ट्विटरचा दे धक्का! अनेक दिग्गजांच्या ब्लू टिक्स गुल!

    21-Apr-2023
Total Views |
 
twitter blue tick
 
 
मुंबई : मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने त्यांच्या घोषणेनुसार व्हेरिफाईड अकाउंट्सवरून ब्लू टिक्स काढून टाकल्या आहेत. ज्यांनी ट्विटर ब्लू प्लॅनसाठी पैसे दिले नाहीत त्यांच्या खात्यातून ब्लू टिक्स काढण्यात आल्या आहेत. ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी आपल्या व्हेरिफाइड अकाऊंटसाठी शुल्क भरण्यासाठी ब्लू टिक असलेल्या ट्विटर हँडलला २० एप्रिलपर्यंत मुदत दिली होती, अन्यथा ब्लू टिक काढून टाकण्यात येईल असे सांगितले होते. ट्विटरने ब्लू टिकसाठी ६५९ रुपये (वेबसाइट) आणि ९०० रुपये (मोबाइल अॅप) मासिक सदस्यता शुल्क निश्चित केले आहे. त्यामुळे गुरुवारी मध्यरात्रीपासूनच सर्व क्रिकेटपटूंच्या ब्लू टिक्स हटवल्या आहेत.
 
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, शिखर धवन, सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, सौरव गांगुली, ऋषभ पंत, एमएस धोनी, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, आकाश चोप्रा, सूर्यकुमार यादव, वीरेंद्र सेहवाग, शुबमन गिल, मोहम्मद कैफ, अजिंक्य रहाणे, कृणाल पांड्या, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे, विरोधी पक्ष नेते अजित पवार, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक बड्या नेत्यांचे ट्विटरवरील ब्लू टिक हटवले आहे.
 
इलॉन मस्कने कंपनी ताब्यात घेतल्यानंतर मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने आपल्या अनेक धोरणांमध्ये बदल केले आहेत. या अंतर्गत आता ब्लू टिक काढण्यात येत आहे. ब्लू टिकच्या सेवेचा लाभ घेण्यासाठी वापरकर्त्याला आता किमान शुल्क भरावे लागेल.