करोना संसर्गस्थितीची केंद्राने घेतला आढावा

    07-Apr-2023
Total Views |
 
Health ministry Covid Meeting
 
 
नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी करोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर करोना व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या सज्जतेचा आणि राज्यांमधील प्रतिबंधक लसीकरणाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी विविध राज्यांचे आरोग्यमंत्री आणि प्रधान सचिव - अतिरिक्त मुख्य सचिव यांच्याशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी संवाद साधला.
 
 
 
 
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी राज्यांना दक्ष राहण्याचा आणि करोना व्यवस्थापनासाठी सर्व प्रकारची सज्जता ठेवण्याचा सल्ला दिला. आज आणि उद्या (८ – ९ एप्रिल) एप्रिल रोजी जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या सज्जतेचा आढावा घ्यावा. तसेच १० आणि ११ एप्रिल रोजी सर्व आरोग्य सुविधा केंद्रांमध्ये मॉक ड्रिलचे आयोजन करावे अशी विनंती त्यांनी राज्यांच्या आरोग्यमंत्र्याना केली. त्याचप्रमाणे हॉट-स्पॉट्स ओळखावेत आणि करोना - एन्फ्ल्युएंझाच्या चाचण्यांचे पुरेसे नमुने पाठवावेत आणि पॉझिटिव्ह नमुन्यांचे संपूर्ण जनुकीय क्रमनिर्धारण वेगाने करावे, अशा सूचनाही त्यांनी राज्यांना दिल्या.
 
यावेळी दैनंदिन रुग्णसंख्येची सरासरी 17 मार्च 2023 रोजीच्या आठवड्यातील 571 वरून 4188 वर पोहोचली असून भारतात कोविड-19 रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होऊ लागली असल्याची माहिती राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आली. 7 एप्रिल 2023 रोजी संपणाऱ्या आठवड्यात साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 3.02% झाला आहे. मात्र, याच काळात जगामध्ये दैनंदिन रुग्णसंख्येची सरासरी 88,503 झाली आहे ज्यामध्ये सर्वाधिक रुग्ण असलेल्या पाच देशांचे गेल्या आठवड्यातील जागतिक रुग्णसंख्येत 62.6% इतके योगदान आहे.