मुंबई : मुंबईतील क्रिकेटची पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर मोठ्या प्रमाणावर धुळीचे साम्राज्य पसरत आहेत. या धुळीच्या प्रदूषणामुळे येथील नागरिक हैराण झाले असून ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना दमा आणि इतर श्वसनाचे आजार जडत असल्याचे येथील स्थानिकांकडून सांगण्यात आले आहे. तसेच येथील रहिवाशांनी या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मुंबई महापालिकेकडे धाव घेतली आहे.
मागील अनेक वर्षांपासून शिवाजी पार्क परिसरातील रहिवासी धुळीमुळे त्रस्त असून शिवाजी पार्क धूळमुक्त व्हावे याकरिता कंत्राट देखील काढण्यात आले. रेन वॉटर हार्वेस्टिंग, तुषार सिंचन यांसारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून शिवाजी पार्कवर हिरवळ निर्माण करण्याचा प्रयत्न पालिकेकडून करण्यात आला. मात्र शिवाजी पार्कवरील धुळीच्या प्रदूषणात आणखीन वाढ झाली आणि येथील रहिवाश्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पायऱ्या चढाव्या लागल्या असे मत येथील स्थानिकांनी मांडले आहे.
शिवाजी पार्कवर असंख्य लोक रोज व्यायामासाठी, जॉगिंगसाठी आणि फेरफटका मारण्यासाठी येत असून या भागात शाळा देखील आहेत. मात्र शिवाजी पार्कवर उडणाऱ्या धुळीकणांमुळे श्वसनाचे आजार आणि दमा जडत असल्याच्या अनेक तक्रारी येत असल्याचे येथील डॉक्टरांकडूनही सांगण्यात आले आहे.
शिवाजी पार्क धूळमुक्त व्हावे यासाठी केलेले उपक्रम
ऑक्टोबर २०२१ मध्ये माती टाकण्याचे काम सुरु करण्यात आले (मात्र यानंतर येथील धुळीच्या प्रदूषणात लक्षणीय वाढ)
रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि तुषार सिंचन प्रकल्पाचे काम पालिकेकडून जवळपास पूर्ण
ठाकरे सरकारकडून शिवाजी पार्क नूतनीकरण आणि धूळमुक्त होण्यासाठी देखभालीचे तीन वर्षाचे सुमारे १ कोटींचे कंत्राट दिले