मंदिर म्हणजे एक परिपूर्ण सामाजिक संस्था : गो. बं. देगलूरकर

    22-Apr-2023   
Total Views |
नुकताच जागतिक वारसा दिन संपन्न झाला. त्यानिमित्ताने ‘भारतातील मूर्तीशास्त्र’ या विषयाचे गाढे अभ्यासक गो. बं. देगलूरकर यांच्याशी बदलती धार्मिक संस्कृती, आजच्या मूर्तीशास्त्रासमोरील आव्हाने, मूर्ती आणि मंदिर स्थापत्य अशा बर्‍याच विषयांवर अगदी मनमोकळी चर्चा झाली. मूर्तीकला आणि धार्मिकतेचे नवे प्रवाह आणि त्याबरोबरच आजही सहज लक्षात न येणारा मूर्तीमागचा सत्य इतिहास याविषयी या मुलाखतीतून टाकलेला हा प्रकाशझोत...G. B. Deglaurkar interview
 
 
 

मूर्ती या समाजाचे किंवा माणसांचे प्रतिनिधित्व करतात, तर मग त्या एकजात सगळ्याच सौष्ठवपूर्ण का असतात? मूर्ती कधीच बेढब दिसत नाहीत, मग त्या काळात काय बेढब माणसेच नव्हती की माणसाने सौष्ठवपूर्ण असावे, हा तत्कालीन समाजाचा अट्टाहास होता?
 
याचं सोपं उत्तर असं आहे की, जे जे सुंदर उदात्त उत्तम ते ते माणसाला आवडतं. देवाची मूर्ती म्हणजे आपल्यापेक्षा श्रेष्ठ अशा विभूती आहेत, ईश्वराच्या कल्पना आहेत, त्या सुंदरच असायला हव्यात. हे भाविकांचं मनचं सांगते. कलाकाराचे हात मूर्ती याच पद्धतीने घडवितात. अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे, दर्शनाला येणार्‍यांचं मन आकृष्ट व्हावं यासाठी सौंदर्यशास्त्राप्रमाणे त्यांना घडवलं जातं. सुरसुंदरी भक्तांच्या मार्गदर्शनासाठी कोरलेल्या असत. प्रत्येक मूर्ती आपल्याला काही सांगत असते, ती मूर्ती जर बेढब असेल तर आपल्या डोळ्यात ती ठसत नाही. मनुष्य हा जन्मतः रसिक असतो, सौंदर्याचा तो भोक्ता असतो. ज्या ज्या गोष्टी तो निर्माण करतो, त्यात सौंदर्य येणारच! ‘सुंदरतेच्या सुमनांमधले दव चुंबूनी घ्यावे, चैतन्याच्या गूढ कोवळ्या उन्हात हिंडावे...’ बालकवींची कविता आहे. मूर्ती सुंदरच हव्यात!

भारतीय हिंदू समाज अनेक पंथांमध्ये विभागलेला आहे. त्यातही शाक्तपंथीय आणि वैष्णव यांच्यात अजूनही वाद आहेत. पण, कित्येक मंदिरांत आपल्याला शंकर आणि विष्णूचे स्थान एकत्र असलेले दिसते. यामागे काही विशिष्ट कारण आहे का?

पंथीय मंडळीत एकेकाळी असणारे वाद आता राहिलेले नाहीत. परंतु, वैष्णव देवता आणि शैवदेवता यांच्यात वाद केव्हाच नव्हते, हे लक्षात घ्यायला हवे. प्रत्येकाला आपला देव श्रेष्ठ वाटतो, त्या देवाच्या नावे सांगितले गेलेले तत्वज्ञान श्रेष्ठ वाटतं. जसे पुढे द्वैत-अद्वैतवाद उद्भवले. ही सर्व मतमतांतरे त्यांच्या त्यांच्या उपासकांची किंवा अनुयायांची असतात.


देवाच्या पत्नी आणि शक्ती यांच्यात नेहमी गल्लत होते. त्याबद्दल काय सांगाल?

