मणिपूर : एका अतिहिंसक राज्यापासून तर प्रगत राज्याकडे...

    29-Apr-2023   
Total Views |
 
Manipur
 
 
मला ‘ग्लोबल साऊथ’ देशांच्या समोर असलेली भूराजकीय आणि सुरक्षा आव्हाने आणि त्याचा कसा सामना करायचा, या विषयावर माझे विचार मांडण्याची संधी मिळाली. त्यानिमित्ताने मला मणिपूरमध्ये फेरफटका मारता आला तसेच येथील वेगवेगळ्या भागात जाता आले आणि तिथली सद्यस्थिती, वेगाने होणारे बदल आणि प्रगती मी स्वतःच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष अनुभवली. त्या माझ्या अनुभवावर आधारित मणिपूरमधील विकासाच्या घोडदौडीचा आढावा घेणारा हा लेख...
 
 
‘जी 20’ देशांचा परिसंवाद मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये...
2023 मध्ये ‘जी 20’ देशांचे नेतृत्व करण्याचा मान भारताला मिळाला. भारताने 2023 मध्ये ‘ग्लोबल साऊथ’ म्हणजे गरीब आणि कमी प्रगती झालेल्या देशांचा आवाज जगासमोर मांडण्याचा मोठा प्रयत्न सुरू केला आहे. भारतामध्ये ‘जी 20’ देशांच्या वेगवेगळ्या विषयासंबंधी बैठका/परिसंवाद आयोजित केले जात आहेत. या मधला एक परिसंवाद मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये नुकताच संपन्न झाला. मणिपूरमध्ये अशा प्रकारचा महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम संपन्न होण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी.
 
या कार्यक्रमाला मला ‘ग्लोबल साऊथ’ देशांच्या समोर असलेली भूराजकीय आणि सुरक्षा आव्हाने आणि त्याचा कसा सामना करायचा, या विषयावर माझे विचार मांडण्याची संधी मिळाली. त्यानिमित्ताने मला मणिपूरमध्ये फेरफटका मारता आला तसेच येथील वेगवेगळ्या भागात जाता आले आणि तिथली सद्यस्थिती, वेगाने होणारे बदल आणि प्रगती मी स्वतःच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष अनुभवली. त्या माझ्या अनुभवावर आधारित मणिपूरमधील विकासाच्या घोडदौडीचा आढावा घेणारा हा लेख...
 
मणिपूर भारतामधील फुटबॉलची महासत्ता
मागच्या महिन्यामध्ये मणिपूरमध्ये तीन देशांची आंतरराष्ट्रीय फुटबॉल टुर्नामेंट पार पडली. यामध्ये भारत, म्यानमार आणि किर्गिजस्तान हे देश सहभागी झाले होते. मणिपूरमध्ये अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा पहिल्यांदाच संपन्न झाली. या स्पर्धेदरम्यान स्टेडियममध्ये मणिपुरी फुटबॉल फॅन्सची मोठी गर्दी होती. अशी गर्दी भारतामध्ये मी कुठेच यापूर्वी बघितली नव्हती. मणिपुरी जनतेला फुटबॉल हा खेळ अतिशय आवडतो आणि मणिपूरला जर फुटबॉलची भारतामधील महासत्ता म्हटले, तर ते अजिबात वावगे ठरू नये. याशिवाय मणिपुरी खेळाडू वेगवेगळ्या खेळांमध्ये आपले प्रावीण्य भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सिद्ध करीत आहेत. खासकरुन फुटबॉल, जिम्नॅस्टिक, हॉकी, बॉक्सिंग आणि वेटलिफ्टिंगमध्ये. भारताकरिता या खेळांमध्ये सर्वांत जास्त पदके मणिपूरच्या खेळाडूंनी कमावून दिली आहेत. याचे एक अजून कारण म्हणजे, मणिपूरमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये ‘स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट’ सुरू झाल्या आहेत. त्यामुळे जमिनीवर या खेळांना प्रोत्साहन देऊन चांगल्या खेळाडूंचा शोध घेण्यामध्ये मदत होते. एमसी मेरी कोमसारखे बॉक्सर; एन. कुंजराणी देवी, मीराबाई चानू आणि खुमुकचम संजीता चानूसारख्या वेटलिफ्टर्स; टिंगोनलीमा चानूसारख्या हॉकीपटू आणि जॅक्सन सिंग थौनाओजम, गिव्हसन सिंग मोइरांगथेम, उदांता सिंग फुटबॉलमध्ये ही नावे भारतीयांच्या ओळखीची आहेत.
 
