मराठा आरक्षण ; 'क्युरेटिव्ह याचिका' दाखल करणार : शंभूराजे देसाई

    21-Apr-2023
Total Views |
maharashtra-government-decided-to-file-curative-petition-in-supreme-court-for-maratha-reservation

मुंबई
: मराठा आरक्षणावरील पुर्नविचार याचिका दि.२० एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. त्यांनंतर दि.२१ एप्रिल रोजी फडणवीस-शिंदे सरकारच्या मंत्र्यानी यावर तातडीने बैठक घेतली. या बैठकीत मंत्र्यांसह नेते आणि अनेक वकील बैठकीस उपस्थित होते. या बैठकीत परत तातडीने सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल करणार असल्याचे मंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगितले.

“मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाची पुनर्विचार याचिका फेटाळली असली तरी मराठा आरक्षणाचे दरवाजे अजिबात बंद झालेले नाहीत. राज्य शासन हे आरक्षण मिळवून देण्यासाठी ठाम असून अधिक मजबूत कायदेशीर लढा लढण्यात येईल. यासाठी उपचारात्मक याचिका (क्युरेटिव्ह याचिका) दाखल करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तसेच याचिका तातडीने दाखल करण्याच्या सूचनाही दिल्या गेल्या आहेत. त्याचबरोबर मराठा आरक्षण प्रश्नी विस्तृत माहिती घेण्यासाठी सर्वे करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी नवा आयोग नेमून विस्तृत आणि शास्त्रीय सर्वेक्षण परत करण्यात यावे असेही ठरले”, अशी माहिती शंभूराज देसाई यांनी बैठकीनंतर दिलीय.