काही मंदिरांत विष्णूच्या मूर्ती आणि त्याच्या शक्तींच्या मूर्ती दिसतात. ही फार अफाट कल्पना आहे. विष्णूची २४ नावं आहेत, त्यापैकी केशवाची शक्ती म्हणजे कीर्ती, नारायणाची कांती, गोविंदाची तुष्टी, माधवची पुष्टी. शक्ती म्हणजे देवांच्या पत्नी नाहीत. पत्नी एखादेवेळेस शक्ती असू शकते. पण, शक्ती पत्नी असेलच असे नाही. देव ज्या गुणांमुळे प्रसिद्ध आहे, त्या गुणांची जी कल्पना आहे, ती शक्तीच्या द्वारे दाखवलेली असते. एक उदाहरण देतो, कार्तिकेय, त्याला दोन पत्नी असतात असे म्हणतात. एकीचं नाव महावल्ली तर दुसरी ती देवसेना. महावल्ली पत्नी आणि देवसेना ही शक्ती. तो देवांचा सेनापती आहे. त्याची शक्ती सेनेत आहे. म्हणून ती देवसेना. हे सर्वच स्त्रीलिंगी शब्द आहेत, म्हणून शक्तींच्या मूर्तींना स्त्रियांचा आकार दिला गेलेला आहे. त्यामुळेच सामान्य माणसाचा गोंधळ होतो आणि तो शक्ती अन् पत्नींमध्ये गल्लत करतो. पंधराव्या शतकापर्यंत मूर्तिशास्त्रावरची कोणतीही पुस्तकं वाचलीत, भारतीय असो किंवा विदेशी, मोठमोठे विद्वान आहेत. मीही मूर्तिशास्त्र त्यांची पुस्तके वाचूनच शिकलो. जोशी, स्टेला, बॅनर्जी यांच्यापैकी एकानेही ही कल्पना मांडलेली नाही. विष्णूला शक्ती आहेत आणि त्या २४ आहेत, हे कुणीही लिहून ठेवले नाही. मात्र, त्या आपल्या पुराणग्रंथात आहेत. आमचं हे ज्ञान पुराण आणि प्राचीन ग्रंथांवर आधारलेलंच असतं. काही ग्रंथांमध्ये विष्णूच्या शक्तींच्या यादी आहेत. हे ग्रंथ या अभ्यासकांनी पाहिलेले आहेत, पण त्यांना शक्तींच्या मूर्ती कुठे न दिसल्याने त्यांच्या लक्षात त्या आलेल्या नाहीत. म्हणून त्या लक्ष्मी असं ढोबळमानाने विधान केलं जातं.

सुरसुंदरींच्या क्रियांवर अनेक मतमतांतरं आहेत, तुमचं त्यावर एक पुस्तकही आहे. त्यांचा नेमका गवसलेला तुमचा अर्थ काय?
 
आता सगळ्यांबद्दल काही मी सांगत नाही, पण काही उदाहरणं देतो. ही सर्व प्रतीकं आहेत हे लक्षात घे. स्टेला म्हणते, मंदिराचा एकही भाग कारणाशिवाय कोरलेला नाही. प्रत्येक भागाला कारणं आहेत, अर्थ आहेत. सुरसुंदरीचं वर्णन करताना तिच्या मांडीवर विंचू चढलेला आहे. ती विंचू असल्याने भयकंपित होऊन आपले वस्त्र झटकते, तसं तीच शरीरसौष्ठव उघडं होतं. पण, तिच्या अस्तित्वाचा अर्थ सांगितल्याशिवाय तीच तसं असणं पटत नाही. म्हणून तो विंचू तिथे आला. आता मला संत वाङ्मयाची काही पार्श्वभूमी असल्याने, नाथांचं भारूड मला आठवतं. ‘विंचू चावला, विंचू चावला, काम-क्रोध अंगाशी आला...’ ते ती सुरसुंदरी भक्तांना सांगते. तुम्ही देवळात जाताय. आता काम-क्रोध तुमच्या मनात येऊ नये, काम-क्रोधादि भावनांची वस्त्र तुम्ही झटकून टाका आणि मंदिरात प्रवेश करा. आता पत्रलेखिका असते, तिच्या बाजूला १२ वर्षांच्या वयाचा मुलगा दाखवला आहे. आता या वयात ती कुठे ‘लव्ह लेटर’ लिहीत बसणार? मग ते काय आहे? ती विरहिणी आहे, हे खरं. ज्ञानेश्वरांची जी लता मंगेशकरांनी गायलेली विरहिणी आहे - ‘पैल तो गे काऊ कोकताहे...’ त्या विरहिणीला विरह सहन होत नाही. पण, मग कोणाचा? तर ईश्वराचा. त्या ईश्वराला ती आपलं मन मोकळं करून दाखवते. आपली संस्कृती ही प्रतीकांवर आधारलेली आहे. ही सर्व प्रतीकं आहेत. देवाच्या भेटीसाठी अनेकांनी तप केले, ते विरह सहन होत नाही म्हणूनच. ये आता मला भेट दे, द्वैताचं अद्वैत होऊ दे. असं ते आहे.
 

