मराठा आरक्षण याचिका फेटाळल्यानंतर सरकारची तातडीची बैठक!

    21-Apr-2023
Total Views |
 
Eknath Shinde
 
 
मुंबई : मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात ही याचिका दाखल केली होती. मात्र सुप्रीम कोर्टानं याचिका फेटाळल्यानं आता मराठा आरक्षणाचा मार्ग खुंटल्याचं समजल जात आहे. यासंदर्भात लवकरच क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मराठा आरक्षण प्रकरणाची पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्रीवर बैठक घेण्यात येईल.
 
या बैठकीसाठी मंत्र्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बैठकीत पुढील कार्यवाही निश्चित करण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच, कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे.
 
“मंत्रिमंडळाची मराठा आरक्षण उपसमिती आहे. या उपसमितीची तातडीची बैठक मुंबईत बोलावण्यात आली आहे. काल सर्वोच्च न्यायालायने पूनर्विचार याचिकेवर निकाल दिला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडवर आले आहेत. मराठा आरक्षण उपसमितीप्रमुख चंद्रकांत पाटील, उदय सामंत, दादा भुसे, गिरीश महाजन, रवी चव्हाण आणि मी असे उपसमितीच्या सदस्यांना तातडीने मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व दौरे रद्द करून मुंबईत येण्यास सांगण्यात आले आहे. दुपारी १ च्या सुमारास बैठक होईल”, अशी माहिती शंभूराज देसाई यांनी दिली.