्षाची सेवा दि. १ जाने.२०१६ रोजी व नंतरच्या तारखेस पूर्ण होईल, त्यांना, तिसरा लाभ हा दुसऱ्या लाभापासून १० वर्षानंतर पदोन्नतीच्या साखळीतील पदावर पात्रतेनुसार मंजूर करण्यात येणार आहे. ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पहिला,दुसरा लाभ घेऊन २०१६ पूर्वीच सेवानिवृत्त झाले किंवा मृत्यू पावले. त्यांना २० आणि ३० याप्रमाणे या योजनेचा लाभ मिळणार नसल्याची अट टाकण्यात आली आहे.