G. B. Deglaurkar interview 


 सर्व देवतांच्या मूर्ती विविध प्रतीके घेऊन घडवलेल्या असतात. तशीच शंकराची मूर्तीसुद्धा आहे. परंतु, बर्‍याचदा महादेवाच्या मंदिरात मूर्तीऐवजी लिंगाची स्थापना केलेली असते. यामागे काही नेमकं कारण आहे?

आता याचा मी एक थोडा वेगळा विचार केला आहे. ब्रह्म... ते कसं असतं? निर्गुण आणि निराकार. ‘चिन्मयस्या द्वितीयस्य निष्कलस्य शारीरिणां’ असं त्याच रूप. निष्कलंक आणि अशरीरी. हे ब्रह्म. त्या खालच्या पायरीवर ईश्वर आहे. ईश्वर निराकार आहे, पण सगुण आहे. तिसर्‍या पायरीवर आहे तो देव. हे सर्व देव आपल्यासमोर मानवी रूपात आले. पण, जेव्हा शिवलिंगाचा प्रश्न येतो, तेव्हा मीही विचारात पडतो. आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो, हे रूप निर्गुण निराकार आहे, म्हणजे ब्रह्म असायला हवं. परंतु, शैव समाजात ब्रह्मचे स्वरूप परशीवाला दिलेले असते, म्हणून ती शिवलिंगाची प्रतिष्ठापना असते. आज याबद्दल बराच अभ्यास होतोय, पण पूर्वी हा अभ्यास झालेला नसल्याने आपण त्याबद्दल वेगवेगळा अर्थ घेऊ लागलो. ते शिवलिंग असतं आणि त्याबाजूने असलेली शाळुंका म्हणजे योनिपटल असतं. हे सर्व सहाव्या- सातव्या शतकापासून सुरू झालं. आता मी जे सांगतो ते थोडं आपल्या समजुतींना धक्का देणारं आहे. त्यामुळे तुझा त्यावर पटकन विश्वास बसणार नाही. म्हणून हे कसं झालं, ते तुला सांगतो. साधारण पाचव्या शतकापूर्वी जी शिवलिंगं होती, त्यांच्या बाजूला योनिपीठ/शाळुंका नव्हतीच. लिंग एका जागी स्थिर राहावं त्यासाठीच आधाराचं ते पीठ आहे, शास्त्रशुद्ध तयार केलेलं जे शिवलिंग असते, त्याचे तीन भाग असतात. ब्रह्मपट, जो चौकोनी असतो, मधला भाग म्हणजे विष्णूपट जो अष्टकोनी किंवा षटकोनी असतो आणि त्यावर आपण पाहतो जो गोलाकार तो शिवपट, यापैकी वर आलेलं उठून दिसते ते शिवपट. इथे शिवलिंग आणि योनीपटाची कल्पना कुठून आली? तर जे सहज नजरेत भरलं, ती कल्पना प्रसारित झाली. थोडं पुढे जाऊन तुला अजून काही सांगतो, हे यज्ञसंस्थेतून पुढे आलं, पूर्वी यज्ञाला आहुती देता म्हणजे देवाला काही अर्पण करता, त्यानंतर उठणार्‍या त्या ज्वाला म्हणजे ईश्वराचं रूप. इथून ही संकल्पना रूढ झाली असावी, असेही म्हटले जाते.

काही प्राचीन मंदिरांसमोर गरुडध्वज आढळून येतो. आजही कित्येक मंदिरांसमोर दीपमाळ असते, तर ही स्तंभ रचना काही वेगळा अर्थ सांगते का? त्यामागे काही विशेष कारण आहे का?

