भारत 2047 पर्यंत अमली पदार्थमुक्त करणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे प्रतिपादन

    20-Apr-2023
Total Views |
india-to-be-drug-free-by-2047-union-home-minister-amit-shah-testimon

नवी दिल्ली : “अमली पदार्थांचे सेवन ही अतिशय गंभीर समस्या आहेत. अमली पदार्थांच्या तस्करीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेसोबतच देशाच्या सीमा आणि तेथील सुरक्षा खिळखिळी करत आहे. मात्र, भारतास 2047 पर्यंत अमली पदार्थमुक्त करण्यासाठी केंद्र सरकार सज्ज आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी केले आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अमली पदार्थ विरोधी कृती दलाच्या प्रमुखांच्या पहिल्या राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अंमलीपदार्थ नियंत्रण विभागाच्या 2022 च्या (विशेष आवृत्ती)चे प्रकाशन केले आणि ‘व्यसनमुक्त भारत - राष्ट्रीय संकल्प’ या पुस्तिकेचेदेखील प्रकाशन केले. अंमलीपदार्थांची अवैध शेती शोधून ती नष्ट करण्यासाठीच्या ‘मॅप ड्रग्ज’ - मोबाइल अ‍ॅप आणि वेब पोर्टलचेदेखील त्यांनी उद्घाटन केले.

यावेळी गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, ‘’अमली पदार्थांचे व्यसन देशाच्या तरुण पिढीचे नुकसान तर करत आहेतच, त्यासोबतच देशाच्या अर्थव्यवस्थेवरदेखील वाईट परिणाम करत आहेत. अमली पदार्थांच्या तस्करीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेसोबतच अमली पदार्थ दहशतवाद देशाच्या सीमा आणि तेथील सुरक्षा खिळखिळी करत आहे. यावर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्रीय गृह मंत्रालयाने एक रणनीती तयार केली आहे. ज्यात तीन महत्वाचे मुद्दे आहेत - संस्थात्मक व्यवस्था मजबूत करणे, सर्व अमली पदार्थ विरोधी संस्थांमध्ये समन्वय स्थापन करणे आणि व्यापक जनजागृती अभियान चालवणे. ही लढाई पक्षीय राजकारण आणि राजकीय विचारसरणीच्या पलीकडे जाऊन लढावी लागेल,” असेही शाह यांनी नमूद केले.