निरभ्र नभांगणात ग्रह तार्‍यांचे दर्शन अन् मनात आनंदाचे टिपूर चांदणे!

ग्रह नक्षत्र ’तारे जमिन पर’; शनीचे कडे अन् मंगळाचे तेज पाहून भारावले खगोलप्रेमी, तुटती उल्का पाहण्याचा ‘विहंगम योग’

    24-Apr-2023
Total Views |
 
 astronomer
 
 
नाशिक : निरभ्र आकाश, त्र्यंबकेजवळील आंबाली दरीजवळील टेकडीवर प्रकाशप्रदुषणविरहीत ठिकाण. उत्सुकतेने भारलेले खगोलप्रेमी. ग्रह, तारे बघण्यासाठी सशक्त दुर्बीणी..तज्ज्ञ, अनुभवी खगोल शास्त्रज्ञाचे रंजक मार्गदर्शन..! अन् डोळ्यात प्रचंड उत्सुकता..!
 
काही वेळात दुर्बिणीला डोळे लावले जातात. लालसार, तांबूस मंगळ, सर्वात तेजस्वी शुक्रग्रह, शनीग्रह आणि त्याभवतालचे फिरणारे कडे पाहिले जातात आणि “आहाह..! तारांगण किती हे सुंदर !” असे सर्वांच्याच तोंडी उत्स्फूर्त उद्गार ‘ अशा भारवलेल्या वातावरणात शनिवारी खगोल मंडळाच्या उपक्रमातून नभांगणातील सारे तेजस्वी ‘तारे जमीन पर’ आले.
 
खगोल मंडळ, मुंबई आयोजित आकाश निरीक्षण उपक्रम त्र्यंबकजवळील बोबींलटेक गावाजवळील टेकडीवर शनिवारी संपूर्ण रातभर आयोजित करण्यात आला. चर्चासत्र, तज्ज्ञांसोबत प्रश्नोत्तरे, 6 दुर्बिणीतून आकाशातील ग्रह, तारे, नक्षत्र, शुक्र, मंगळ, शनी ग्रह आदी माहिती खगोलप्रेमींनी घेतली. आकाशगंगा, तार्‍यांचा जन्म, ताऱ्यांचा शेवट, तेजोपुंज, ‘सुपरनोव्हा’ (ग्रहतारे तूटून दिसणारे अप्रतिम उल्कावर्षाव), ध्रुवतारा, सप्तर्षी, व्याधीची चांदणी नेब्यूला, मृगशीर्ष, रोहणी, अश्लेषा, आर्द्रा, आदी नक्षत्र, ‘स्वर्गाचे द्वार’ उल्कापतानमुळे दिसणारे तुटलेले तारे, भारतीय पंचागातील नक्षत्रे आणि ताऱ्यांची तज्ज्ञांनी अत्यंत ओघवत्या शब्दात माहिती दिली. विविध आकारांचा भास निर्माण करुन नक्षत्र सांगण्यात मार्गदर्शक यशस्वी झाले. आकाशगंगेतील हे लुकलकते तेजस्वी सौंदर्य पाहून नाशिककरही भारावून गेले. भर उन्हाळ्यात टेकडीवरील गुलाबी थंडीत नाशिककरांचा ’वीकएन्ड’ खगोलीय माहितीरंजनात सार्थकी लागला. उल्कापात पहाण्याचा योगही अनेकांनी साधला.
 
अत्यंत नियोजनबद्धपणे कार्यक्रमाची रुपरेखा आखत खगोल मंडळ नाशिक आणि मुंबईतील सदस्य, मार्गदर्शकांनी खगोलप्रेमींच्या उत्कंठाना योग्य मार्गदर्शन केले. नियोजन आणि समन्वयन खगोल अभ्यासक सुजाता बाबर, मिलिंद बाबर, आचार्य सर यांनी केले. उपक्रमात नाशिक मुंबईतील 15 पेक्षा अधिक स्वयंसेवकानी योगदान दिले.
 
खगोल विज्ञानातील रंजक, वैज्ञानिक माहिती
 
खगोल मार्गदर्शक प्रदीप यांनी तार्‍यांचा जन्म, ग्रह, तारे नक्षत्रांबद्दल अत्यंत सुरेख आणि रंजक पद्धतीने माहीती दिली. जवळपास 20 वर्षांनंतर इतके निरभ्र आकाशात ग्रह तार्‍यांचे दुर्बीणीतून दर्शन घेतल्याने आनंद झाला. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना ग्रह-तार्‍यांबद्दल अशी माहिती देणारे उपक्रम राबवले तर भावी पिढीत खगोल शास्त्राची आवड निर्माण होईल.
प्रो. अर्चना पै
शास्त्रज्ञ, मुंबई
 
 

 astronomer 
 
 
आकाशवाचनाचा छंद आनंददायी
 
आकाशवाचन हा छंद कुणीही जोपासू शकतो. यामध्ये नितांत आनंद आहे. आकाश निरीक्षण खगोलप्रेमीनी नाशिककरांनी अत्यंंत शांतपणे समजून घेत आनंद घेतला. प्रकाशप्रदुषणविरहीत नभांगणात असा योग हल्ली खूपच अवघड होत आहेे. प्रकाश प्रदुषण वाढले आहे. नव्या पिढीतील मुलांना आकाशतील ग्रहतारे नक्षत्र प्रकाशप्रदुषणामुळे दिसत नसतील तर आपली संस्कृती दाखवण्यास कमी पडलो असे म्हणेल. खगोलीय घटना, ग्रह तारे पाहणे मुलांचा अधिकार आहे.
प्रदीप नायक
खगोल अभ्यासक, मार्गदर्शक.
 
 
खगोलशास्त्रात रस वाढणारा माहितीपूर्ण उपक्रम
 
आधुनिक दुर्बिणींतून अनेक ग्रह, तारे यांचे दर्शन झाले. शास्त्रज्ञ व तज्ज्ञ लोकांनी सांगितलेली माहिती खगोलशास्त्रात रस निर्माण करुन गेली. आकाशदर्शनाने स्वतःच्या खुजेपणाची जाणीव होऊन, त्याचा ’मी’पणा पाहिलेल्या उल्केसारखा दाणकन जमिनीवर आणणारा ठराला.
ललित वाघ, खगोलप्रेमी