वैष्णव मंदिरांसमोर गरुडाची मूर्ती असते. बाराव्या शतकापर्यंत गरुड स्तंभ नसून गरुडाचे स्थान असायचे. लहान देवळी असायची त्यात गरुड पुजला जाई. दक्षिणेत स्तंभांची मंदिरे मोठ्या प्रमाणात आढळून आली. आपल्याकडे महाराष्ट्रात मात्र विष्णू मंदिरासमोर हा स्तंभ नसतो. दुसरा दीपस्तंभ, त्याच अस्तित्व महाराष्ट्रात मराठा काळात पुढे आले. दीपस्तंभ दक्षिणेत नसतो, केवळ महाराष्ट्रातच असतो.एक आजचं उदाहरण देतो. मंदिर कालानुरूप कसं बदलत गेलं, ते तुला लक्षात येईल. इथे सिम्बॉयसिस मेडिकल कॉलेजच्या मागे मंदिर बांधायचं सुरु आहे. मुजुमदारांनी विचारलं, गणपतीचं मंदिर बांधायचंय, कसं असावं? मी म्हंटल, गाभार्‍यावरचं शिखर उत्तर हिंदुस्थानी पद्धतीचं करा. साधारण खजुराहो पद्धतीने, मंडप द्राविड पद्धतीचा असू दे, मंदिरात कासव आणि समोर दीपमाळ हे महाराष्ट्रीय पद्धतीचं असू दे. का सांगितलं मी असं? तर सिम्बॉयसिस. सहजीवन. सर्व भारत एकवटून येवो, कासव का असतो तुला माहितीये? कासवाची चाल धीमी असते. परंतु, त्याचे त्याच्या सर्व अवयवांवर नियंत्रण असते. त्याला हवं तेव्हा डोके, हात-पाय तो आत ओढून घेतो. भक्तांनी देवळात जाताना आपले सद्विकार ताब्यात ठेवून दर्शन घ्यावे. दुसरं म्हणजे, ज्ञानेश्वरीतील काही ओवींच्यानुसार, कासव आपल्या पिल्लांना नुसत्या पाहण्याने वाढवत असते. ती त्यांना दूध देत नाही, तिची नजर पिल्लांच्या वाढीसाठी पुरेशी असते. पिल्लं तिच्या शिकवणीशिवाय तिच्या मार्गानेच मार्गक्रमण करतात. तसा देव भक्ताकडे फक्त पाहत असतो. त्याच्या नजरेने आपण घडत असतो. वेगळं मार्गदर्शन तो करत नाही.


“मंदिरांची वास्तुरचनाच अशी असते की ती तुम्हाला ’अहं ब्रह्मास्मि’पर्यंतचा प्रवास करायला लावते,” असं तुम्ही एका मुलाखतीत म्हणता. मला हे वाक्य जरा अधिक स्पष्ट करून सांगाल का?

