सुदानचे संरक्षकच भक्षक!

    19-Apr-2023   
Total Views |
Sudan violence

देशाच्या सैन्याचे कमांडर जनरल अब्देल-फतह बुरहान आणि ‘रॅपिड सपोर्ट फोर्स’ (आरएसएफ)चे प्रमुख जनरल मोहम्मद हमदान डगालो यांच्या संघर्षामध्ये सुदानची सध्या वाताहात सुरु आहे.

सुदानच्या रक्षणासाठी, जनतेच्या भल्यासाठी असलेल्या या दोन संरक्षक संघटना एकमेकांच्या वैरी झाल्या. आपआपली शक्ती दाखवण्यासाठी ते एकमेकांवरच हल्ले करू लागले. शहराशहरांवर कब्जा करू लागले. लोकांनी उठाव करू नये म्हणून लोकांमध्ये दहशत ते माजवत आहेत. अशा परिस्थितीत लोक मूलभूत सुविधेलाही मुकले.याचा फायदा घेत समाजकंटकांनी तेथे लुटालूट सुरू केली.

संयुक्त राष्ट्र संघासोबत काम करणार्‍या स्वयंसेवी संस्थांचे कार्यालयही लुटले. सगळीच अंदाधुंदी अन् अराजक. खार्तूम येथील युरोपीय संघाचे राजदूत ऐडन ओ हारा यांच्या घरावरही हल्ला झाला. हे कमी की काय, तर संयुक्त राष्ट्र संघाच्या वैश्विक खाद्य कार्यक्रम योजनेअंतर्गत काम करणार्‍या तीन व्यक्तींवर हल्ला झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

हे सगळे सुदानमध्ये का सुरू आहे तर? उमर अल बशिर यांची तीन दशकापासून सुदानवर एकहाती सत्ता होती. २०१९ साली जनतेने त्यांची सत्ता उलथवून लावली. जनता आणि सैन्य त्यासाठी एकत्रित आले. पुन्हा देशात २०२१ साली सत्तांतर झाले. त्यावेळी देशाचे सैन्य आणि अर्धसैनिक बल हे एकत्र येऊन निर्णय घेत होते. मात्र, त्यानंतर सैन्याने निर्णय घेतला की, ‘रॅपिड सपोर्ट फोर्स’ हे सैन्यामध्ये विलीन करायचे.

पण, या निर्णयाला ‘रॅपिड सपोर्ट फोर्स’नेच विरोध केला. कारण, ‘रॅपिड सपोर्ट फोर्स’चे प्रमुख हे देशाच्या दुसर्‍या क्रमांकावर सत्तास्थानी होते. जर ‘रॅपिड सपोर्ट फोर्स’ सैन्यात विलीन झाले,तर मग त्यांचे प्रमुख जनरल डगालो यांची सत्ताही जाणार! त्यामुळे डगालोने ‘रॅपिड सपोर्ट फोर्स’च्या सैन्यातील विलिनीकरणाला नकार दिला. मग सैन्याने ठरवले की, ‘रॅपिड सपोर्ट फोर्स’ सैन्यात विलीन तरी करायचे किंवा मग नष्ट तरी करायचे. दुसरीकडे ‘रॅपिड सपोर्ट फोर्स’ने ठरवले की, नागरिकांच्या नावावर या देशात सैन्याचीच सत्ता आहे. त्यामुळे सैन्यावरच कब्जा करायचा.

असो. काही वर्षांपूर्वी कर्नाटकच्या हुनसूर, शिवमोगा येथील सात आणि चन्नागिरी येथील पाच लोक सुदान देशात गेले. तिथे अल-फशेर शहरात भाड्याने घर घेऊन राहू लागले. हे सगळे हक्कीपिक्की समुदायाचे लोक. हे लोक जडीबुटी घेऊन सुदानमध्ये विकण्यासाठी गेले होते. मात्र, सध्या सुदानमधल्या भीषण परिस्थितीमुळे तेथील भारतीयांच्या जीवाला धोका निर्माण झाला.

यावर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ट्विट केले की, ”कर्नाटकातील हक्कीपिक्की समुदायाचे वनवासी सुदानमध्ये अडकले आहेत. पंतप्रधान, गृहमंत्री, मुख्यमंत्री त्यांना सुदानहून सुरक्षित परत आणा,” तर काँग्रेस प्रवक्ते सुरजेवाला म्हणतात की, ”सुदानमध्ये कर्नाटकचे ३१ लोक फसले आहेत. कन्नडविरोधी मोदी सरकारने लोकांना सुरक्षित बाहेर काढण्याऐवजी त्या लोकांना त्यांच्या नशिबावर सोडून दिले आहे.” यावर देशाचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले की, ”तुमचे ट्विट पाहून मी स्तब्ध आहे.

सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांचे जीवन दावणीला आहे. कृपया राजकारण करू नका.” सिद्धरामय्या काय किंवा सुरजेवाला काय, या दोघांची वक्तव्ये पाहून वाटते की, पंतप्रधान, गृहमंत्री आणि मुख्यमंत्री सुदानमधील भारतीयांना वार्‍यावर सोडून देऊन स्वतःला टीकेचे पात्र बनवतील का? स्वतःविरोधात जनमत निर्माण करतील का? त्यातही सुरजेवाला यांचे म्हणणे की, कन्नडिगांचे विरोधक मोदी सरकार! या त्यांच्या विधानातूनच कळते की, त्यांना आणि त्यांच्या पक्षाला सुदानमध्ये संकटात सापडलेल्या भारतीयांबद्दल प्रेम नाही, तर भारतात सत्तेत असलेल्या भाजपच्या मोदी सरकारबद्दल असुया मात्र आहे.

खरे तर, सुदानमधील भारतीयांना वाचवण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर हालचालीसुरू केल्या. यापूर्वीही कोरोना काळात परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना तसेच युक्रेन-रशिया युद्धात दोन्ही देशात अडकलेल्या भारतीयांना भारतीय प्रशासनाने सुरक्षित मायदेशी आणलेहोते. त्यामुळे आताही सुदानमधल्या भारतीयांना सुरक्षित मायदेशी परत आणले जाईलच. नव्हे, तशी खात्री सुदानमधील आपल्या बांधवांना आपण द्यायला हवी.

९५९४९६९६३८


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.