नवी दिल्ली : सात महिला कुस्तीपटूंनी लावलेल्या लैंगिक छळाच्या आरोपावरून रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात शुक्रवारी एफआयआर नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयास दिली आहे.
सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी दिल्ली पोलिसांतर्फे सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्या. पी. एस. नरसिंह यांच्या खंडपीठासमोर युक्तीवाद केला. यावेळी ते म्हणाले, सात महिला कुस्तीपटूंनी लावलेल्या लैंगिक छळाच्या आरोपावरून रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवारीच केली जाईल, असेही मेहता यांनी न्यायालयास सांगितले आहे.