मुंबई : मुंबईमध्ये अत्याधुनिक बस स्थानके तयार करण्यात येत असून वरळी आणि लोअर परळ भागांमध्ये हरित बस स्थानके तयार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. ४ बस स्थानकांवर सोलर पॅनल बसवण्यात येणार असून ही बस स्थानके मुंबईतील पहिली हरित बस स्थानके म्हणून ओळखण्यात येणार आहेत.
महापालिकेच्या जी दक्षिण विभागातील विविध ठिकाणी हरित बस स्थानके बसवण्याचा निर्णय पालिकेकडून घेण्यात आला असून या विभागातील हरित क्षेत्र वाढवण्याच्या दृष्टीकोनातून या बस स्थानकांची उभारणी करण्यात येत आहे. यामध्ये ४ बस स्थानकावर सोलर पॅनल बसण्यात येणार असून एकूण ८ बस स्थानके उभारण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे. तसेच याकरिता महापालिकेकडून निविदा मागवून कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान सुमारे ५८ लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार असून या कामाकरता विर्गो स्पेशाल्टिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली आहे.
यातील दोन बस स्थानके ही सेनापती बापट मार्गावर बसवण्यात येणार असून या बस स्थानकांच्या उभारणीसाठी बेस्ट उपक्रमाच्या वतीने कोणतेही सहकार्य मिळत नसल्याची माहिती अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे. या बस स्थानकांच्या निर्मितीसाठी बेस्ट प्रशासन ज्या प्रकारे सहकार्य करेल त्याप्रकारे या बस स्थानकांची निर्मिती केली जाणार असल्याचेही म्हटले जात आहे.