एकच वादा!!!

    20-Apr-2023   
Total Views |
ajit pawar

मीडियावाल्यांनो ते गाणं आमच्या तरुणपणी लय गाजलं होतं. ‘ज़िन्दगी के सफ़र में गुज़र जाते हैं जो मकाम वो फिर नहीं आते.’ तसंच झालंय. त्यामुळे सांभाळून पाय टाकतो. नाही तर आपण पुढे जायचो अन् कळायचं की, अरे आपल्याला पाठी खेचणारे आपल्या आधी तयारीत आहेत. सगळं विचार करून वाईच थांबलोय. तुम्हाला माहिती नाय का की, मी बोललो मेल्याशिवाय पार्टी सोडणार नाय म्हणजे नाय, तर तिकडं सोशल मीडियावर लोकांनी प्रश्न विचारला की, कोण मेल्याशिवाय मी पार्टी सोडणार नाय? कोण म्हणजे? किती गमजा करता तुम्ही लोक! आता कोण मेल्याशिवाय मी पार्टी सोडणार नाय, हे काय सांगण्यासारखं हाय व्हय. तुम्ही लोकांना कायच्या काय बोलता. मी कोणाच्या मरणाबद्दल बोलणार? मी मेल्याशिवाय पार्टी सोडणार नाय असं मला म्हणायचं हुतं. तुम्ही लोक पण पार धुरळा उडवता. मी कुठं जाणार हे माझ्याआधीच ‘ब्रेकिंग’ सांगून मोकळं बी होता? काय राव काय समजना! तुमी तर तुमी ते आमच्या राशीला आलेलं, तर काय करलं, काय बोलेल याचा पत्ता नाय. ते कोणत्या पक्षाचे प्रवक्ता हायेत आमच्या की त्यांच्या. उगा मनाला येईल ते बावचळत सुटतंय. आपल्याला काय जे जे हुईल ते ते पाहात बसायचं. कंटाळा आला तर गालातल्या गालात हसायच फक्त. कारण, डोळ्यांनी बोलायची पण चोरी केली राव या मीडियानं. नाही मी कंटाळा आला म्हणून सहज आपली नजर इकडंतिकडं फिरवली होती. कायतरी गमतीदार काही एकल दिसलं तेव्हा हसलो होतो. झाली डोळ्याची हालचाल. पण, ते पत्रकार फार बारा... बाराबुद्धीचे. लगेच संबंध आमच्या उद्धवरावांशी जोडला होता. आता आमचे उद्धवराव आहेत असे की त्यांना बघून... जाऊ दे, पुढचं काय बोलत नाय. त्याची पुरी हयात राजकारणात गेली. कशी कशी माणसं सोबत होती, आली गेली. आता उद्धवराव सोबत आहेत. सवय झाली. नाय सवय करून घेतली. पण, लोक काय गप बसायला तयार नायत. जरा निवांतपणासाठी फोनबिन बंद करून आपला ‘क्वालिटी टाईम’ घालवावा, तर लगेच यांच्या बातम्या सुरू. अजितदादा भाजपमध्ये प्रवेश करणार! कितीदा जखमेवर मीठ चोळणार रे तुम्ही लोक. पहाटे एकदा तो सुवर्णक्षण आलेला. लोक म्हणतात तेव्हा माघार घेऊन मी माती खाल्ली. आता काय मातीचा चिखलच होणार. काय म्हणता चिखलातच कमळ उमलते. हाय का? आता असं बोलून पुन्हा काकासाहेबांना अन् ताईसाहेबांना ‘अलर्ट’ करायचं काम करू लागला का?

अतिकची पिलावळ

काँग्रेसी मानसिकतेने किती रसातळाला जावे? निवडणुकीमधील मतांसाठी किती लांगूलचालन करावे आणि लाचार व्हावे, याला काही मर्यादा? पुलवामा हल्ला झालाच नाही, म्हणत देशाच्या सैनिकांच्या शौर्यावर प्रश्न उठवणार्‍या काँग्रेसींनी अतिकला ‘हुतात्मा’ मानून चक्क त्याला ‘भारतरत्न’ मिळावे म्हणून मागणी करावी? ज्याला प्रयागराजमधून काँग्रेसने निवडणुकीचे तिकीट दिले होते, त्या राजकुमार नावाच्या काँग्रेसी नेत्याने अतिकसारख्या गुन्हेगाराला ‘भारतरत्न’ मिळावे, त्याला हुतात्माचा दर्जा मिळावा म्हणून मागणी केली. त्याने भारताचा तिरंगा अतिक आणि अशरफच्या कबरीवर लावला. अतिक अशरफला सलामी दिली आणि त्यांच्या नावाच्या ‘अमर रहे’ म्हणून घोषणाही दिल्या. राजकुमार ही अतिक आणि अशरफचा लावारीस संतती आहे की, राजकुमारच्या राजकीय कर्तृत्वाचा बेवारस बाप आणि कर्ताधर्ता अतिक? राजकुमारने हे का केले असेल? प्रयागराज पश्चिमेला अतिकचा चाहता वर्ग अर्थात त्याचे कौमवाले बहुसंख्य राहतात. अतिकला समर्थन, सहानुभूती दाखवून त्याच्या मृत्यूपश्चात बेवारस झालेल्या त्याच्या चाहत्यांनी आपल्याला नेता मानावे, आपल्या काँग्रेस पक्षाला आपले मानावे यासाठीच त्याने हे कृत्य केले. राजकुमारवर पोलिसांनी कारवाई केली. ‘भादंवि कलम १५३ ब’ आणि ‘प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट टू नॅशनल ऑनर्स अ‍ॅक्ट, १९७१’ अंतर्गत त्याच्यावर तक्रार दाखल झाली. आता म्हणे काँग्रेस पक्षाने राजकुमारला पक्षातून सहा वर्षे निलंबित केले. गुन्हेगारांसाठी पुळका येणारे लोक काँग्रेसमध्ये आहेत, हे सत्य उघड झाले. दुसरीकडे महाराष्ट्रात बीडमध्ये माजलगावमध्ये अतिकला हुतात्मा ठरवणारे आणि हिंदूंवर अश्लाघ्य शब्द वापरणारे बॅनर लावले गेले. कुणा मोहसिन भैया पटेल मित्रमंडळाच्या नावाने हे बॅनर लागले. या सगळ्यांवर कडक कारवाई झालीच पाहिजे. मोहसिन भैया पटेल मित्रमंडळाच्या सर्वांचीच कसून चौकशी व्हायलाच हवी. कारण, हे हिमनगाचे टोक आहे. महाराष्ट्रात चौकाचौकात मोहसिन भैया पटेल मित्रमंडळ टाईप झुंडीचे तंत्र अवलंबणारे आहेत. त्यांचा बंदोबस्त झालाच पाहिजे.
९५९४९६९६३८

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.