संपरिपूर्ण परिष्कृत मंदिर म्हटले की, मला खजुराहोची मंदिरं आठवतात. या मंदिरांचा ओटा २० ते २६ फूट उंचीचा असतो. त्याला जगती म्हणतात. त्यावर संसारातल्या सर्व गोष्टी कोरलेल्या असतात. लक्ष्मण मंदिरात स्वयंपाक करत असलेल्या स्त्रिया, नृत्य शिकवत असलेल्या नर्तकी आणि मजुरांनी वाहून आणलेले दगड घडवत बसलेला शिल्पी, इथपासून ते मानवाच्या रात्रीच्या अंधारात घडणार्‍या सर्व क्रियांपर्यंत. कामशिल्पं आहेत, त्यानंतर शिक्षण देणार्‍या सुरसुंदरी आहेत आणि हे सर्व पायर्‍यांवर सोडून तुम्ही देवाच्या समीप जाता. ज्ञानेश्वरांचा हरिपाठ आहे, ‘देवाचिये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधियेल्या.’ मग या चार मुक्ती कोणत्या? सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्य. तुम्ही अर्धमंडपात आलात की तुम्हाला गणपती, कार्तिकेय, गंधर्व अशा अनेक उपदेवता दिसतात. तुम्ही संसार सोडून वेगळ्या लोकात आलात. सलोकता. आणखी पुढे गेलात, मध्यात देव दिसतो. ही समीपता. आता पुढे गाभार्‍याच्या प्रवेशद्वारात तुम्ही उभे आहेत, तुम्ही अचंबित होता, माझंच हे रूप, हात पाय, कान, डोळे ही आता सरूपता साध्य झाली. इथे जाणवतं, ‘सोहं! सः अहं.’ मीच ते आहे. ते म्हणजे काय? ‘तत्वमसि.’ म्हणजे काय तर ब्रह्म. म्हणूनच ‘अहं ब्रह्मास्मि.’ हे ज्ञान मला झालं. पुढे मी गाभार्‍यात प्रवेश करतो. ‘जीवो ब्रह्मएव नापरा...’ जीव ब्रह्मच आहे, दुसरे तिसरे काहीही नाही. ही भावना म्हणजे सायुज्जता. आता सर्वच देवळं अशी असत नाहीत, लहान असतात, केवळ श्रद्धेने कशीही बांधलेली असतात. पण, ‘अहं ब्रह्मस्मि’ ही संकल्पना एकदा तुमच्या मनात जन्माला आली की, आपण सर्वच मंदिरे या पद्धतीने पाहू शकतो. तेच बिम्बब्रह्म. अशा मंदिरांना मी ‘वास्तूब्रह्म’ म्हणतो बरं का! ज्या वास्तूच्याद्वारे ब्रह्मचे ज्ञान होते, ते ‘वास्तूब्रह्म’ आणि त्यात वास करून असलेली मूर्ती म्हणजे बिंब. तर ज्या बिंबाच्याद्वारे ब्रह्मचे ज्ञान होतं ते ‘बिम्बब्रह्म.’ आता अशा मूर्ती कोणत्या? लाखो वर्षांपूर्वी माणसं निराकाराची पूजा करत. पंचमहाभूतांची उपासना करायचे. ज्यांच्यामुळे फायदा तरी होतो किंवा तोटा होतो. पुढे काय झाले, वेद-उपनिषदे आली, तेव्हा शब्दकार आले. या पंचमहाभूतांना शब्दांच्या बंधनात आपण बांधलं. केवळ शब्दांच्या आधाराने. त्यांची वर्णनं करू लागलो. पुढे त्यांना नराकार आपण दिला. शब्दकाराचं रूप घडवलं गेलं आणि माणसाचा आकार तयार झाला. देव माणसाच्या रूपात आला. अजूनही समाधान होतं नाही, तो माझ्यासारखाच कसा? तो मोठा कुठे होतो? तेव्हा सुराकार घडवला गेला. म्हणजे त्याला जास्त हात दिले, डोकी जास्त दिली, पाय जास्त दिले. तिथून पुढे सर्व देवतांच्या मूर्तींना सामावून घेणारा तो विश्वाकार, तर ज्ञानेश्वरीच्या अकराव्या ध्यानात विश्वमूर्तीचे उदाहरण आहे. अर्जुनाला जेव्हा कृष्ण सांगतो ‘हे सर्व मीच आहे’ तेव्हा तो सर्व देव, अष्टदिगपाल, नवग्रह, हे अर्जुनाला दिसू लागतात. तेव्हा अर्जुन घाबरतो आणि म्हणतो, “तुझे हे स्वरूप मला नको, भीती वाटते, मूळ रूप दाखव.” म्हणून विश्वाकार प्रचंड आहे, आपल्याला झेपणारा नाही. एक चार पायाची शिवाची मूर्ती आहे. देवाला दोन पाय, अग्नीची मूर्ती तीन पायांची आहे. (मोढेराजवळ पाहायला मिळते) तर या चार पायांचे प्रयोजन काय? खजुराहोला अशा दोन मूर्ती आहेत आणि एक मूर्ती चंद्रपूर गडचिरोलीजवळ आहे. त्यात दोन पाय मोकळे सोडलेत आणि दोघांची मांडी घातली आहे. शैव सिद्धांत तत्वज्ञान आम्हाला असे सांगतो, चर्यापाद, क्रियापाद, ज्ञानपाद आणि योगपाद या चार पायांवर सर्व आधारित आहे. सिद्धांत सांगतो प्रथम देवळाची झाडलोट करावी, सडासंमार्जन करायचं, फूलं तोडून आणायची, प्राथमिक सर्व गोष्टींची तयारी करायची. क्रियापाद म्हणजे, मूर्तीला स्नान घालून, अभिषेक करणं, कपडे दागिने घालून, सजवणं. त्यातच पूजा आणि नैवेद्यही येतो. मग मूर्तीसमोर बसून ध्यानधारणा केली तर तो योगपाद. या सर्वातून आपल्याला ब्रह्माचे ज्ञान मिळते म्हणून तो ज्ञानपाद. आता ‘पाद’ या शब्दावर श्लेष आहे. पाद म्हणजे पाय. या कलाकाराने हे सर्व पायांच्या आधारे दाखवले. किती उच्च त्याची प्रतिभा!

हेमाद्रीपंत याच्या खास हेमाडपंती (हेमाडपंथी नव्हे) शैलीबद्दल मला विचारायला आवडेल. माती, चुना न वापरता मंदिरे बांधण्याची कला हेमाद्रीच्या आधी अवगत झाली नव्हती का?

