मुंबई: अखिल भारतीय मराठा महासंघाचा मुंबई, ठाणे, रायगड व पालघर जिल्हा पदाधिकारी मेळावा आणि मार्गदर्शन शिबीर पद्मभूषण वसंतदादा पाटील प्रतिष्ठान अभियांत्रिकी महाविद्यालय येथे रविवारी संपन्न झाले. या शिबिराचे उदघाटन भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ. दरेकर यांनी मराठा समाजाच्या तरुण-तरुणींनी आधी स्वतःचा पाया भक्कम करण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच मराठा समाजाच्या उत्कर्षासाठी जिथे जिथे मदत लागेल तिथे तिथे मी नेहमी सोबत असेन, असे वचनही दरेकर यांनी यावेळी दिले.
यावेळी बोलताना दरेकर म्हणाले की, कुठल्याही संस्थेचे नेतृत्व परिपूर्ण, अभ्यासू असते आणि प्रामाणिकपणे त्या समाजासाठी काम करायची इच्छा असते त्याचवेळेला ती संस्था मोठी होते आणि त्या संस्थेच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळत असतो. यावेळी दरेकर यांनी भाजपा आणि आरएसएसच्या कार्यपद्धती, कार्यप्रणालीचा अभ्यास केल्याचे सांगितले. प्रशिक्षण शिबिरात कार्यकर्त्यांनी काय करावे, काय करू नये हे दैनंदिन जीवनात माहित असते. परंतु कार्यकर्ता म्हणून आपण स्वतः कृतीतून एखादे मॉडेल उभे केले पाहिजे. मराठा समाजाच्या प्रत्येक तरुणाने, महिला भगिनींनी मी पहिले माझे काहीतरी करून दाखवेन मग माझ्या शेजारच्या मराठा समाजाचे काहीतरी करेन हा निर्धार करायला हवा. कारण शेवटी अशा पद्धतीने स्वतः मजबूत नाही झालो तर आपण दुसऱ्याला काय ताकद देणार. म्हणून सर्वात पहिले आपल्या समाजातील प्रत्येक जण मजबूत झाला पाहिजे. समाजाला उद्योगासाठी लागेल ती मदत मुंबई बँकेच्या माध्यमातून करायला तयार असल्याचेही दरेकर म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, अण्णासाहेब आर्थिक महामंडळाच्या एवढ्या योजना आहेत पण हेही खरे आहे की काही राष्ट्रीय बँका आर्थिक मदत करत नाहीत. यावर आपण उपायही शोधत आहोत. याबाबत या खात्याच्या सचिवांशी, नरेंद्र पाटील यांच्याशी बोलणे झाले आहे. तसेच कृती गटाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशीही बोलणे झालेय. थकहमी देत असाल तर मी मुंबईत ५०० मराठा तरुण- तरुणींना उद्योगधंद्यासाठी पैसे उपलब्ध करून देतो. जोपर्यंत आपण स्वतःहून मॉडेल उभे करत नाही तोपर्यंत आपल्यावर विश्वास बसत नाही. यावेळी दरेकर यांनी मुंबईत आणलेल्या 'सेल्फ डेव्हलपमेंट' योजनेची माहिती उपस्थितांना देत या योजनेमार्फत चार इमारती उभ्या केल्याचेही सांगितले.
आज आपल्याकडे प्रचंड ताकदीची माणसे आहेत. आपल्याकडे सगळे काही आहे फक्त इच्छाशक्ती, मेहनत पाहिजे. जेव्हा जेव्हा मराठा समाजाचे विषय होते तेव्हा पडद्यामागे मदत करणारा मी होतो. पीएसआयचा प्रश्न होता. सिलेक्शन होऊनही त्या तरुणांना कामावर घेतले नव्हते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तो प्रश्न मार्गी लावला. केवळ मेळावे, मोर्चे घेऊन चालणार नाही तर कृतीतून काम केले पाहिजे. मराठा समाजाच्या को ऑपरेटिव्ह बँका आहेत त्या सर्व बंद पडताहेत. आम्ही नेते काय करत आहोत. मी स्वतः रायगड बँक घेतली. कारण महाराजांचा फोटो असणारी ती बँक होती. मराठा समाजातील लोकांनी एकत्रित केलेली बँक जेव्हा बंद होते तेव्हा मराठा समाजाचा कोणतातरी नेता पुढे आला पाहिजे ना? या बँकेला पुनर्जिवीत केले पाहिजे, माझ्या समाजाची बँक आहे, समाजाला ताकद देणारी बँक आहे. चुका, दोष हे दुरुस्त करता येतात. पण आपल्या या संस्था जगल्या पाहिजेत, नेते जगले पाहिजेत हा प्रयत्न झाला पाहिजे. नेत्यांनीही समाजाप्रती योगदान दिले पाहिजे.
