शहरी नक्षलवादाचे असेही सत्य...

    22-Apr-2023   
Total Views |
Urban Naxalism and G. N. Sai Baba
 
प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी. एन. साईबाबा व त्याच्या चार साथीदारांना निर्दोष मुक्त करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा वादग्रस्त आदेश सर्वोच्च न्यायालयाने नुकताच रद्द केला. जी. एन. साईबाबावर दहशतवादी कारवाया केल्याचा आरोप असून, त्याला नक्षल चळवळीचा ‘मास्टर माईंड’ असेच संबोधले जाते. त्यानिमित्ताने जी. एन. साईबाबा आणि एकंदर ‘शहरी नक्षलवाद’ याचा मागोवा घेणारा हा लेख...

दि. १४ ऑक्टोबर, २०२२... प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी. एन. साईबाबा व त्याच्या चार साथीदारांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्दोष मुक्त करण्याचा आदेश दिला. यानंतर लागलीच काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी ट्विट केले की, ‘’व्हिलचेअरवर असलेले आश्रित साईबाबा. पाच वर्षांनंतर सुटकेच्या निर्णयाने सिद्ध झाले की, नरेंद्र मोदी ब्रिगेडद्वारा निर्माण केलेले शहरी नक्षलवादाचे ‘नेरेटिव्ह’ हे पूर्णतः बकवास आहे.” थोडक्यात, काय तर काँग्रेसी नेत्याला खूप आनंद झाला. मात्र, त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यानंतर काही दिवसांनी सर्वोच्च न्यायालयाने नागपूर खंडपीठाचा आदेश रद्द केला. यावर काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले की, ”व्हिलचेअरवर सर्वस्व अवलंबून असलेला साईबाबा नक्षल्यांना हिंसा करण्यासाठी कुठून आणि कसे सहकार्य करेल?” यात मानवतावादाच्या आड नेहमीच नक्षल्यांना समर्थन करणारे तेच तेच ठरावीक लोक होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने निष्कर्ष दिला की, ”नक्षली कारवायांमध्ये सहभागी होण्यासाठी शरीराची नाही, तर बुद्धीची गरज असते. हेच सगळ्यात धोकादायक आहे. दहशतवादी किंवा नक्षलींसाठी बुद्धीचा वापर महत्त्वाचा आहे. त्यामुळे दिल्ली विद्यापीठातील माजी प्राध्यापक जी. एन. साईबाबा आणि सोबतच्या चार जणांच्या सुटकेचा मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश रद्द करण्यात येत आहे.”
 
दि. २८ ऑक्टोबर, २०२२ रोजी ‘गांधी पिस फाऊंडेशन’ने ‘ऐ कॅम्पेन अगेन्स्ट स्टेट रिप्रेशन’ (सीएएसआर) मिटींग आयोजित केली होती. त्यामध्ये कोलीन गोन्साल्विस, दिल्लीतील जेनएनयुमधील प्राध्यापक लक्ष्मण यादव, प्रा. मनारेंजन मोहंती, नोदिप कौर आणि शर्जिल उस्मानीसह त्यांच्यासारखेच काही लोक उपस्थित हेाते. या सगळ्यांनी मत मांडली. त्यांचे म्हणणे होते, जी. एन. साईबाबा, उमर खलिद तसेच भीमा- कोरेगावच्या हिंसेनंतर अटक झालेले नक्षली समर्थक हे नव्या युगाचे स्वातंत्र्य सैनिक आहेत. देशात सगळ्यात मोठे दहशतवादी सध्याचे सरकार आहे. या देशात सगळेच सर्वोत्तम लोक तुरुंगात बंद आहेत.” थोडक्यात, या सगळ्यांच्या मते देशात धर्म-जातीच्या नावे अतिशय विकृत आणि लबाडपणे दंगल घडवू पाहणारे नक्षली सर्वोत्तम, मात्र देशाचे आणि समाजाचे अखंडत्व जोपासण्यासाठी त्यांच्यावर कारवाई करणारे सरकार आणि प्रशासन हे दहशतवादी आहे!असो. साईबाबा, त्याची कारकिर्द पाहिली की शहरी नक्षलवादाचे स्वरूप, व्याप्ती कशी असू शकते, याचा थोडक्यात अंदाज येतो.