 
‘फेमिना मिस इंडिया’ राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा मणिपूरमध्ये
‘मिस इंडिया’ किंवा ‘फेमिना मिस इंडिया’ ही भारतातील एक राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा, जी दरवर्षी प्रमुख आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धांपैकी एक असलेल्या ‘मिस वर्ल्ड’मध्ये भाग घेण्यासाठी प्रतिनिधींची निवड करते.
 
‘फेमिना मिस इंडिया’ देशाच्या स्तरावरील स्पर्धा ही मणिपूरमध्ये एप्रिल महिन्यामध्ये संपन्न झाली आणि ही स्पर्धा एका मोठ्या स्टेडियममध्ये भरवण्यात आली होती, ज्याकरिता प्रचंड गर्दी उसळली. या स्पर्धेमध्ये राजस्थानची नंदिनी गुप्ता विजेती ठरली. सौंदर्य स्पर्धेच्या मणिपूर आवृत्तीत ‘फेमिना मिस इंडिया 2023’ मध्ये, मणिपुरी टेकड्यांमध्ये जन्मलेल्या स्ट्रेला थौनाओजम लुवांगच्या रूपाने एका स्थानिकाने पहिल्या तीनमध्ये स्थान पटकावले, जिने दुसरे उपविजेतेपद पटकावून राज्याचा गौरव केला.
तेथील मीडियाने, लोकांनीही या स्पर्धेला तितकेच महत्त्व दिले. मणिपूर सुंदरीच्या अनेक मुलाखती वेगवेगळ्या ठिकाणी त्यानंतर प्रसिद्ध झाल्या. तिच्या आयुष्यामध्ये अनेक दुर्दैवी घटना घडूनसुद्धा तिने परिस्थितीवर कशी मात करून, या स्पर्धेमध्ये नंबर तीनवर यायचा पराक्रम केला, जो कौतुकास्पद आहे. ती आता मणिपुरी तरुणाईची एक आदर्शच बनली आहे.
 
मणिपुरी सुंदरी वैयक्तिक अडथळ्यांवर मात करण्याचे आणि त्यानंतर उत्कृष्ट कामगिरी करण्याचे उत्तम उदाहरण आहे. कारण, तिला अगदी लहान वयात ‘एपिलेप्सी’ आजाराचे निदान झाले होते. लुवांग ही मानसिक आरोग्याची चॅम्पियन आहे. तिला गुंडगिरीमुळे उद्भवलेल्या तणाव आणि चिंतेमुळे आरोग्याच्या स्थितीचा सामना करावा लागला होता. तिला आज ‘फेमिना मिस इंडिया’ या व्यासपीठाचा वापर करून देशातील सर्व मुलांना बाल-अनुकूल शिक्षण व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दिशेने काम करायचे आहे आणि तिला दिवंगत प्रिन्सेस ऑफ वेल्स, डायना यांच्याकडून प्रेरणा मिळाल्याचे ती सांगते.
 
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मरणार्थ दि. 14 एप्रिल हा दिन ’विजय दिवस’ म्हणून देशभर साजरा केला जातो. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा वारसा प्रत्येक भारतीयाच्या स्मरणात आहे. ’आझाद हिंद फौज’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘इंडियन नॅशनल आर्मी’ (खछअ) मध्ये सहभाग घेऊन त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अविभाज्य भूमिका बजावली. दुसर्‍या महायुद्धात ब्रिटिश सत्तेशी लढण्यासाठी भारतीय राष्ट्रवाद्यांनी सैन्याची स्थापना केली.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सुभाषचंद्र बोस यांच्या प्रयत्नांच्या स्मरणार्थ 14 एप्रिल हा ’विजय दिवस’ म्हणून घोषित केला आहे. मणिपूरमध्ये या दिवसाचे महत्त्व आहे. विशेषत: इंफाळच्या दक्षिणेकडील मोइरांग नावाच्या गावात, जिथे भारतीय राष्ट्रीय सैन्याने ब्रिटिश राजवटीपासून भारताला मुक्त करण्यात अविभाज्य भूमिका बजावली.
 