मराठा संघटनेला कुणी चालवू शकत नाही ती स्वयंचलित आहे. समाजाला मदत करायला अनेक नेते आहेत. पण राजकीय स्वार्थापोटी आमच्या संघटना कोण चालवत असतील तर हे चित्र विदारक आहे. ज्यावेळेला आंदोलने झाली, लाखोचे मुकमोर्चे शांततेने निघाले. हे मोर्चे का निघाले तर आपल्यावर जो अन्याय होत होता त्याचा उद्रेक बाहेर येत होता. कुठल्या नेत्याचे कर्तृत्व नव्हते. अखिल भारतीय मराठा महासंघ ही संघटना जुनी आहे. तुम्हाला लागेल ती ताकद उभी करू. पण याचे प्रॉपर प्लानिंग करून आपण पुढे गेले पाहिजे. निष्ठेने झोकून देणारे कार्यकर्ते आपल्याकडे तयार होणार नाहीत तोवर आपले संघटन मोठे होणार नाही व त्या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला कुठल्याही प्रकारचे काम पुढे घेऊन जाता येणार नाही, असेही दरेकर म्हणाले.
दरेकर म्हणाले की, आज मी मुंबई जिल्हा बँकेचे नेतृत्व करतो. विविध पक्षाची लोकं माझ्या बँकेत आहेत. सर्वांना बरोबर नेण्याचे काम मी करतोय. संस्थेच्या माध्यमातून सहकार चळवळीला ताकद मिळाली पाहिजे, उद्योगधंदे वाढले पाहिजेत, समाजात चांगला उपयोग झाला पाहिजे. यासाठी संस्था असल्याचे दरेकर म्हणाले. तसेच यावेळी दरेकर यांनी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या ज्या चार मागण्या आहेत त्या मान्य करत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर समाजमंदिर उपनगरात करायचे आहे की रायगडला हे ठरवा. चांगले काम होत गेले की मदत करणारेही पुढे येतात. या शिबीराला अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढारे, ऍड. अप्पासाहेब देसाई, अभय जगताप, नंदकुमार काटकर, अभिजीत राणे, प्रकाश देशमुख, अभिजित घाग, भारती पाटील, प्रविण पवार, सुरक्षा घोसाळकर, नरेश मोरे यांच्यासह सर्व जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.
अडचणीत असलेल्या वसंतदादा पाटील सहकारी संस्थेला ३० कोटींची मदत केली
स्वर्गीय वसंतदादा पाटील ही संस्था अडचणीत होती. आपल्या राज्याचे दुर्भाग्य आहे की ज्यानी या राज्याला मोठे केले त्यांच्या नावाने असणाऱ्या संस्था अडचणीत आहेत. वसंतदादा पाटील सहकारी संस्था अडचणीत असताना सर्व ताकद मी दिली. आज ही संस्था अडचणीतून बाहेर आलीय. या संस्थेसाठी ३० कोटी रुपयांची मदत केली. कारण मी ज्या बँकेचा अध्यक्ष आहे त्या बँकेची स्थापना वसंतदादा पाटील यांनी केली. ज्यांनी या संस्थेला जन्म दिला त्या संस्थेचा मी अध्यक्ष आणि त्यांच्या नावाने संस्था अडचणीत असेल तिला मी मदत करणार नसेन मग माझा उपयोग काय, असेही दरेकर म्हणाले.
टोमणे मारून फायदा नाही नुकसानच
यावेळी दरेकर यांनी आपल्या भाषणात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना कोपरखळी लागावली. ते म्हणाले की, टोमणे बिमणे मारून काय होते हे बघितलेतना एकदम सत्ताच जाते. त्यामुळे टोमणे मारून फायदा नाही नुकसान आहे एवढे लक्षात ठेवा. चांगल्याला चांगले म्हणण्याची दानत ठेवली पाहिजे.