होती ना. परंतु, महाराष्ट्रात हेमाद्री पंतांनी नागर शैलीतील मंदिरे बांधण्यास सुरुवात केली असे आपण मानू. असे आपण फक्त मानतो, बाकी पुढे सांगतो, मूळ प्रकारे त्याचे नाव ‘भूमिज’ म्हणतो. विद्वानांनी त्याला ‘डेक्कन स्टाईल ऑफ नागर स्ट्रक्चर’ म्हंटलंय. याचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराचे शिखर असतं त्याच्या लहान लहान प्रतिकृती वर गेलेल्या आढळतात. कधी पाच कधी सात पण या सर्व मूळ शिखराच्या प्रतिकृती. यांना ‘भूमिज’ म्हणतात. जुन्या मंडळींनी असं अर्थ लावला, अशोकस्तंभ जसा जमिनीतून ऊर्ध्व भेदत वर येतो, तसं हे मंदिरं जमिनीतून उगवून आलं. म्हणून ‘भूमिज.’ पण, नंतर शास्त्राचा अभ्यास झाल्यावर असे लक्षात आले की प्रत्येकाला एक मजला समजतात. एका भूमीतून दुसरी भूमी जन्मली, दुसरीतून तिसरी त्याला ‘भूमिज’ म्हणावे आणि हे सर्वांना आता मान्य झाले आहे. आता हेमाडपंताने काय केलं? हा पंत तीन यादव राजांचा पंतप्रधान होता. शिवाय, हत्तीच्या गटाचा मुख्य आणि विद्वान ब्राह्मण होता. चातुवर्ग चिंतामणी त्याचे चार खंडातले पुस्तक. मग धार्मिक वृत्तीचा, अधिकार असलेला, पैसे असलेला ज्ञानी मनुष्यच अशी मंदिरे बांधू शकतो, म्हणून त्याला हेमाडपंती मंदिरे म्हणतात. सर्व भागात शिखरं अशीच राहतात, हे काम राक्षसाचे म्हणून त्याला ‘भुताची मंदिरे’ असेही म्हणतात. आता एक उदाहरण देतो. अंबरनाथचं मंदिर तू पाहिलंय, ते १०६० मध्ये बांधून पूर्ण झाले. त्यालाही आपण ‘हेमाडपंती’ म्हणून संबोधतो. पण, हा पंत तर बाराव्या शतकानंतर अवतरला.

आपल्याकडे सूर्यमंदिरे कमी प्रमाणात आहेत. सूर्यदेवाविषयी मला विशेष आकर्षण वाटतं, ते त्याने पायात घातलेल्या मोजांमुळे. सूर्यदेवाची मूर्ती आपण इराणकडून घेतली आहे. त्यापूर्वी ती कशी होती? आणि तसाच भारतीय मूर्तींवर इतर कोणत्या संस्कृतींचा प्रभाव आहे का?


इराणात दोन गट आहेत. अग्निपूजकांचा आणि सूर्यपूजकांचा. त्यांच्यात वाद होते. अग्निपूजक प्रबळ झाले, त्यांनी सूर्यपूजकांना हाकलून दिले. ते निघाले आणि आले ते आपल्या भारतात. आपण सर्वांना थारा देतो. ही मंडळी उत्तरेत थांबली. त्यांच्या पायात गमबूट्स आहेत. आपण देवळात जातानाही बूट काढून जातो. मग आपल्याला तो देव तरी कसा चालेल? पण, आपण त्याला स्वीकारलं. आपली संस्कृती सर्वसमावेशक आहे. एक तू कायम लक्षात ठेव, मिथककथा नेहमीच ताकदवान असतात. ती श्रीकृष्णाच्या मुलाची साम्बाची कथा आली, त्याने आपल्याकडच्या गुरुजींनी बूट घातलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यास नकार दिला. तेव्हा, इराणमधून पुजारी घेऊन आले. आपल्याकडे जसे चातुर्वर्णी आहेत तसे इराणातही होते. त्यांना ‘मागी’ म्हणतात. आपण त्यांना मग ‘ब्राह्मण’ म्हणतो. खरंतर ते आले म्हणून सूर्याची ही मूर्ती आली, पण आपल्याला सांगण्यासाठी एक कथा लागते म्हणून या मिथककथा निर्माण झाल्या. या मिथककथांमध्ये फार अर्थ असतो. तो समजून घ्यायला शिक. नाहीतरी प्रत्येक गोष्टीत हेतू शुद्ध असल्यास आपण पळवाटा शोधतो. तो आपला स्वभाव आहे. इथे चिंचवडमध्ये अजूनही हे मग ब्राह्मण सूर्यमूर्तीची पूजा करून यात्रा काढतात. परंतु,आज त्यांच्या पायात मोजे नसतात. रथसप्तमीच्या दिवशी ही यात्रा असते. आपल्या समजुतींना जे पटत नाही ते आपण काढून टाकतो.
 
