नगर विकास दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांकडून गौरव
20-Apr-2023
Total Views | 85
2
नाशिक : सन २०२२-२३ मध्ये नागरी प्रशासनाच्या विविध कामांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल नाशिक महानगरपालिकेला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले आहे. ‘अ’, ‘ब’, ‘क’ वर्ग महानगरपालिका या गटातून नाशिक महानगरपालिकेस प्रथम क्रमांकाने नगर विकास दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.
विशेषता विक्रमी कर संकलन, राष्ट्रीय शहरी उपजिविका अभियानाची (एनयूएलएम) अव्वल कामगिरी आणि कमी केलेला प्रशासकीय खर्च यामुळे मनपाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. आयुक्त आणि कर विभागाच्या उपायुक्त अर्चना तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कर विभागातील कर्मचारी आणि सहा विभागीय अधिकारी यांचे प्रयत्न तसेच प्रभावी वसुली मोहीम राबवल्याने २०२२-२३चे कर वसुलीचे उद्दीष्ट पूर्ण झाले आहे. १५० कोटी कर वसुलीचे उद्दीष्ट होते. नाशिक मनपाच्या इतिहासात प्रथमच १२५ टक्के वसुली होऊन १८८ कोटी ७३ लाख रुपये इतका मालमत्ता कर मनपाच्या तिजोरीत जमा झाला आहे.
तसेच नाशिक मनपाने २०२२-२३ मधील आस्थापना खर्च आटोपशीर ठेवण्यात यश मिळविले आहे. प्रशासन उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांनी मनुष्यबळाचे योग्य नियोजन करुन आणि प्रभावी उपाययोजना राबवुन ३३.०३ टक्के एवढा प्रशासकीय खर्च मर्यादीत ठेवण्यात यश मिळविले आहे. मुंबईतील नगर विकास विभागाच्या या कार्यक्रमाला आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यासह मनपा उपायुक्त करुणा डहाळे, विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील उपस्थित होते.