श्रीनगरमध्ये रामनवमीनिमित्त धुमधडाक्यात शोभायात्रा!

    03-Apr-2023   
Total Views |
Rama Navami procession in Srinagar
 
देशाच्या काही भागात रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकांवर हल्ले करण्याचे प्रकार घडले असताना जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर शहरात राम नवमीची मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली. मिरवणुकीत सहभागी झालेले ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत होते, तर आजूबाजूचे नागरिक या मिरवणुकीवर फुलांचा वर्षाव करीत होते. श्रीनगरमध्ये असे काही चित्र दिसेल याची काही काळापूर्वी कोणी कल्पनाच केली नसती. पण, यंदाच्या वर्षी श्रीनगरमध्ये धुमधडाक्यात शोभायात्रा निघाली. मिरवणुकीत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

जुन्या श्रीनगरमधील झैदर मोहल्ला भागातून शोभायात्रेस प्रारंभ झाला आणि शहराच्या हब्बाकडल, बारबारशाह, लाल चौक, हरी सिंह मार्ग, जहांगीर चौक आणि टांकीपुरा भागातून ती वाजतगाजत गेली. काही वर्षांपूर्वी लाल चौक म्हणजे दहशतवाद्यांचा अड्डा होता. या चौकात भारताचा तिरंगा राष्ट्रध्वजही फडकविला जात नव्हता. पण, काश्मीरला विशेषाधिकार देणारे ‘कलम ३७०’ रद्द झाल्यानंतर तेथील परिस्थितीत बदल झाला आहे. स्वातंत्र्यदिनी लाल चौकासह श्रीनगरच्या विविध भागांमध्ये तिरंगा फडकला होता. या आधी हिंदूंचे सणवार उघडपणे साजरे केले जात नव्हते. पण, यंदाची रामनवमी श्रीनगरमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. काश्मीर खोर्‍यातील जातीय तणावामुळे शोभायात्रेचे आयोजन केले जात नव्हते. पण, यंदाच्या वर्षी ही यात्रा काढण्यात आली. ही यात्रा शांततापूर्ण वातावरणात पार पाडल्याबद्दल यात्रेचे एक आयोजक चैतन्य दास यांनी काश्मिरी पंडितांना आणि काश्मिरी मुस्लिमांना धन्यवाद दिले आहेत.शोभायात्रेत सहभागी झालेले हिंदू पारंपरिक वेषांमध्ये होते. यात्रेत सहभागी झालेले रामभजन गात होते. सहभागी झालेल्या स्त्रिया, मुले उत्साहात नृत्य करीत होते. देशाच्या काही भागात रामनवमीच्या मिरवणुकीच्या वेळी जो हिंसाचार झाला, त्याच्या अगदी विरुद्ध दृश्य श्रीनगरमधील या शोभायात्रेच्या वेळी पाहायला मिळाले.

बांगलादेशातही उत्साहात रामनवमी!

बांगलादेशमध्ये तेथील हिंदू मंदिरांवर समाजकंटकांकडून हल्ले होण्याचा बातम्या ऐकण्यास मिळत होत्या. दुर्गापूजेच्यावेळी पूजा मंडपावर हल्ले करण्याच्या घटना या आधीही तिथे घडल्या आहेत. तसेच बांगलादेशच्या काही भागात हिंदू मंदिरांवर हल्ले करून देवदेवतांची विटंबना झाल्याची प्रकरणेही समोर आली होती. त्या सर्व पार्श्वभूमीवर बांगलादेशमध्ये रामनवमीचा सण उत्साहात साजरा झाला. राजधानी ढाक्यामध्ये ‘राष्ट्रीय हिंदू महाज्योत’ या संघटनेने एका मोठ्या शोभायात्रेचे आयोजन केले होते. तसेच, बांगलादेशच्या विविध जिल्हास्थानी आणि उपजिल्हास्थानी रामनवमी साजरी करण्यात आली. तसेच यानिमित्ताने रामनाम पारायण, रामायण स्पर्धा, रामचरित्रावर आधारित गीतांचा कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात आले होते.