साईबाबाला अटक झाली. कारण, ‘सीपीआय’ (माओवादी) व ‘आरडीएफ’ या प्रतिबंधित संघटनांचे सक्रिय सदस्य महेश तिरकी व पांडू नरोटे यांना दि. २२ ऑगस्ट, २०१३ रोजी अहेरी बस स्थानकातून पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच, त्याच संदर्भात जेएनयुचा विद्यार्थी हेम मिश्रा यालाही पोलिसांनी पकडले. चौकशीत त्याने पोलिसांना सांगितले की, ”छत्तीसगढच्या अबुझमाड येथील जंगलातील नक्षली आणि प्रा. जी. एन. साईबाबा या दोघांमध्ये संवाद संपर्क करण्यासाठी तो मध्यस्थ म्हणून काम करत होता. साईबाबाने हेम मिश्राच्या माध्यमातून नर्मदाक्का नावाच्या महिलेला संदेश पाठवला होता.”कोण नर्मदाक्का? तर उप्पुगंती निर्मला कुमारी उर्फ नर्मदाक्का नक्षल्यांच्या दंडकारण्य विशेष क्षेत्रीय समितीची सदस्य होती. गडचिरोलीमध्ये नक्षल्यांच्या एका हल्ल्यात १५ पोलीसकर्मी आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. या गुन्ह्यातील सहभागाबद्दल नर्मदाक्का आणि तीचा पती किरण उर्फ सुधाकर याला अटक केली गेली. नर्मदाक्का हत्या, जाळपोळ, हिंसा सहित ६५ पेक्षा जास्त गुन्ह्यामंध्ये सहभागी होती, तर अशीही नर्मदाक्का आणि तिला साईबाबाने विद्यार्थ्यांकरवी संदेश पाठवला होता.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये ‘मास्टर’ असलेल्या आणि प्रशासकीय सुविधा हाताशी असलेल्या साईबााबने नर्मदाक्काला इतके गुप्तपणे संदेश पाठवायचे कारण काय होते? तपासात पुढे स्पष्ट झाले की, त्यात देशविरोधी कटाचे मार्गदर्शन होते. हेम मिश्राच नव्हे, तर नक्षली कारवाई समर्थक सहभागाबद्दल अटकेत असलेले माओवादी कोबाड गांधी, बच्चा प्रसाद सिंह आणि प्रशांत राही यांनी पण दिल्लीतील साईबाबाशी संपर्कात होतो, हे सांगितले. एकंदर व्हिलचेअरवर बसून साईबाबा देशविघातक कृत्यांमध्ये सहभागी होत होता. देशाच्या सुरक्षिततेला धोका असलेल्या नक्षल्यांना मार्गदर्शन करत होता. तसेच, पोलीस तपासात पुढे निष्पन्न झाले की, नक्षली कारवायांमध्ये गुन्हेगार असलेल्या मात्र लपून राहिलेल्या नक्षली नेत्यांचे विचार आणि आदेश साईबाबा त्याच्या लेखाच्या माध्यमातून ‘बैंडथाउट्स डॉट नेट’ नावाच्या संकेतस्थळावर लिहायचा. साइईबाबाच्या लॅपटॉपची न्यायवैद्यकीय तपासणी करण्यात आली, तेव्हा हा खुलासा झाला. नक्षली समर्थन, सहकार्य आणि देशविरोधी कटात सहभाग अशा अनेक कारवायांमुळे साईबाबाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याच्या सुटकेसाठी नकली मानवतावादी नक्षली समर्थकांनी जंग जंग पछाडले, अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या संस्थासुद्धा त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न करत होत्या. शेवटी ऑक्टोबर २०२२ रोजी उच्च न्यायालयाने त्याच्या सुटकेचे आदेश दिले.

