हनुमान जयंती उत्सव - राज्यात निमलष्करी दल बोलवण्याचे निर्देश

कोलकाता उच्च न्यायालयाने ममता बॅनर्जी सरकारवर ताशेरे ,श्रीरामनवमी हिंसाचार पूर्वनियोजित – न्यायालयाचे मत

    05-Apr-2023
Total Views |
west-begal-voilence

नवी दिल्ली
: राज्यात हनुमान जयंती उत्सव अतिशय शांततेत पार पडावा, यासाठी केंद्र सरकारची मदत घ्यावी आणि निमलष्करी दलांची तैनाती करावी; असे निर्देश कोलकाता उच्च न्यायालयाने बुधवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दिले आहेत. त्याचप्रमाणे शिवपूर येथे श्रीरामनवमीच्या दिवशी झालेला हिंसाचार पूर्व नियोजित असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.

प. बंगालमध्ये श्रीरामनवमी शोभायात्रांवर हल्ले करण्यात येऊन दंगली घडविण्यात आल्या होत्या. त्याविरोधात विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेवर कार्यवाहा मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती टी. एस. शिवग्ननम आणि न्या. हिरण्मय भट्टाचार्य यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

यावेळी न्यायालयाने म्हटले की, निमलष्करी दलांच्या मदतीने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास मदत होईल. सर्वसामान्य जनतेसदेखील त्यांच्या जीविताची काळजी घेतली जात असल्याची खात्री होईल. उपचारापेक्षा प्रतिबंध केव्हाही उत्तम. त्यामुळे राज्य पोलिसांनी अनुचित घटना टाळण्यासाठील निमलष्करी दले अथवा कोणत्याही केंद्रीय सुरक्षा दलाची मदत घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे या समस्येची संवेदनशीलता लक्षात घेऊन साजऱ्या होणाऱ्या उत्सवाबाबत कोणत्याही राजकीय व्यक्तीने किंवा एखाद्या नेत्याने किंवा अगदी सामान्य माणसाने सार्वजनिक किंवा माध्यमांसमोर कोणतेही विधान करू नये, असेही न्यायालयाने निर्देश दिले आहेत.

उच्च न्यायालयाने हनुमान जयंती उत्सव शांततेत व्हावा, यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दिशानिर्देश जारी केले आहेत. धार्मिक मिरवणुकमध्ये सहभागींच्या संख्येवर नियंत्रण ठेवून राजकीय सहभाग शून्य करणे, मिरवणुकीसाठी विशिष्ट मार्ग निश्चित करणे आणि त्या मार्गावर पोलिसांची उपस्थिती असावी, कलम १४४ लागू असलेल्या ठिकाणी मिरवणूकीस परवानगी न देणे आणि मिरवणूक निघणाऱ्या मार्गावर अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा दिशानिर्देशांमध्ये समावेश आहे.

....तर पूर्वनियोजित हिंसाचार टाळता आला असता

राज्य पोलिसांचा गुप्तचर विभाग अधिक सतर्क राहिला असता तर राज्यातील शिवपूर भागात रामनवमी उत्सवादरम्यान पूर्वनियोजित हल्ले टाळता आले असते, असे निरीक्षण कोलकाता उच्च न्यायालयाने सोमवारी नोंदवले. राज्य पोलिसांची गुप्तचर शाखा मजबूत करावी आणि असे कोणतेही पूर्वनियोजित हल्ले किंवा हिंसक कृत्ये टाळण्यासाठी सर्व पावले उचलली जावीत, असेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत.