काँग्रेस नेते राहुल गांधी वारंवार सावरकरांविरोधात गरळ ओकून त्यांचा अपमान करत आहेत. नुकतेच एका पत्रकार परिषदेत बोलत असताना राहुल गांधींनी सावरकरांना लक्ष करत, 'मी सावरकर नाही, गांधी आहे. मी माफी मागणार नाही.' असे संतापजनक विधान केले. सावरकरांचा अपमान केल्याप्रकरणी राहुल गांधींवर देशभरातून टीकेची झोड उठली आहे. देशातील एका महान व्यक्तिमत्वाबद्दल बोलताना शब्द सांभाळून वापरले पाहिजेत. पण राहुल गांधींनी नेहमीप्रमाणे उचलली जीभ लावली टाळ्याला केलं. मुख्य म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर हे देशातील महान क्रांतिकारक असून, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. सावरकरांनी देशासाठी तुरुंगात मरणयातना भोगल्या. त्यांनी इंग्रजांना तगडी झुंज दिली. शेवटच्या श्वासापर्यंत ते लढले.
ज्या सावरकरांनी आपले आयुष्य देशसेवेसाठी खर्ची घातले, अशा महान वीराबद्दल गरळ ओकताना राहुल गांधींना लाज कशी वाटली नाही? राहुल गांधी देशभक्तीचे धडे देत फिरतात. मग सावरकरांसारख्या एका महान देशभक्ताचा अपमान करून, राहुल गांधींची हि कुठली देशभक्ती सुरु आहे? काँग्रेस नेते जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी व इंदिरा गांधींसह काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांनी सावरकरांच्या देशकार्याचं भरभरून कौतुक केलंय, याचा राहुल गांधींना विसर कसा पडला? राहुल गांधींच्या आजी इंदिरा गांधींनी पंतप्रधान असताना सावरकरांच्या स्मरणार्थ पोस्टाचे तिकीट जारी केले होते.
'देशाचे महापुरुष' म्ह्णून इंदिरा गांधींनी सावरकरांचा गौरव केला होता. हे आधी राहुल गांधींनी लक्षात घ्यावं. लोकांना देशभक्ती शिकवत फिरणारे राहुल गांधी हे महान देशभक्त वीर सावरकरांचा जो अपमान करतायत, ते लक्षात घेता राहुल गांधींनी प्रथम सावरकर समजून घ्यावेत नि मगच देशभक्तीबद्दल बोलावं. सावरकर होणे तितके सोपे नाही. त्याकरिता देशासाठी त्याग करावा लागतो. तुरुंगात मरणयातना भोगाव्या लागतात. हे कोणा येरा गबाळ्याचे काम नाही, हे राहुल गांधींनी लक्षात ठेवावं आणि सावरकरांची माफी मागावी.
- मनोहर विश्वासराव, शिवडी