मात्र, जी. एन. साईबाबा आणि त्याच्या साथीदारांचा गुन्हा खरंच निर्दोष सुटण्यासारखा होता का? झारखंड, बिहार, छत्तीसगढ ते महाराष्ट्र अशा विविध राज्यांतील देशविरोधी कटकारस्थान रचणार्‍या नक्षल्यांना मार्गदर्शन करणे, मदत मिळवून देणे, सहकार्य करणे आणि देशाच्या एकतेला धोका निर्माण करणे, हे खरंच निर्दोष असू शकत होते का? सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, प्रोफेसर असलेल्या साईबाबाच्या संपर्कात कितीतरी विद्यार्थी आले असतील. अपंगत्वाचा दाखला देत त्याने विद्यार्थ्यांची सहानुभूती मिळवली असेल. उगाच का? हेम मिश्रा हा जेएनयुचा विद्यार्थी अबुझमाडच्या निर्बीड जंगलात जाऊन देशविरोधी कृत्य करण्यास तयार झाला? तरुणाईच्या संपर्कात राहून त्यांच्या ऊर्जेचा,त्यांच्या आशेचा आणि भवितव्यातल्या स्वप्नांचा वापर करण्याचा प्रयत्न साईबाबाने केला असेलच. हा भयंकर गुन्हाच आहे. कोबाड गांधी आणि इतरांनी सांगितल्याप्रमाणे ते जी. एन. साईबाबाच्या संपर्कात होते, तर दिव्यांग आणि बुद्धिमानल साईबाबा या माओवाद्यांच्या संपर्कात का आणि कशासाठी बरं असेल? तसेच साईबाबाला अटक झाल्यावर त्याने सांगितले की, तो तर साधा प्रोफेसर आहे, त्यातही दिव्यांग. त्याचा आणि माओवाद्यांचा, नक्षल्यांचा काहीएक संबंध नाही. मात्र, त्याला अटक झाल्यानंतर नक्षल्यांनी त्याच्या अटकेविरोधात हिंसा सुरू केली. ती कशासाठी?

कालपरवाच पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने साईबाबा आणि साथीदारांच्या सुटकेबाबत उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला. तसेच, काही निर्णयही दिले. त्यामुळे साईबाबाच्या सुटकेच्या आशा तूर्तास मावळल्या आहेत. त्याची सुटका व्हावी म्हणून पुन्हा सगळे तथाकथित पुरोगामी आणि मानवतावादी एकत्र येतील. पण, मानवतेचा पुळका असलेले हे लोक साईबाबाच्या गुन्ह्यांबाबत काहीच बोलत नाहीत! देशाची अखंडता, एकता आणि सुरक्षा याबाबत त्यांच्या तोंडाला कुलूप आहे. साईबाबा दिव्यांग आहे, म्हणून त्याला सोडावे हा युक्तिवाद असला तरीसुद्धा त्याची देशविरोधी कटकारस्थाने दुर्लक्षित करण्यासारखी आहेत का? खरे तर साईबाबा इतकेच त्याचे समर्थन करणार्‍यांबाबतही प्रश्नचिन्ह उमटायला हवेत. आजही जागतिक पातळीवर तर सोडाच, वस्ती पातळीवर जरी पाहिले तरीसुद्धा हातात शस्त्र घेऊन अंदाधुंद हल्ला करणारे हिंसा करणारे केवळ प्यादीच असतात, कठपुतली असतात. त्यांना चालवणारे कुणी तरी वेगळेच असते.

जंगलातील शस्त्रधारी नक्षलवादी किंवा दहशतवादी यांच्यापेक्षाही त्यांच्या मनात आणि बुद्धीत देशविरोधी, समाजविरोधी घातक विचारसरणी पेरणारे लोक हेसुद्धा तितकेच गुन्हेगार! त्याच अनुषंगाने महामानवाच्या किंवा संविधानाच्या किंवा इतिहासाच्या नावाने विचारांची विधानांची तोडफोड करून वेगळाच अर्थ लावून देशातल्या गरीब-भोळ्या लोकांना भडकवणारे हेसुद्धा तितकेच गुन्हेगार! शेवटी साईबाबाच्या गुन्ह्याबाबतच्या एका निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहेच की, ”नक्षलवादी आणि दहशतवाद्यांसाठी नक्षली कारवायांमध्ये सहभागी होण्यासाठी शरीराची नाही, तर बुद्धीची गरज असते. हेच सगळ्यात धोकादायक आहे.” या पाश्वर्र्भूमीवर आम्ही तर फक्त डफली वाजवतो, आम्ही तर फक्त गाणी म्हणतो, आम्ही तर फक्त संवाद साधतो, आम्ही तर फक्त कविता लिहितो, असे म्हणून समाजाला चिथावणार्‍या, समाजात फूट पाडणार्‍या लोकांवरही कायदा प्रशासन आणि त्याहीपेक्षा मायमाऊली जनतेने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तसेच देश समाजाचे तुकडे करणार्‍यांना सहानुभूती, लोक आणि राजाश्रय देऊ पाहणार्‍या शहरी नक्षलवाद्यांनाही समाजाने वेळीच ओळखणे गरजेचे! जी. एन. साईबाबा आणि तथाकथित पुरोगाम्यांच्या कारकिर्दीतून समाजाने हा बोध घेणे महत्त्वाचे!


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.