सूर्यमूर्तीप्रमाणेच आणि कोणत्या मूर्तींचा आपल्यावर प्रभाव आहे का?

आहे. आहे ना! आता सूर्याची जी मूर्ती आहे, हेलिओस. हा शब्द संस्कृतात आला आहे. हा ग्रीक शब्द संस्कृतात कसा आला कुणास ठाऊक. पण, ही ग्रीक मंडळी सूर्याची पूजा करत असत. त्याला ते ‘हेलिओ’ म्हणत. त्या मूर्तीला चार घोडे असायचे आपल्याकडे. मूर्तीच्या रथाला सात घोडे आहेत. आरोदक्षो आहे, आता लक्षात नाही पण श्रीकृष्ण किंवा बलरामाच्या मूर्तीचं रूपांतर झालं, अशा काही ग्रीक देवता आहेत, त्यांचा काही परिणाम आपल्या मूर्तींवर पडला आहे.

आज आपण पाहतो की, सर्रास प्रदर्शनात किंवा काही वितरकांकडून आपल्याला दगडात कोरलेल्या मूर्ती विकत मिळतात. काही बेढब असतात, काही मूर्तींमध्ये नवनवीन इनोव्हेशन्स केलेली आढळतात, तर हे आपल्या संस्कृतीवर होणारे आक्रमण आपण कसं रोखायला हवं? हे पाहता आजच्या मूर्तिकारांसमोर काय आव्हाने आहेत?

त्याचं काय आहे की, शास्त्राप्रमाणे तुम्ही मूर्ती घडवलीत, तर ती प्रदर्शनात असो किंवा कुठेही त्याने फरक पडत नाही. प्राणप्रतिष्ठापना केल्याशिवाय तिच्यात देवत्व उतरत नाही. ती मूर्ती दिखाऊ आहे. आता तू म्हणतेस तसे बदल होतच असतात. त्या त्या भागानुरूप ते बदल होतात. सूर्याच्या पायात बूट होते, पण आज नवीन मूर्ती ज्या घडवल्या त्या सूर्यदेवाला बूट नाहीत. कारण, आपल्याकडच्या मूर्तिकाराला ही संकल्पनाच न रुचणारी होती, असे बदल होतच राहणार, त्यात आपण काही करू शकत नाही. आता शिवलिंगात नाही बदल झाला? अभिषेकाचे पाणी वाहून नेण्यासाठीची शाळुंका ‘योनिपटल’ म्हणून ओळखली जाऊ लागली. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. पण, आजच्या मूर्तिकारांसमोर मात्र आव्हाने नक्कीच आहेत. केवळ कलाकाराने मूर्ती साकारू नये. त्याला शास्त्राचेही ज्ञान असावे आणि अभ्यासकानेही ती घडवायला धजू नये, त्यात कलाकुसर दिसायला हवी. त्यामुळे आजचे मूर्तिकार नक्की कोण, हे पाहणे हा प्रश्न आहे. मंदिरांचा जीर्णोद्धार करताना काही गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतात. आता बघ, अयोध्येत जेव्हा मूर्ती कशी असावी हा विचार करतो, तर तो रामलला आहे, तर मी म्हंटलं, सात-आठ वर्षांचा दिसेल, अशी मूर्ती असावी. धनुष्य बाणाशिवाय राम ओळखू येत नाही म्हणून तो असावा. त्या वयात धनुर्विद्येचा सराव केला जातो. किरीट नको, कारण तो राज्याभिषेकानंतर आलेला आहे. जटा नको, त्या वनवासाच्या वास्तव्याचं प्रतिनिधित्व करतात. त्यांनी भाता केला होता, म्हंटलं तो नको, तो लढायलाही जात नाही केवळ सराव करतोय. मग लोक विचारतात की, एकटा राम कसा? तर त्या बालवयात सीता कुठे आणि लक्ष्मण कुठे? तर हे भान ठेवणे गरजेचे आहे.

