मुंबई : महाराष्ट्र राज्यातील अवयवदानाशी संबंधित सर्व समस्या सोडविण्यासाठी आणि अवयवदानाबाबत अधिकाधिक प्रमाणात प्रसार करण्याच्या दृष्टीकोनातून वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग काम करणार आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुगणालयात ‘अवयवदान जनजागृती अभियान’ उद्यापासून राबविण्यात येणार असलयाचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
‘अवयवदान जनजागृती अभियाना’बाबत बोलताना महाजन म्हणाले की, उद्यापासून राज्यभरात ‘अवयवदान जनजागृती अभियाना’ची सुरुवात होईल आणि वर्षभरात वार्षिक उपक्रमांचे नियोजन केले जाईल. अवयवदान जनजागृतीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या किंवा काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने अधिकाधिक सूचनांसाठी पुढे यावे आणि तळागाळात या कार्यक्रमाची चांगली अंमलबजावणी करावी, या करीता अभियान प्रयत्नशील आहे.
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला अवयवदानाच्या कार्यपद्धतीची चांगली माहिती व्हावी आणि त्यांचे सर्व गैरसमज समाधानकारक आणि वैज्ञानिकदृष्ट्या दूर होतील यासाठी अवयवदान जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून अवयवदानासाठी सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करणे आणि संपूर्ण महाराष्ट्रात अवयवदात्यांची संभाव्य यादी वाढविणे हे उद्दिष्ट आहे. या अभियानाच्या माध्यमातून नॉनट्रान्सप्लांट ऑर्गन सेंटरची संख्या वाढवून गरीब व गरजू रुग्णांसाठी शासकीय संस्थांमध्ये परवडणाऱ्या प्रत्यारोपण सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रत्येक शासकीय संस्थेत अवयवदान जनजागृती अधिकारी यंत्रणा समाविष्ट करून विद्यमान रुग्णालयांचे बळकटीकरण करण्याचे नियोजन आहे. आधीच उपलब्ध असलेल्या सरकारी योजनांमध्ये समावेश करून तसेच त्यासाठी आर्थिक देणगीदारांचा पूल तयार करून प्रत्यारोपणाच्या आर्थिक ओझ्यावर मात करण्यासाठी राज्य शासनामार्फत उपाय शोधले जात असल्याचे महाजन यांनी सांगितले.
सध्या भारतात शेवटच्या टप्यातील मूत्रपिंड आणि यकृताच्या आजारांच्या उपचारांसाठी 2 लाख मूत्रपिंड आणि 1 लाख यकृताची गरज आहे, मात्र दरवर्षी केवळ 4 हजार मूत्रपिंड प्रत्यारोपण आणि 500 यकृत प्रत्यारोपण केले जात असून हजारो रुग्ण नवीन आयुष्य जगण्याच्या संधीच्या प्रतीक्षेत अवयवांअभावी मृत्युमुखी पडत आहेत. हृदयाची परिस्थिती आणखी बिकट असून, 5 हजार रुग्णांना हृदयाची गरज असून केवळ 20 ते 30 हृदय प्रत्यारोपण केले जात आहे. रस्ते अपघातात दरवर्षी सुमारे दीड लाख लोक मृत्युमुखी पडतात, त्यापैकी अनेक जण उपचारादरम्यान ब्रेनडेड होतातअसाच एक ब्रेनडेड रुग्ण 2 मूत्रपिंड 1 यकृत, 1हृदय, 2 फुफ्फुस,1 स्वादुपिंड यांचे संभाव्य दाता असून एकाच वेळी 7 जीव वाचवू शकतो तसेच कॉर्निया, त्वचा, हाडे यासारख्या ऊतींचे दान करू शकतो आणि अपंग रुग्णांना विविध अपंगत्वापासून मुक्त होण्यास मदत करू शकतो.राज्यातील 11 कोटी 23 लाख लोकसंख्येतून केवळ 49 हजार अवयवदानाची शपथ घेऊन महाराष्ट्र भारतात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
तसेच मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी केवळ 72 केंद्रे, यकृत प्रत्यारोपणासाठी 36 केंद्रे आणि हृदय प्रत्यारोपणासाठी 9 केंद्रे असून इतर प्रत्यारोपणासाठी फारच कमी केंद्रे आहेत. राज्यात नेत्र व त्वचा बँका आणि नॉनट्रान्सप्लांट ऑर्गन रिट्रीव्हल सेंटरही फार कमी आहेत. जेव्हा लोकसंख्येने हे पारंपारिक प्रत्यारोपण स्वीकारले नाही, तेव्हा हात प्रत्यारोपणासारख्या नवीन पद्धतींचा विचार करणे खूप कठीण आहे.
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव डॉ. आश्विनी जोशी, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. विवेक पाखमोडे, डॉ. मिलिंद फुलपाटील, डॉ. अजय चंदनवाले यांच्या नेतृत्वात अवयवदान जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. तर या अभियानाचे राज्यस्तरीय समन्वयक डॉ. हरीश ताटिया, डॉ. योगेश गवळी व डॉ. राकेश वाघमारे करणार आहेत.