पोटावर पाय?

    06-Apr-2023   
Total Views |
thackeray-group-mp-priyanka-chaturvedi-meets-union-home-minister-amit-shah


या देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा घ्या’ म्हणत आमच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी थेट गृहमंत्री अमित शाहंना भेटायला गेल्या? ‘एक अकेला देवेंद्र क्या करेगा’ म्हणणार्‍या आमच्या सुप्रियाताईंना नंतर काय काय घडताना पाहावे लागले, हे सगळ्यांना माहिती आहे. आता काय होणार, याचा विचार न केलेलाच बरा! पण, मनात एक शंका येते की, थेट तिकडे दिल्ली परमुलखात गेल्या. नक्की तक्रार घेऊन गेल्या की, ‘येणार्‍या निवडणुकीत मला पण भाजपमध्ये घेऊन तिकीट द्या, गेला बाजार नेतृत्व तरी द्या’ असं साकड घालायला, विनवणी करायला चतुर्वेदी गेल्या असतील का? छे छे... वैरी जे चिंतन करणार नाही ते मन चिंतन करते. ते शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून आणि ते ‘कमळवाले’ बोलल्याप्रमाणे पुन्हा सत्तेत आल्यानंतर सगळ्याच शक्यता-अशक्यता अगदी चिंध्या चिंध्या झाल्यात. काय करावे, कुठे जावे काही कळत नाही. त्यामुळे मनाला येईल ते बोलतो असे मलाच नाही, तर सगळ्यानांच वाटते. पण, ज्याचे जळते त्यालाच कळते, अशी काय काय करून आवरून-सावरून आलेली सत्ता हातातून सटकली, तर काय वाटेल हे आम्हीच समजू शकतो. आम्ही केवळ त्या ४० जणांवर बोलणार. ते गेले असते आणि आमची सत्ता राहिली असती. त्या सत्तेतून आम्ही कमावलेला माज राहिला असता, तर आम्ही त्या ४० जणांना काहीसुद्धा म्हणालो नसतो. पण, ते गेले आणि सत्ता गेली ना? बरं गेले तर गेले शिंदेंना नेता मानून गेले? मी यांना दिसलोच नाही? मी मी असा कार्यक्षम असा हुशार असा बुद्धिमान. आमचे आदर्श शरद पवार असोत की आमचे प्रेरणास्थान राहुल गांधी, आमच्या गटतून या दोघांपर्यंत मीच जायचो. या ४० जणांनी मला सोबत नेले नाही. ‘इसकी सजा मिलेगी बराबर मिलेगी!’ या सगळ्यांना मी बोलून बोलून असा त्रास देतो की बघत राहा म्हणाव. काय म्हणता ते मी नेहमीच करतो काय म्हणता ते तर सुषमाताई पण करतात. हो, लोक म्हणतात, सुषमा आणि मी सख्खे भाऊ-बहीण शोभतो. काहीबाही बोलून आम्ही प्रसिद्धीत राहण्याचा आटापीटा करतो. पण, मग प्रियंका चतुर्वेदींनी हे सगळे करून काय मिळवले? काहीबाही बोलून प्रियंकांनी उगीच आमच्या पोटावर पाय आणायचा प्रयत्न केला! काय म्हणता, ते देवेंद्र कसे जातील? येतो झाकी हैं, फिक्चर अभी बाकी हैं!


आवडीने मूर्ख बनवले जाते!

 
राहुल गांधींची खासदारकी गेली. त्यामुळेच ‘लोकसभा हाऊसिंग पॅनल’ने राहुल गांधी यांना सरकारी बंगला सोडण्याची सूचना केली. मात्र, राहुल गांधींनी असा काही कांगावा केला की, विचारता सोय नाही. केंद्र सरकारने मला बेघर केले असे करूणपणे ते सांगत सुटले. (पंतप्रधान मोदी यांना बंधुभावाचा आव आणत गळाभेट घेऊन नंतर कसे बनवले या अविर्भावात सहकार्‍याला डोळा मारणारे राहुल ज्यांना माहिती आहेत, ते त्यांच्या करूण नाटकाला पसंत नाहीत, ही गोष्ट वेगळी म्हणा.) राहुल गांधी खरेच अशा स्थितीत आहेत का की, सरकारी निवासस्थान सोडले, तर त्यांना आसरा घ्यायला एक छप्पर नसेल. नुकतीच त्यांनी ‘भारत जोडो’च्या नावाने यात्रा काढलेली. तेव्हा सध्या ‘बेघर’ म्हणवून घेणारे राहुल सर्वसुविधायुक्त एसी कंटनेरमध्ये राहत होते. दिमतीला सर्वच सुखसंपन्न सोयी होत्या. त्या कुठून आल्या असतील? देशभर पंचतारांकित यात्रा काढणारे राहुल गांधी इतके गरीब आहेत की त्यांच्याकडे खरंच घर नसेल? सध्या म्हणे त्यांना देशभरातून काही लोक स्वत:चे घर देत आहेत. हे लोक कोण आहेत? याचा मागोवा घेतला, तर राजकीय पटलावर स्वतःचे स्वार्थाचे प्यादे टिकवण्यासाठी आटापिटा करणारी ही लोकं असतील, हे नक्की. त्यांना माहिती आहे की, राहुल गांधींच्या नावे घर करतो म्हटले की प्रसारमाध्यमांमध्ये नाव झळकेल. आपणच राहुल गांधी यांचे निष्ठावान असे दाखवले, तर पुढेमागे काँग्रेसकडून राजकीय संधी मिळू शकेल. असो. राहुल गांधींना ज्यांनी ज्यांनी घर देऊ केले, त्या सगळ्यांची घर राहुल गांधींनी घ्यावीत आणि गरजू-बेघरांना देऊन टाकावित. नुसती अशी अफवा जरी पसरवली तर मग राहुल गांधींना घर देणार्‍यांचे राहुल गांधी प्रेमाबाबत दूध का दूध पाणी का पाणी होईल. मार्क ट्वेन विचारवंत म्हणून गेले की तुम्ही मूर्ख आहात, हे लोकांना समजावणे सोपे आहे. पण, तुम्हाला मूर्ख बनवले जात आहे, हे समजावणे मात्र कठीण. हेच वचन राहुल गांधी आणि त्यांच्या अनुयायांना लागू होते. राहुल या ठरावीक लोकांसमोर तथ्यहिन बोलतात आणि त्यांचे ते काही उरलेसुरले अनुयायी राहुल यांचे वाक्य ब्रह्मवाक्य मानून अगदी आवडीने मूर्ख बनतात. थोडक्यात, यथा राजा तथा प्रजा. राहुल आणि त्यांच्या अनुयायांकडून काय अपेक्षा करावी?


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.