फाळणीनंतर १ महिन्यांनी माझे कुटुंब पाकिस्तानात स्थलांतरित झाले. माझा जन्म जरी पाकिस्तानातील असला तरीही मानाने मी अजूनही भारतीय आहे. असे उद्गार काढणारे जेष्ठ पाकिस्तानी पत्रकार तारिक फतेह यांचा काळ मृत्यू झाला. कर्करोगाशी दीर्घकाळ झुंज देऊन त्यांनी शेवटी मृत्यूचे निमंत्रण स्वीकारले. त्यांच्याबद्दल आत्मीयता वाटण्याचे कारण म्हणजे त्यांनी सामान्य माणसाप्रमाणे आपल्यावर केले जाणारे संस्कार अविचाराने स्वतःवर बिंबवण्यापेक्षा विचारपूर्वक त्यांचा अभ्यास केला. आपल्या धर्मसंस्थेविषयीचा आणि संस्कृतीचा अभिमान त्यांना होताच त्याआधारे ते आपल्या ब्लॉग मध्ये म्हणतात, "मी एक मुस्लिम म्हणून लिहितो ज्यांचे पूर्वज हिंदू होते. माझा धर्म, इस्लाम, ज्यू धर्मात रुजलेला आहे, तर माझी पंजाबी संस्कृती शीखांशी जोडलेली आहे. तरीही मला इस्लामवाद्यांनी सांगितले आहे की हा बहुआयामी वारसा न टाकता, जर पूर्णपणे नाकारला नाही तर. त्यामुळे मला खरा मुस्लिम मानता येणार नाही."
आपण आज ज्या वातावरणात राहतो तिथल्या संस्कृतीचे संस्कार आपल्यावर होतातच परंतु आपल्या पूर्वजांकडून वारशातून मिळालेली देन आपण अशी विसरून जाऊ नये. आपल्या कॅनडियन ओळखीबद्दलही ते बोलतात. ते म्हणतात, "मी पाकिस्तानात जन्मलेला एक भारतीय आहे, इस्लाममध्ये जन्मलेला पंजाबी आहे; कॅनडामधील एक स्थलांतरित आहे ज्यामध्ये मुस्लिम चेतना आहे, मार्क्सवादी तरुण आहे. मी सलमान रश्दीच्या अनेक मिडनाईट्स चिल्ड्रनपैकी एक आहे: आम्हाला एका महान सभ्यतेच्या पाळण्यातून हिसकावण्यात आले आहे, आणि कायमचे निर्वासित केले, मृगजळ बनलेल्या मरुभूमीच्या शोधात पाठवले." यामुळेच त्यांना संवेदनशील दृष्टिकोन लाभला असावा असे वाटते. कराची विद्यापीठातून त्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये पदवी प्राप्त केली त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेत काम केले. त्यांच्या उमेदीच्या काळात लष्करी राजवटींनी त्यांना तुरुंगात टाकले होते. १९७७ मध्ये, त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला आणि झिया-उल हकच्या राजवटीने त्यांना पत्रकारितेपासून बंदी घातली. १९८७ मध्ये ते कॅनडात स्थलांतर करण्यापूर्वी पाकिस्तान सोडून सौदी अरेबियात स्थायिक झाले होते.
शरिया कायद्याला त्यांचा स्पष्ट विरोध होता. इस्लामच्या पुरोगामी धोरणाविषयी ते उत्साहाने बोलत. भारत पाकिस्तान फाळणी व्हायला नको असे त्यांचे वक्तव्य ऐकून अनेक पाकिस्तानी गटांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यांची एकंदरच उदारमतवादी विचारसरणी पाकिस्तानी जनतेला मान्य नव्हती. त्यांनी कॅनेडियन मुस्लिम काँग्रेसची स्थापना केली. पाकिस्तानी विधीमंडळ, इस्लामिक कट्टरतावाद, इस्लामिक इतिहास आणि काही परंपरांबद्दल बोलल्यामुळे त्यांची मते अनेकदा वादाचा विषय होत. परंतु त्यांची राजकीय समाज, एखादा विषय समजून घेऊन व्यक्त होण्याची हातोटी, समीक्षणात्मक लेखन या सर्वच गोष्टी वाखाणण्याजोग्या आहेत. कौतुकास्पद आहेत. भारताविषयी प्रेम, पूर्वज हिंदू असल्याचे सांगतानाचा त्यांचा अभिमान, गुलामगिरीच्या जोखडात अडकलेल्या इस्लामिक मानसिकतेवर त्यांनी केलेलं परखड भाष्य आणि धर्माचा दबाव असताना आप्तांनी केलेल्या विरोधाला न जुमानता घेतलेली स्वतंत्र विचारांची भूमिका अशा चार कारणांमुळे भारतीयांना त्यांच्याबाबत आत्मीयता वाटते. अशा या जेष्ठ पत्रकार आणि विचारवंत असलेल्या तारीख यांस दै. मुंबई तरुण भारत कडून भावपूर्ण श्रद्धांजली!