नवी दिल्ली : ‘अदानी समूहा’ने याच वर्षी इस्रायलचे हैफा हे बंदर 1.2 अब्जांना विकत घेतले. हिंडेनबर्गचा अहवाल आल्यानंतर झालेला हा व्यवहार होता. “ ‘अदानी समूहा’वर जे आरोप झाले त्याची आम्हाला चिंता वाटत नाही, आमचा भारतीय व्यावसायिकांवर विश्वास आहे. तसेच भारतातले जे गुंतवणूकदार गुंतवणूक करतील त्यांचे आम्ही स्वागतच करू,” असे प्रतिपादन इस्रायलचे अर्थमंत्री नीर बिरकत यांनी काढले आहेत.
‘अदानी समूहा’च्या विरोधात हिंडेनबर्गचा अहवाल आल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर ‘अदानी’ प्रकरणावरून संसदेतही गदारोळ झाला. मात्र, इस्रायलने भारतीय उद्योजकांवरील आपला विश्वास कायम ठेवला आहे.या प्रकरणी इस्रायलचे अर्थमंत्री बरकत म्हणाले की, “इस्रायलने भारतीय कंपनीला दोन बंदरांपैकी एक विकत घेण्याची संमती देणे हाच भारतीय व्यावसायिकांवरचा आमचा विश्वास दर्शवतो. हिंडेनबर्गच्या अहवालात काय आहे, अदानी समूहावर काय आरोप झाले आहेत? याच्याशी आम्हाला काही घेणे देणे नाही.”
“भारतातल्या गुंतवणूकदारांचं स्वागत करण्यासाठी इस्रायल सज्ज आहे. अधिकाधिक गुंतवणूक आमच्याकडे झाली पाहिजे. आमच्या देशातल्या लोकांच्या हिताची ही बाब आहे. आम्ही हे जे पाऊल उचलले आहे. त्यानंतर भारतातले गुंतवणूदार इस्रायलमध्ये येतील, असा आम्हाला विश्वास वाटतो,” असेही बरकत यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.इस्रायलचे अर्थमंत्री मीर बरकत भारताच्या दौर्यावर असून, इस्रायलच्या लोकांना भारतात सुरक्षित राहणे आणि व्यवसाय करणे सुरक्षित वाटत असल्याचेही ते म्हणाले. “इस्रायलींचे भारतीयांवर प्रेम आहे आणि भारतीयांनाही इस्रायली आवडतात. आम्हाला सुरक्षित वातावरणात व्यवसाय करणे आवडते आणि भारतात तसे वातावरण आहे, ” असेही त्यांनी म्हटले आहे.