२४ तास रुग्णसेवेचे व्रत...

    06-Apr-2023
Total Views | 92
Vanita Giri

अगदी शालेय जीवनताच गरिबीचे चटके सहन करीत, वनीता गिरी यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मूळ गाव भिगवण, पण नोकरीच्या निमित्ताने त्यांनी पुणे शहर गाठले. या ठिकाणी पहिल्यांदा मिळेल ते काम केले. कोरोनाच्या काळात समाजासाठी काहीतरी करण्याच्या इच्छेने त्या या क्षेत्राकडे ओढल्या गेल्या अन् गेल्या तीन वर्षांपासून रुग्णवाहिकेची निरंतर सेवा त्या रुग्णांना देत आहेत. तसेच गोरगरिबांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्या सांगतात.
 
पुण्यात दाखल होण्यापूर्वी अनेक छोटी-मोठी कामे वनीता गिरी यांनी केली. ते करत असताना, समाजासाठी काहीतरी भरीव असे करण्याची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. लग्नानंतर नोकरीच्या शोधानिमित्त अनेक ठिकाणी त्यांनी पायपीट केली. तेव्हा समाजातील गरिबी, जनतेच्या हालअपेष्टा जवळून अनुभवल्याने या समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा त्यांनी मनोमन बाळगली. हातात काहीही काम नसल्याने काही दिवस साड्या शिवण्याचे काम केले, तर शाळेत विद्यार्थी पोहोचविण्याच्या गाडीवरही काम केले. त्यामुळे मग वाहनांची थोडी माहिती झाली. सर्वकाही चांगले सुरु असताना अचानक त्यांच्या पतीचे अपघाती निधन झाले. त्यानंतर साहजिकच घराची सर्व जबाबदारी वनीत यांच्यावर येऊन पडली. घरात लहान मुलगी, तिचे शिक्षण, इतर खर्च कसा चालवायचा, असा गंभीर प्रश्न त्यांना पडला. बाहेर काम करत असताना, मिळालेल्या पैशांत घरखर्च कसाबसा भागायचा, याचीच भ्रांत. मात्र, मुलीच्या पुढील शिक्षणासाठी पैसे कमी पडू लागल्याने आणखी काहीतरी काम मिळण्यासाठी वनीता नोकरीची शोधाशोध करत होत्या.

२०१९ मध्ये कोरोना महामारी जगावर धडकली. त्यामुळे मग वनीता यांना मिळणारी कामंही बंद झाली. घरात दोन वेळेच्या जेवणाचेही हाल. पण, घरातून बाहेर पडणेही त्यावेळी मुश्किल. नातेवाईकांनी मदत केली. मात्र, आपल्याला काहीतरी केले पाहिजे, असा विचार मनात आल्याचे वनीता गिरी म्हणतात. शाळेत ‘स्कूल व्हॅन’वर काम करीत असताना, वाहनांची बर्‍यापैकी माहिती झाली होती. मग, आपण वाहन चालवून पुढे काहीतरी करुया, असा विचार करीत त्यांनी स्वत: वाहन चालविण्याचा निर्णय घेतला.सुरुवातीला मोठ्या बहिणीच्या मदतीने वाहन चालविण्याचा प्रयत्न सुरु केला. वाहन चालविल्यानंतरच समाजासाठी आपण काहीतरी करण्याच्या इच्छेने रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचा त्यांनी समाजहितैषी निर्णय घेतला. याकामी सुरुवातीला त्यांना अनेक अडचणी आल्या. कारण, या क्षेत्रात महिलांची संख्या अगदीच नगण्य. काही ठिकाणी तर महिला रुग्णवाहिकाचालक नव्हत्याच. त्यामुळे महिला म्हणून या क्षेत्रात काम करताना वनीता यांना अनेकविध समस्यांना तोंड द्यावे लागले. पण, अजिबात हार न मानता बहीण आणि भावाने आधार दिल्यानंतर वनीता यांची रुग्णवाहिका सेवा प्रत्यक्षात उतरली. आईची आठवण म्हणून त्यांनी ‘सावित्री अ‍ॅम्ब्युलन्स’ या नावाने रुग्णवाहिका सेवा सुरु केली.

कोरोनाच्या काळातच रुग्णवाहिका चालवायला शिकल्यानंतर लगेचच त्यांनी सेवा देण्यास सुरुवात केली. वैद्यकीय क्षेत्राशी निगडित झाल्यानंतर गोरगरिबांना पैसे नसल्याने आरोग्यसुविधा मिळत नसल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. तसेच, रुग्णवाहिका बोलविल्यानंतर पुरुष चालक असल्याने महिलांना काहीसा संकोच वाटायचा. पण, जशी वनीता गिरी यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली, त्यानंतर महिलांना देखील काहीसा दिलासा मिळाला. मग, पुढे गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिकांना रुग्णालयात नेण्यासाठी वनीता यांच्याशी आवर्जून संपर्क साधला जायचा. केवळ पुण्यातच नव्हे, तर, सातारा, कोल्हापूर, गारगोटी, सोलापूर, नारायणगाव, भीमाशंकर या ठिकाणी देखील रुग्णवाहिका घेऊन गेल्याचे त्या सांगतात. एका ज्येष्ठ महिलेच्या आग्रहाखातर गुजरातपर्यंत रुग्णवाहिका नेल्याचा प्रसंगही वनीता कथन करतात.आपल्या सर्वांच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या पोलिसांसाठी वनीता यांच्या रुग्णवाहिकेची सेवा मोफत असून, गोरगरीब अथवा दुर्लक्षित समाजासाठी कोणतेही शुल्क आकारत नसल्याचे त्या सांगतात.

कोरोनामध्ये रस्त्यावर फिरताना फिरस्त्यांना पाण्याची बाटली, जेवणही दिल्याचे त्या सांगतात. कोरोनाच्या भयानक परिस्थितीबद्दल सांगताना त्या सांगतात की, “त्यावेळी कोणीही मदत करत नव्हते. त्या ठिकाणी आम्ही रुग्णवाहिका चालक मदत करण्यासाठी पुढे असायचो.” रुग्णालय अथवा आजारी रुग्ण म्हटलं की, कोणीच पुढे येऊन मदत करण्यास तयार होत नाही. पण, रुग्णवाहिका चालक म्हणून सेवा देण्यासाठी व्रत घेतल्यानंतर या कामासाठी कधीही मागे पुढे पाहत नाही. आता निरंतर अशीच सेवा सुरु ठेवणार असून, आणखी वाहने या सेवेसाठी जोडणार असल्याचेही गिरी अभिमानाने सांगतात.तसेच, राज्यातील पूरपरिस्थितीत, कोरोनाचे संकट, गोरगरिबांना औषधांसाठी काही निधी देणार असल्याचे त्या सांगतात. “या क्षेत्रात आता कोणतीच भीती नसून, माणसांची सेवा करण्याचे मला भाग्य लाभले आहे,” असे सांगत अशा वेगळ्या आणि पुरुषप्रधान क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविणार्‍या वनीता गिरी यांच्या कार्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!
 
 
-पंकज खोले



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121