मंदिर पूर्वापारपासून केवळ भक्ती करण्याचं ठिकाण नव्हतं, तर तिथे अनेक प्रकारचे समाजप्रबोधनपर कार्यक्रम व्हायचे. नृत्य, गायन, अनेक. यामागचा नेमका उद्देश काय असावा? मुळात मंदिर ही संकल्पनाच केव्हापासून आणि कशी सुरू झाली?

प्राचीन काळी मंदिरं हे गावातील प्रमुख ठिकाण असायचे. आपल्याला पाचव्या-सहाव्या शतकापासून मंदिरे आढळून येतात. पडझड झालेली असली तरी मंदिरे टिकून आहेत. त्यावेळची घरं कुठे आहेत? मंदिरं हे शक्यतो विटांचा, दगडात बांधलेलं असल्याने गावाचं केंद्रस्थान असायचं. मंदिराला मी एक सामाजिक संस्था म्हणतो. मंदिरात एक गोल दगड असतो. रंगशीला. तिथे तुम्ही देवाला नर्तन, कीर्तन, भजन अर्पण करता. आपल्याकडे नृत्य शिकून झाल्यावर ‘अरंगेतम’ करतो, ते दक्षिणेत मंदिरात करण्याची पद्धत आहे. हे कुठून येतं? अजूनही काही मंदिरात जाऊन मुलं नृत्य शिकतात. तिसरं, मंदिराभोवती बाजार भरत असे. आजूबाजूच्या खेड्यातली लोक यायची. तिथे वास्तुविनिमयासोबत विचारविनिमय होत असे. मंदिराला पाथरवट लागतो, गवळी लागतो, देवाचे कपडे शिवायला शिंपी लागतो, फुले माळा आणायला माळी लागतो. मंदिराच्या वाटणीत शेती आलेली असे. ती सांभाळायला शेतकरी लावून दिलेला असे. सर्व प्रकारचे समाजघटक मंदिराच्या व्यवस्थापनात उपयोगी पडतात. त्यातून त्यांना चरितार्थाचे साधन मिळायचे. मी खरे सांगतो, अशी शपथ घ्यायला लोक मंदिरात येते. त्याकाळी शहरातल्या, खेड्यातल्या माणसांचे सगळे आयुष्यच मंदिरांभोवती गुरफटलेले असे. एवढं महत्त्व त्या मंदिरांचं होतं.
 
 
 
गो. बं. देगलूरकर यांचा अल्पपरिचय

गोरक्षनाथ बंडामहाराज देगलूरकर यांचा जन्म धाराशिव जिल्ह्यातील हिप्परगा येथे परमभागवत देगलूरकर घराण्यात झाला. शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर ते पुढील शिक्षणासाठी पुण्यात आले. पदवी परीक्षेसाठी त्यांनी ‘इतिहास’ हा विषय निवडला आणि पदव्युत्तर पदवीसाठी त्यांनी ‘प्राचीन इतिहास व पुरातत्त्वशास्त्र’ असे विषय घेतले. ‘पीएच.डी’साठी ‘हिस्ट्री ऑफ मराठवाडा’ हा विषय त्यांनी घेतला. धार्मिक आणि आध्यात्मिक संस्कार घरातूनच झाल्याने ‘मूर्तिशास्त्र’ या विषयाच्या खोलात शिरून त्यांनी अभ्यास केला.
 
गो. बं. देगलूरकर यांची साहित्यसंपदा काही पुस्तके


- घारापुरी दर्शन
 
- Temple architecture and sculpture of Maharashtra

- प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती

- बिंबब्रह्म आणि वास्तुब्रह्म

- मंदिर कसे पहावे?

- मार्कण्डादेव (मार्कंडी)

- The Mediaeval Temples at Stgaon

- विष्णूमूर्ते नमस्तुभ्यम्
 
- वेरूळ दर्शन

- शिवमूर्तये नमः

- सुरसुंदरी

डॉ. गो.बं. देगलूरकरांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान


- इतिहासाचार्य न.र.फाटक पुरस्कार

- के. के. बिर्ला फेलोशिप

- ‘चतुरंग प्रतिष्ठान’चा ‘जीवनगौरव’ पुरस्कार

- छत्रपती सेवा प्रतिष्ठानचा जिजामाता विद्वत् गौरव पुरस्कार

- श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक व आध्यात्मिक पुरस्कार
 
- पुण्यभूषण पुरस्कार (२०१९)

- विद्याव्यास पुरस्कार

- सृजन फाऊंडेशनचा सृजन कोहिनूर पुरस्कार ((जानेवारी २०१७)

- स्नेहांजली पुरस्कार




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.