राजधानी ढाका शहरात जी विराट शोभायात्रा काढण्यात आली होती, त्यामध्ये पारंपरिक वेशात हिंदू सहभागी झाले होते. तसेच भगवान रामाच्या वेषातील धनुष्यबाण घेतलेले नागरिक सहभागी झाले होते. ही शोभायात्रा जयकाली मंदिर मार्गावरील राम-सीता मंदिरापासून सुरू झाली आणि पुन्हा शहराच्या विविध भागातून फिरून येऊन राम-सीता मंदिरापाशी यात्रेची सांगता झाली.यावेळी आयोजित कार्यक्रमात विविध वक्त्यांची भाषणे झाली. प्रभू रामचंद्रांच्या जीवनाचे अनुकरण केल्यास कुटुंब, समाज आणि देश यातील संघर्ष संपुष्टात येतील आणि सर्वत्र सामंजस्याचे, शांततेचे वातावरण तयार होईल, असे विचार काही वक्त्यांनी व्यक्त केले.रामनवमीचा सण साजरा करण्यासाठी बांगलादेश सरकारने आणि पोलिसी यंत्रणेने जे सहकार्य केले, त्याबद्दल आयोजकांनी संबंधितांचे आभार मानले. बांगलादेशमध्ये रामनवमी अत्यंत उत्साहात आणि शांततापूर्ण वातावरणात साजरी झाली हा समस्त हिंदू समाजासाठी एक सुखद धक्का मानायला हवा!

इस्लाम स्वीकार किंवा मरायला तयार हो; हिंदू नवर्‍याला इशारा

देशाच्या विविध भागांमध्ये घडणारे ‘लव्ह जिहाद’चे प्रकार आता सर्वविदित आहेत. त्याविरुद्ध हिंदू समाजाने जोरदार आवाज उठविला आहे. ‘लव्ह जिहाद’विरुद्ध काही राज्यांनी कायदे करून अशा घटनांना पायबंद घालण्याचा प्रयत्न केला आहे. साधारणपणे हिंदू मुलीस वेगवेगळी आमिषे दाखवून, फूस लावून तिच्याशी लग्न करायचे, तिला इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडायचे अशा घटना तुम्ही आम्ही सगळे जाणतोच. पण, आता ‘लव्ह जिहाद’चा एक नवा प्रकार उजेडात आला आहे. उत्तर प्रदेशातील अलीगढ शहरात ही घटना घडली आहे. यामध्ये मुस्लीम महिलेने हिंदू तरुणाशी हिंदू रितीरिवाजानुसार विवाह केल्यानंतर त्या हिंदू तरुणावर इस्लाम धर्म स्वीकारण्याची सक्ती त्या महिलेकडून केली जात आहे.यासंदर्भातील ‘एफआयआर’ अलीगढ जिल्ह्यातील अकराबाद पोलीस स्टेशनमध्ये या घटनेस बळी पडलेल्या अजयसिंह याने केलेल्या तक्रारीनंतर नोंदविण्यात आली आहे. आपल्या तक्रारीत अजयसिंह याने, आपण शहराच्या फरीदपूर भागात राहत असून आपण हिंदू धर्माप्रमाणे आचरण करीत असल्याचे म्हटले आहे. डिसेंबर २०२२ मध्ये आपला विवाह युनिस सलीम याची मुलगी मुस्कान हिच्याशी झाला. या विवाहामुळे चिडलेल्या युनिसने अजयसिंहविरुद्ध, आपल्या मुलीचे अपहरण झाले असल्याची तक्रार नोंदविली. पण, मुस्कान सज्ञान असल्याने तिने दंडाधिकार्‍यांसमोर सर्व आरोप फेटाळून लावले आणि अजयसिंहसमवेत आपणास राहायचे असल्याचे स्पष्ट केले.

आपण ज्या वस्तीत राहतो, तेथे सर्व मुस्लीम असून आपले एकट्याचेच हिंदू कुटुंब त्या भागात आहे, असे अजयसिंह याने सांगितले. विवाहानंतर मुस्कान पुन्हा तेथील गावकर्‍यांच्या दबावाखाली आली आणि तिने अजयसिंह याच्यामागे इस्लाम धर्म स्वीकारण्याचा आग्रह धरला. मुस्कानच्या वडिलांना आणि मेव्हण्यास हे सांगितल्यावर त्या दोघांनीही यामध्ये मुस्कानचे काही चुकीचे नसून ‘तू इस्लाम धर्म स्वीकारायला हवा,’ असे सांगितले. ‘इस्लाम न स्वीकारल्यास खोट्यानाट्या आरोपांमध्ये तुला अडकवू,’ अशी धमकीही त्यास देण्यात आली. मुस्कान आणि तिच्या कुटुंबाने अजयसिंह यास जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या. अजयसिंह याने इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्याने मुस्कानने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला.गेल्या २६ मार्चला अजयसिंह आणि त्याच्या कुटुंबाने नवरात्रीचा उपवास केला असता, मुस्कानचे पित्त खवळले. पूजा करण्यास प्रारंभ होत असतानाच मुस्कानने दुर्गामातेची मूर्ती फेकून दिली. आपण मांस शिजविणार असून प्रत्येकाने ते खायला हवे, असे धमकावले. तसेच, हिंदू धर्माची निंदानालस्ती करण्यास प्रारंभ केला.

