नाशिक जिल्ह्यात सध्या बाजार समितीच्या निवडणुकीमुळे गावागावात राजकारण तापलेले आहे. ठिकठिकाणच्या बाजार समितीमध्ये गटतट बघायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पिंपळगाव बाजार समिती, तसेच नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीकडे विशेष लक्ष आहे. आशिया खंडातील श्रीमंत बाजार समितीच्या यादीत पिंपळगाव बाजार समितीचे नाव आहे. त्यात विळ्या भोपळ्याचे नाते असलेले आ. दिलीप बनकर आणि माजी आमदार अनिल कदम यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. खरंतर २०१५च्या निवडणूक या दोन्ही नेत्यांनी सामंज्यसपणे बिनविरोध केली. मात्र, त्यामुळे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज झाल्याने आजी-माजी आमदारांना तोंड द्यावे लागले होते.२०१५ची ज्या स्थितीत निवडणूक झाली होती, त्याच्या उलट सध्याचे चित्र आहे. स्थानिक पातळीवर मागील निवडणुकीत आमदार म्हणून अनिल कदम होते. आता दिलीप बनकर आमदार आहे. त्यात दोन्ही विरोधी आघाडीचे होते. आता मात्र दोघेही महाविकास आघाडीत आहे.त्यामुळे मागील वेळेपेक्षा चित्र वेगळे असल्याने निवडणुकीत मोठी रंगत येणार आहे. पिंपळगाव बाजार समितीच्या निवडणुकीचे मतदार हे ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे आणि इतर सहकारी संस्थाचे सदस्य असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अर्थकारण यानिमित्ताने होत असते. स्थानिक पातळीवर झालेला खर्च यानिमित्ताने वसूल करण्याची संधी चालून आलेली असते. त्यामुळे कार्यकर्ते यंदाच्या वर्षी बाशिंग बांधून आहे. दुसरीकडे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी माजी सभापती शिवाजी चुंभळे विरुद्ध देविदास पिंगळे असे दोन गट परस्परांविरुद्ध लढत देणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली खा. हेमंत गोडसे, माजी नगरसेवक दिनकर पाटील, शिवाजी चुंभळे असा एक गट तयार झाला आहे. देविदास पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली दुसरा गट लढत देणार आहे. अर्ज दाखल केल्यानंतरच दोन्ही गटांत खर्या अर्थाने खल सुरू होणार असला, तरी एकीकडे बाजारसमिती निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे गट एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दुसरीकडे ठाकरे गटाने अद्याप आपले पत्ते उघड केलेले नाहीत. तेव्हा ठाकरे गट कुणाला पाठिंबा देतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
कौतुक पाण्याच्या नियोजनाचे!
नाशिक शहरामध्ये पाणी कपात करायची की नाही, याबाबत बैठक नुकतीच घेण्यात आली. त्यामध्ये एक विशेष धोरणही ठरविण्यात आले. हे धोरण ठरवत असताना नाशिक शहरामध्ये पाणी कपातीचा निर्णय लागू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला होता. नाशिक महानगरपालिकेच्यावतीने राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवण्यात आलेला पाणी कपातीचा प्रस्ताव पाहून राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हेदेखील अवाक् झाले आणि त्यांनी कौतुकही केले. नाशिकच्या पाणी कपातीचे हे मॉडेल संपूर्ण राज्यात लागू करण्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या आहे. काही तज्ज्ञांच्या मते, यंदा मान्सून उशिरा दाखल होण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे प्रशांत महासागरामधील ‘अल निनो.’ त्यामुळे पाऊस उशिराने दाखल होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.खरंतर धरणांचा जिल्हा म्हणून नाशिकची ओळख आहे. त्यामुळे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा आहे. तरीदेखील नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून नुकतीच एक बैठक झाली होती. त्यामध्ये पाणी कपातीचे मॉडेल तयार करण्यात आले असून त्याची अंमलबजावणी ही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. नाशिक महानगर पालिकेतील पाणीसाठा बघता जुलैअखेरपर्यंत पाणीसाठा उपलब्ध होऊ शकतो. त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून मान्सून उशिरा दाखल होण्याचा अंदाज असल्याने एप्रिल महिन्यात आठवड्यातील एक दिवस, मे महिन्यात आठवड्यातील दोन दिवस आणि जून महिण्यात आठवड्यातील तीन दिवस पाणी सोडले जाणार नाही. जोपर्यंत मुसळधार पाऊस सुरू होत नाही. धरणसाठयात पाण्याची पातळी वाढत नाही, ही अंमलबजावणी केली जाणार आहे. याबाबत नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या माध्यमातून राज्य शासनाला प्रस्ताव देण्यात आला आहे. राज्याचे मुख्य सचिवांनी हा प्रस्ताव पाहून या मॉडेलचे कौतुक केले. याशिवाय संपूर्ण राज्यात अशी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे का?याबाबत चाचपणी करून राज्यात पहिल्या आठवड्यात अंमलबजावणी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे. यंदाच्या वर्षी मान्सून उशिरा दाखल होणार असल्याने त्याबाबत नियोजन ठिकठिकाणी केले जात आहे.
-अमित यादव