कोरोना महामारी ही उद्धव ठाकरे निर्मित नाही तर...

- सुषमा अंधारेंचं राज ठाकरेंना पत्र

    21-Apr-2023
Total Views | 90
 
sushma andhare
 
 
मुंबई : कोरोनाच्या काळातही अनेक प्रकारचे हलगर्जीपणा झालेले आहेत. तिथेही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आजही भरला जाऊ शकतो. त्यामुळे याचं राजकारण करू नये. आयोजकांनी सकाळची वेळ घ्यायची नव्हती. हा एक अपघात आहे. या अपघाताचं काय राजकारण करायचं? असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले होते. राज ठाकरे यांच्या या विधानावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्राद्वारे पलटवार केला आहे.
 
सुषमा अंधारे पत्रात म्हणतात की, "पत्र लिहिण्यास कारण की, इंटरनेट आणि ई-मेलच्या युगामध्ये आजही आपण पत्रलेखनासारखी आपली अत्यंत प्राचीन परंपरा जतन आणि संवर्धन करीत आहात त्यामुळे पत्राद्वारे हा संवाद आपल्याशी साधण्याचा प्रयत्न करत आहे. खारघर दुर्घटनेच्या संदर्भात किमान चार दिवसांनी का होईना काल आपण व्यक्त झालात हे एका अर्थी बरे झाले."
 
"घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्यावर कोणीही राजकारण करू नये असे आपले म्हणणेही अगदी समायोचित आहे. पण पुढे आपण कोरोना काळात हलगर्जीपणा झाला वगैरे वगैरे असे म्हणत उद्धव साहेबांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची ही भाषा केली. आपण अत्यंत सिलेकटीव्ह पद्धतीने व्यक्त झाला त्या संदर्भात काही प्रश्न उद्भवतात आणि ते विचारलेच पाहिजेत असे वाटते."
 
 
मुद्दा क्रमांक एक :
 
कोरोना महामारी ही उद्धव ठाकरे निर्मित नाही तर निसर्गनिर्मित होती हे आपल्याला ज्ञात असेलच. पण खारघर मध्ये घडलेली दुर्घटना ही मानवनिर्मित आहे कृपया याची नोंद घ्यावी.
 
मुद्दा क्रमांक दोन :
 
भारतरत्न सारखा पुरस्कार एका हॉलमध्ये दिला जातो आणि त्याचे प्रक्षेपण जगभर केले जाते. तर महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी एवढ्या मोठ्या गर्दी आणि सभेची गरज होती काय? गर्दीचे प्रशासकीय नियोजन का केले गेले नव्हते?
 
 
मुद्दा क्रमांक तीन :
 
श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेत मुळात ही गर्दीच राजकीय हेतूने प्रेरित होऊन शिंदे फडणवीस सरकारने एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. तर याचे राजकारण करू नका असे म्हणणे कितपत संयुक्तिक ठरते.
 
 
मुद्दा क्रमांक चार :
 
कोरोना काळात मुख्यमंत्री निधीला सहाय्यता देण्याच्या ऐवजी खासगी पीएम केअर फंडमध्ये निधी द्या असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस यांचे कोरोना काळात राजकारण करत नव्हते का?
 
 
मुद्दा क्रमांक पाच :
 
गर्दी टाळणे हाच मोठा उपाय असताना सुद्धा मंदिरे उघडलेच गेले पाहिजेत यासाठी सुपारीबाज लोकांना पुढे करून करून राज्यातली एकूण व्यवस्था अस्थिर करण्याचा प्रयत्न करणारे भाजपाई नेते राजकारण करत नव्हते का?
 
 
मुद्दा क्रमांक सहा :
 
सर्व धर्मीय प्रार्थना स्थळे बंद असताना, जशी मंदिरे बंद होती, वारी बंद होती तशी आंबेडकर जयंती सुद्धा साजरी झालीच नव्हती. पण मंदिरेच कशी बंद राहिली अशी आवई उठवत जाणीवपूर्वक मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांना एवढ्या गंभीर काळामध्ये सहकार्य करायचे सोडून त्यांच्या कामात अडथळे आणण्याचे प्रयत्न करणारे भाजप नेते राजकारण करत नव्हते का?
 
"शेवटचा मुद्दा: कोरोना काळामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामाची दखल फक्त भारतात नाही तर जगभरात घेतली गेली. आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि दस्तूर खुद्द पंतप्रधान मोदीजींनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या कोरोना कामगिरीचे कौतुक केले. “धारावी पॅटर्न” तर जगभर गाजला. या उलट कोरोना काळात उत्तर प्रदेशमध्ये मात्र गंगा नदीवर प्रेतं तरंगलेली उभ्या जगाने पाहिली. प्रेतांची विल्हेवाट व्यवस्थित न लावल्यामुळे कोरोनाचा फैलाव उत्तर प्रदेशमध्ये अधिक प्रमाणात झाला. हा हलगर्जीपणा करणाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात आपण काही सुतोवाच करणार आहात का?" असं अंधारे पत्राद्वारे म्हणाल्या.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121