पुणे : पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने ‘ओला’, ‘उबेर’ यासह ‘रॅपिडो’ या अॅपची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे कायदेशीर बाबींची पूर्तता केली नसल्याने प्रवासी सेवा बंद करण्यात आल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी सांगितले.
यात ‘अॅग्रिगेटर लायसन्स’मिळवण्यासाठी ‘नी टेक्नॉलॉजीज प्रा.लि.’ (ओला) आणि ‘उबेर इंडिया सिस्टीम्स प्रा. लि.’ (उबेर) यांनी चारचाकी हलकी मोटार वाहने व तीनचाकी ऑटोरिक्षा या दोन्ही संवर्गासाठी अर्ज केले होते, तर ‘किव्होल्युशन टेक्नॉलॉजीज प्रा. लि,’ व ‘रोपन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस प्रा.लि.’ (रॅपिडो) यांनी तीनचाकी ऑटोरिक्षा संवर्गासाठी अर्ज केले होते. मोटार व्हेईकल नियमावली- 2020 मधील तरतुदींचे पालन होत नसल्याचे सांगत या चारही कंपन्यांचे अर्ज फेटाळण्यात आले. ‘नी टेक्नॉलॉजीज प्रा.लि.’ व ‘मे. उबेर इंडिया सिस्टीम्स प्रा.लि.’ या कंपन्यांना दि. 31 मार्च, 2022 रोजी चारचाकी हलकी मोटार वाहने संवर्गाकरिता 30 दिवसांसाठी तात्पुरते लायसन्स जारी करण्यात आले होते.