नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील श्रीरामनवमी हिंसाचारामध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सहभागाचीही चौकशी व्हावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेतर्फे (विहिंप) करण्यात आली आहे.
पश्चिम बंगालमध्ये श्रीरामनवमी शोभायात्रेत झालेल्या हिंसाचाराची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत (एनआयए) करण्यात यावी, असे निर्देश कोलकाता उच्च न्यायालयाने गुरुवारी दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयाचे विहिंपने स्वागत केले आहे.
विहिंपचे राष्ट्रीय संयुक्त सरचिटणीस डॉ. सुरेंद्र जैन म्हणाले की, रामनवमीच्या मिरवणुकांवर झालेले हल्ले नियोजनबद्ध पद्धतीने झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुस्लीम समाजाच्या मशिदी आणि घरांवर दगडफेक आणि पेट्रोल पंप, मुस्लिम वस्त्यांमधून शस्त्रांसह बाहेर पडणारे हिंसक जमाव, हिंदूंवर प्राणघातक हल्ले, घरे, दुकाने जाळणे, वाहनांची तोडफोड करणे हे अचानक घडू शकत नाही. हे नियोजनपूर्वक आणि जाणीवपूर्वक केले गेले. ही दहशतवादी घटनेपेक्षा कमी नाही. त्यामुळेच हे नियोजन कोणी केले, शस्त्रे कोठून नेली, त्यात कोण कोण सहभागी होते, याचा सर्वंकष तपास होणे आवश्यक आहे, जे फक्त एनआयए करू शकते. बंगाल पोलीस दंगलखोरांच्या हातातील बाहुले बनले आहेत. हिंदू समाजावरील या हल्ल्यांमध्ये ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षाच्या भूमिकेचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.