श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) रविवारी सकाळी म्हणजे २ एप्रिल रोजी मोठे यश मिळवले. इस्त्रोने री-युजेबल लॉन्च व्हेईकल ऑटोनॉमस लँडिंग मिशन यशस्वीपणे लाँच केले. इस्त्रोसाठी ही एक फार मोठी यशस्वी मोहीम ठरली आहे. या मोहिमेत आरएलव्ही एलईएक्स रॉकेटच्या सेल्फ लँडिंगची चाचणी घेण्यात आली. उपग्रह अवकाशात सोडल्यानंतर हे रॉकेट हवाई पट्टीवर सेल्फ लँडिंग करेल. त्याच्या मदतीने उपग्रह प्रक्षेपण मोहिमा अत्यंत कमी खर्चात केल्या जातील.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओच्या आणि भारतीय हवाई दलाच्या मदतीने इस्रोने हे अभियानन पूर्ण केले. कर्नाटकच्या चित्रदुर्ग येथून ही मोहीम यशस्वी करण्यात आली.आरएलव्ही एलईएक्स हे रॉकेट भारतीय हवाई दलाच्या चिनूक हेलिकॉप्टरमधून आणण्यात आले. या रॉकेटचे सकाळी उड्डाण केले आणि अवघ्या ३० मिनिटांत ते यशस्वी उतरले. दरम्यान ते ४.५ किमी उंचीवर नेण्यात आले आणि ४.६ किमी अंतरावर सोडण्यात आले. त्यानंतर थोड्याच वेळात, ते नियोजित ठिकाणी उतरले. इस्त्रोचे हे अभियान यशस्वी झाल्याने संशोधकांचा आत्मविश्वास दुणावला आहे.