‘शून्य कचर्‍या’कडे एक पाऊल

    03-Apr-2023   
Total Views |
International Zero Waste Day

प्रदूषण हा मानवी आयुष्यातील एक महत्त्वाचा आणि वैश्विक स्तरावर ऐरणीवर आलेला प्रश्न. मानवासाठी हा प्रश्न दिवसेंदिवस जटील ठरत असला, तरी त्यावर विविध उपाय शोधण्याचे प्रयत्नही तितक्याच वेगाने सुरु आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून नुकतेच ‘आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिन’ म्हणजेच (International Zero Waste Day)हा दिवस संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या पुढाकारातून गुरुवार, दि. ३० मार्च रोजी जगभर साजरा करण्यात आला.

प्रदूषण ही जागतिक समस्या. विकसित आणि विकसनशील अशा दोन्ही देशांना कमी-अधिक प्रमाणात भेडसावणारी. म्हणूनच आज सर्व स्तरांतून प्रदूषणावर तोडगे काढण्याचे काम सुरू आहे. अशा या प्रदूषणाचे मानवनिर्मित आणि नैसर्गिक असे दोन प्रकार. नैसर्गिक प्रदूषणात मोेडणार्‍या प्रदूषणाच्या प्रकारांचे बहुतांश वेळा नैसर्गिकरित्या विघटन होते. परंतु, खरा प्रश्न आहे तो मानवनिर्मित प्रदूषणाचा. मानवनिर्मित प्रदूषणात वायूप्रदूषण, जलप्रदूषण, जमीन प्रदूषण या सगळ्या प्रकारांचा समावेश होतो. वायू आणि जलप्रदूषणाचा तर मोठा परिणाम जैवविविधतेवर आणि प्राणी व इतर नैसर्गिक जीवांच्या अधिवासावर होतो. पृथ्वीवरील जैवविविधतेतील अनेक प्रजाती यामुळे धोक्यात आल्या आणि काही र्‍हास ही पावल्या.

प्रदूषणाचा एक मोठा भाग म्हणजे कचरा. आता माणूस म्हटलं की, कचरा हा आलाच. मानवनिर्मित प्रत्येक गोष्टीच्या वापरानंतर या ना त्या प्रकारे कचर्‍याची निर्मिती होते. शिवाय या कचर्‍याचे ढीग मानवी लोकसंख्येबरोबर दिवसेंदिवस वाढतानाच दिसतात. जगभरातील मानवनिर्मित कचर्‍याची आकडेवारी बघितली, तर दरवर्षी अंदाजे २.२४ अब्ज टन मानवनिर्मित म्युनिसिपल घनकचर्‍याची निर्मिती होते.आता इतक्या मोठ्या प्रमाणात तयार होणार्‍या या कचर्‍याची विल्हेवाट नेमकी कशी लावायची, ही देखील एक गंभीर समस्या. म्हणूनच आता शून्य कचरा उत्पादनाच्या दिशेने जगभरात पावले उचलली जात आहेत. या संकल्पनेचा विचार केला तर मुळात, पृथ्वीवर ‘शून्य कचरा निर्मिती’ ही कल्पानाच किती रम्य वाटते. पण, शून्य कचरा उत्पादन खरंच शक्य आहे का?आणि कसे? असे प्रश्न उपस्थित होतात.

‘शून्य कचरा उत्पादन’ मानवाचे या पृथ्वीवर अस्तित्व असेपर्यंत तरी केवळ अशक्यप्रायः वाटत असले तरी त्यादृष्टीने कष्टपूर्वक प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. याच प्रयत्नांचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे संयुक्त राष्ट्र सभेत यासंबंधी घेण्यात आलेला निर्णय. वस्तू आणि सेवांच्या शाश्वत उपभोग आणि उत्पादन पद्धतींना प्रोत्साहन देणे आणि शाश्वत विकासाच्या प्रगतीमध्ये ‘शून्य कचरा उत्पादना’च्या योगदानाबद्दल जागरुकता निर्माण करणे, हे ‘आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिन’ साजरा करण्यामागचे उद्दिष्ट. आता ‘शून्य कचरा उत्पादन’ उपक्रम म्हणजे काय ते पाहू. ‘शून्य कचरा उपक्रम’ योग्य कचरा व्यवस्थापनाला चालना देऊ शकतो आणि कचरा कमी आणि प्रतिबंधित करू शकतो. यामुळे प्रदूषण कमी करणे, हवामान संकट कमी करणे, जैवविविधता जतन, अन्न सुरक्षा वाढवणे आणि मानवी आरोग्य सुधारणेसाठी हातभार लागतो.
 
हा ‘आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस’ साजरा करण्यात भारत सरकारने ही महत्त्वाची पाऊले उचलली आहेत. भारत सरकारच्या नवी दिल्ली येथील गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने ‘स्वच्छोत्सव’ या नावाने मोहीम राबवली. ‘स्वच्छोत्सव - आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस : कचरामुक्त शहरांसाठी रॅली’ ही मोहीम तीन आठवडे राबविण्यात आली असून बुधवार, दि. २९ मार्च रोजी या मोहिमेचा समारोप झाला. या कार्यक्रमात शहरातील नेते, तळागाळातील संस्था, तज्ज्ञ संस्था, व्यवसाय, विकास भागीदार आणि देशभरातील कचरा व्यवस्थापन मॉडेल्सचा अग्रेसर असलेल्या विविध स्वयं-साहाय्यता गटांतील ३०० हून अधिक महिलांसह शेकडो प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला.

भारतातील दोन हजारांहून अधिक शहरांनी ‘कचरामुक्त शहरे’ या रॅलीत सहभाग घेतला होता. हा मोठा प्रतिसाद पाहून यात सहभागी नागरिकांना ‘स्वच्छतादूत’अशी उपमा दिली गेली. ‘शून्य कचरा दिन’ आणि तत्सम उपक्रम राबवले तरी त्यांची यशस्विता हा सामूहिक प्रयत्नांवरच अवलंबून आहे. म्हणूनच सामूहिक प्रयत्नांना महत्त्व देऊनच कचरामुक्त आणि प्रदूषणमुक्त गाव, शहर, राज्य, देश आणि ग्रह हा प्रवास अधिक सुलभ होऊ शकतो.


 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.