मुंबई : दिग्गज उद्योजक गौतम अदानी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तसेच मविआ आघाडीचे आधारस्तंभ शरद पवार यांची गुरुवारी मुंबईत भेट झाली. या भेटीमुळे ‘मविआ’च्या ऐक्याला धक्का बसल्याचे मानले जात आहे.पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी दोघांमध्ये तासभर चर्चाही झाली. त्यामुळे या भेटीनंतर आता कुठल्या घडामोडी घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, ‘मविआ’चे घटक पक्ष असलेला काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाने अदानी समूहावर गंभीर आरोप केले आहेत. मात्र, त्यांचाच सहयोगी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अदानींची उघडपणे बाजू घेतली होती. त्यातूनच ‘मविआ’तील या तीनही घटक पक्षांमध्ये ठिणगी पडली होती. त्यातच पवार आणि अदानी यांच्या आजच्या भेटीमुळे मविआच्या ऐक्याला मोठा धक्का देणारी घटना घडली असल्याचे म्हटले जात आहे.
‘अदानी’ आणि पवार यांच्या तासाभराच्या भेटीत नेमकी कुठली चर्चा झाली, हे गुलदस्त्यात असले तरी त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत. या भेटीने महाविकास आघाडीची समीकरणे बदलणार का? राहुल गांधी आणि इतरांनी केलेले आरोप कायम राहणार की त्याची तीव्रता कमी होणार? ठाकरे गट नेहमीप्रमाणे आपली भूमिका बदलणार का, असे अनेक प्रश्न यानिमित्त निर्माण झाले आहेत.
पवारांच्या विधानाने ‘मविआ’त अस्वस्थता !
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून गौतम अदानी यांच्यावर सातत्याने आरोपांची राळ उठवली आहे. अदानी यांच्या खात्यावर आलेल्या २० हजार कोटींचा निधी हा कुठून आला? त्याचा सरकारशी काही संबंध आहे का? असे अनेक सवाल काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून विचारले जात आहेत. मात्र, या प्रकरणापासून पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोयीस्करपणे दूर ठेवले आहे. अगदी सुरुवातीपासूनच अदानी हे देशाला मोठे करणारे उद्योगपती असून त्यांचे देशाच्या विकासात योगदान आहे. त्यांच्या या प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करण्याची काहीही आवश्यकता नाही, असे पवारांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानानंतर महाविकास आघाडीत मोठी अस्थिरता पाहायला मिळाली होती.
पवार-अदानींचे सौख्य जुनेच !
उद्योगपती गौतम अदानी आणि खासदार शरद पवार यांच्यातील स्नेहपूर्ण संबंधांची चर्चा देशाच्या राजकीय वर्तुळात कायम ऐकायला मिळते. कधी अदानी पवारांच्या बारामतीत जातात आणि रोहित पवार त्यांचे ‘ड्रायव्हर’ बनून त्यांची गाडी चालवतात, तर कधी अदानी स्वतः पवारांच्या घरी जाऊन बंद दाराआड तासभर त्यांच्याशी चर्चा करतात, अशा अनेक घटना पाहायला आणि ऐकायला मिळालेल्या आहेत. पवारांनी आपल्या आत्मचरित्रातही अदानींचे तोंडभरून कौतुक केलेले आहे. नुकत्याच झालेल्या आरोप प्रत्यारोप प्रकरणातही त्यांनी अदानींची बाजू उचलून घेत त्यांना निर्दोष ठरवण्यासाठी केलेली धडपड समोर आली होती. गुरुवारी झालेल्या या भेटीमुळे आता पुन्हा एकदा पवार अदानींचे जुने सौख्य महाराष्ट्रासह देशाला पाहायला मिळाले आहे.