अजयसिंह आणि त्याच्या कुटुंबाने घरात नमाज पढायला हवा, असेही मुस्कानने फर्मावले. अजयसिंहच्या कुटुंबीयांनी असे करण्यास नकार देताच त्या कुटुंबास तीन दिवसांची मुदत देण्यात आली. खोट्या प्रकरणात तुम्हाला गोवण्यात येईल, असेही त्या कुटुंबास धमकाविण्यात आले. त्यानंतर अजयसिंह याने पोलिसांमध्ये तक्रार केल्यानंतर मुस्कान आणि तिचे आई-वडील आणि अन्य नातलगांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला. पण, या गुन्ह्यामध्ये उत्तर प्रदेश धार्मिक स्वातंत्र्य कायद्याची कोणतीच कलमे लावण्यात आली नव्हती.दरम्यान, ‘वाटेल ते झाले तरी आपण हिंदू धर्म सोडणार नाही,’ असे अजयसिंह याने स्पष्ट केले आहे. हिंदू रितीरिवाजांप्रमाणे विवाह झालेल्या अजयसिंह याच्यावर इस्लाम स्वीकारण्याची सक्ती त्याची पत्नी मुस्कान आणि तिचे नातलग करीत आहेत. हा ‘रिव्हर्ट लव्ह जिहाद’चा प्रकार असल्याचे अशा घटनांना विरोध करणार्‍या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.उत्तर प्रदेशात घडलेली अशी ही पहिलीच घटना नाही. देशाच्या अन्य भागांतही असे प्रकार घडले आहेत. त्यांची संख्या खूप मोठी नसली तरी हिंदू तरुणांशी विवाह करून नंतर त्यांच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्याची सक्ती होत असल्याचे अशा उदाहरणांवरून दिसून येत आहे. ‘लव्ह जिहाद’प्रमाणेच अशा ‘रिव्हर्ट लव्ह जिहाद’बद्दलही हिंदू समाजात जागृती होण्याची आवश्यकता आहे.
 
निलंबित महिला पत्रकारास विरोधानंतर कामावर घेतले

‘न्यूज २४’ या वृत्तवाहिनीसाठी काम करीत असलेल्या केरळमधील पत्रकार सुजाता पार्वती यांना भारतीय मजदूर संघाच्या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल निलंबित करण्यात आले होते. सुजाता पार्वती या सदर वाहिनीमध्ये वृत्त संपादक आणि अँकर म्हणून काम करतात. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कोचीमध्ये भारतीय मजदूर संघाने आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात सुजाता पार्वती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुकही केले होते. या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबाबद्दल सुजाता पार्वती यांना निलंबित करण्यात आले. पण, डाव्या विचारसरणीच्या पत्रकारांना किंवा पत्रकारांच्या संघटनेला या अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा, असे वाटले नाही. पण, भारतीय मजदूर संघ आणि भारतीय जनता पक्षाने हा विषय लावून धरला. या दोन्ही संघटनांनी निलंबनाविरुद्ध आंदोलन केले, मोर्चे काढले.

दरम्यान मार्क्सवादी पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘देशाभिमानी’ने सुजाता पार्वती यांच्या निलंबनाचे समर्थन केले. पण, सुजाता पार्वती यांच्या निलंबनाच्या घटनेस होत असलेले विरोध लक्षात घेऊन सदर चॅनेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकंदन नायर यांनी निलंबन मागे घेत असल्याचे पत्र दिले. पण, सुजाता पार्वती यांनी आपली मूळ भूमिका बदलली नाही.या चॅनेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संपादकीय विभागातील अन्य व्यक्ती ‘सिटू’ आणि ‘आयटक’ यांच्या कार्यक्रमात सहभागी होत आले आहेत. मग भारतीय मजदूर संघाच्या कार्यक्रमात उपस्थित राहून मी काय चूक केली, असे सुजाता पार्वती यांचे म्हणणे आहे. निलंबन मागे घेतल्यानंतर सुजाता पार्वती २९ मार्चपासून कामावर रुजू झाल्या. त्या कामावर आल्यानंतर भारतीय मजदूर संघाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे शानदार स्वागत केले.

-दत्ता पंचवाघ




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

दत्ता पंचवाघ

एम. ए. (अर्थशास्त्र), पत्रकारिता क्षेत्रात ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेपासून पत्रकारितेस प्रारंभ. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यटन आदी विषयांवर विपुल लेखन. आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी लेखन.