मुंबई : अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी अदाणी यांच्यावर गंभीर आरोप केलेत. या प्रकरणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही काही सवाल विचारलेत. अदाणी प्रकरणी जेपीसी चौकशीची मागणी होतेय. या चौकशीला सुरुवातीला शरद पवार यांनी विरोध केला. मात्र, नंतर विरोधकांच्या सुरात सूर मिसळला. त्यानंतर अदाणी-पवार यांची भेट झाल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. यावर. शरद पवार आणि अदानींचे संबंध जुने आहेत. कुणी कुणाला भेटावं हा ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे. अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.
अदाणी-पवार यांच्या भेटीवर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, "कोणी कोणाला भेटायचे यावर मी काय बोलणार. त्यांचे जुने संबंध आहेत. पवारांचे सहकार्य घेण्यासाठी ते भेटले असतील. त्यावर मी काही बोलू शकणार नाही. कोण कोणाला भेटतयं, याच्याशी आम्हाला काही घेण-देण नाही."
"दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केले आहेत. पैसे कोणाचे आहेत? यावर काहीही उत्तर आलेले नाही. काही तरी त्यांनी उत्तर दिले की, कंपन्या विकून मी पैसे उभे केले, असे अदाणी म्हणतात. मग बेनामी कंपन्याच्या माध्यमातून मॉरिशिअरमध्ये का गुंतवणूक केली? इथे भारतात का नाही गुंतवले?" असा सवालही त्यांनी केला.