दि. 14 एप्रिल, 1944 रोजी आझाद हिंद फौजने मणिपूरमध्ये एक शहर आणि नागालॅण्डचा काही भाग त्यांच्या तावडीतून परत मिळवेपर्यंत मोइरांग ब्रिटिश साम्राज्याचा एक भाग होता. ब्रिटिशांनी म्हटले होते की, ही सर्वात आव्हानात्मक आणि क्रूर लढाई होती. शूर भारतीय राष्ट्रीय सैन्याचे नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी केले. त्यांनी भारतीय भूमीवर सर्वात प्रथम तिरंगा फडकवला.
मोइरांगच्या इतिहासात ही महत्त्वपूर्ण लढाई होती. मोइरांग इंफाळपासून सुमारे 45 किमी आहे आणि मणिपुरी लोकांसाठी एक अतिशय पवित्र ठिकाण आहे. येथे पूर्व-हिंदू देवता भगवान थांगजिंगचे प्राचीन मंदिर आहे.
 
मणिपूरमधील वाढते पर्यटन
 
मणिपूरच्या जनतेचे गुण नेताजींसारखेच आहेत. त्यांना वाटते की, गांधीजींपेक्षा नेताजी जास्त मोठे नेते होते. खछअ मेमोरियल-कम-म्युझियमचे व्यवस्थापन मणिपूर सरकार करते. त्यात नेताजींची पत्रे, छायाचित्रे, रँकचे बॅज आणि इतर युद्ध संस्मरणीय वस्तूंचा संग्रह आहे, जी नेताजींनी देशासाठी केलेल्या बलिदानाची आठवण करून देतात.
 
मणिपूरमध्ये देशातून येणारे पर्यटन मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. नेताजी सुभाषचंद्र म्युझियम, जपानचे मंदिर, थांगला किल्ला, लोकताण लेक अशा अनेक प्रसिद्ध ठिकाणांना पर्यटक भेटी देतात. पर्यटकांची संख्या वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे, दिल्लीतून तीन तासांमध्ये किंवा आता महाराष्ट्रातील पुणे किंवा इतर ठिकाणांहून सात ते आठ तासांमध्ये विमानाने मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये सहज पोहोचता येते. तेथील रस्ते, प्रेक्षणीय स्थळांची देखभाल, राहण्याच्या जागा उत्तम तयार करण्यात आल्या आहेत. यामुळे पर्यटकदेखील या बाबीला दाद देत आहेत.
 
भारतातील सर्वात हिंसक राज्यापासून प्रगत राज्याकडे वाटचाल
महाराष्ट्रातील अनेक संस्थांनी मणिपूरच्या सीमावर्ती भागांमध्ये शाळा स्थापन करून उच्च दर्जाचे शिक्षण देऊन, मणिपुरी जनतेमध्ये भारतीयत्व निर्माण करण्यामध्ये मोठे योगदान दिले आहे. मणिपूर आणि नागालॅण्डच्या अनेक विद्यार्थ्यांना डोंबिवली, पुणे, रत्नागिरी, चिपळूण, सांगली या भागामध्ये शिक्षणाकरिता आणण्यात आले आहे.
 
आपण या आधीचे मणिपूरवर मी लिहिलेले किंवा इतरांनी लिहिलेले जे लेख वाचले असतील, तर त्यामध्ये मणिपूर हा भारतामधील सर्वात हिंसक प्रदेश होता, असे एक चित्र समोर येते. भारतीय सैन्याच्या विरुद्ध लढणे, हिंसा/बंडखोरी करणे, खंडणी वसूल करणे, भारताच्या 26 जानेवारी किंवा कुठल्याही कार्यक्रमाला विरोध करणे, सतत काहीना काही कारणे शोधून मणिपूरमध्ये बंदला आव्हान देणे, असे अनेक कार्यक्रम चालू असायचे. वर्षातील निम्मा वेळ तर मणिपूर बंद असायचे आणि त्यामुळे महागाई वाढून जनतेचे प्रचंड नुकसान व्हायचे. मात्र, आता हे सगळे थांबले आहे आणि हे स्पष्ट आहे की, मणिपूरच्या जनतेने भारतातच राहायचे ठरवलेले आहे आणि भारतामध्ये जी प्रगती होते आहे, त्या प्रगतीचा वाटा बनवून मणिपूरलासुद्धा एक प्रगत राज्य बनायचे आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

हेमंत महाजन

लेखक निवृत्त ब्रिग्रेडियर असून भारतीय सैन्य दल, राष्ट्रीय सुरक्षा तसेच भारताचे परराष्ट्रीय संबंध या विषयांवर त्यांचा खास अभ्यास आहे. ‘आव्हान चिनी ड्रॅगनचे’, ‘नक्षलवादाचे आव्हान-चीनचे भारताशी छुपे युद्ध’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.