मुंबई : अपुरे पडणारी मंत्रालयातील कार्यालये आणि कामाचा प्रचंड व्याप या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर नरिमन पॉईंटच्या समुद्र किनारी उभी असलेली एअर इंडियाची आलिशान इमारत विकत घेण्यासाठी राज्य सरकारचे सुरू असलेले प्रयत्न फलद्रुप होताना दिसत आहेत. सरकार आणि एआय अॅसेट्स होल्डिंग लिमिटेडमध्ये इमारतीच्या किमतीवरून एकमत झाले असून लवकरच या इमारतीची मालकी राज्य सरकारकडे येणार असल्याचे बोलले जात आहे.
गृह विभागातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सरकार आणि एअर इंडिया इमारतीची मालकी ताब्यात असलेल्या एआय अॅसेट्स होल्डिंग लिमिटेडमध्ये अनेक वर्षांपासून या कराराबाबत बोलणी सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात या प्रक्रियेला वेग आला होता. विस्तारत जाणारे मंत्रालयाचे काम आणि त्या तुलनेने कमी पडत जाणारी जागा या अनुषंगाने देवेंद्र फडणवीस यांनी ही इमारत विकत घेण्यासाठी प्रयत्न देखील केले होते. परंतु, २०१९ मध्ये सत्ताबदल झाल्याने हे ही काम बारगळले होते. मात्र आता पुन्हा एकदा या कामाला वेग आला असून ही इमारत राज्य सरकारकडे येणार आहे.
''एअर इंडियाच्या इमारतीचा शंभर टक्के ताबा राज्य सरकारकडे दिल्यासच हा करार अंतिम करणार असल्याची अट सरकारकडून टाकण्यात आली आहे. सरकारकडून दिव्यांग कल्याण मंत्रालयाची घोषणा करण्यात आल्यानंतर या विभागाचे कार्यालय सुरु करण्यासाठी सरकारकडे मंत्रालयात जागा उपलब्ध नव्हती. अखेरीस मंत्रालयाच्या नजीकच्या एका इमारतीत या विभागाचे कार्यालय सुरु करण्यात आलेले आहे. त्यामुळे अपुऱ्या जागेचा विचार करता ही इमारत विकत घेण्यासाठी सरकारने अधिक प्रयत्न आहेत. तसेच मंत्रालयातील मंत्र्यांची दालने एअर इंडियाच्या इमारतीत हलवून अधिकारी आणि इतर मंडळींची कार्यालये मंत्रालयातच ठेवली जातील, अशा प्रकारच्या हालचाली सुरु असल्याची माहिती गृहविभागातील 'त्या' अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.