कर्नाटकात काँग्रेसला धक्का?

१५ दिग्गज नेते जेडीएएसच्या वाटेवर

    09-Apr-2023
Total Views |
15-congress-leaders-hd-kumaraswamys-election-predictions

बंगळूरु : कर्नाटक विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली असून, सत्ता मिळविण्याचे स्वप्न पाहणार्‍या काँग्रेसला गळती लागली आहे. काँग्रेसमधून आऊटगोइंग सुरूच असून भाजप आणि जेडीएसमध्ये अनेक दिग्गज नेते प्रवेश करत असल्यामुळे काँग्रेसला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत.

आगामी काळात काँग्रेसचे १५ नेते जेडीएसमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती जनता दल सेक्युलरचे नेते एचडी कुमारस्वामी यांनी दिली. जेडीएसमध्ये प्रवेश करणार्‍या काँग्रेस नेत्यांबाबत ते म्हणाले की, चित्रदुर्गचे माजी विधान परिषद सदस्य रघु अचार यांनी आधीच सांगितलं की, ते स्वत: जेडीएसमध्ये प्रवेश करणार आहे. येत्या काही दिवसांत आणखी १५ नेते पक्षात प्रवेश करणार आहेत.
 
जेडीएसचे नेते भाजपात दाखल

माजी खासदार आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) चे निष्कासित नेते एलआर शिवराम यांनी बेंगळुरूमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिंकुमार कटील आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सीटी रवी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये नुकताच प्रवेश केला. एकीकडे कुमारस्वामी दावा करत आहेत की, काँग्रेसनेते जेडीएसमध्ये प्रवेश करणार आहे. मात्र त्याचवेळी त्यांच्या पक्षातच आऊटगोईंग सरू आहे.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवराम यांनी म्हटले आहे की, येत्या १० दिवसांत आणखी अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करतील. कर्नाटकच्या जनतेला राज्यात डबल इंजिनचे सरकार हवे आहे आणि भाजपच कर्नाटकात बहुमताचे सरकार बनवेल, असा दावाही त्यांनी केला आहे.